आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: पत जाेखणारी कुरघाेडी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी लातूर-बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणूक मुख्यत: महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे अाणि विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दृष्टीने राजकीय पत-प्रतिष्ठेचा मुद्दा ठरली हाेती. या निवडणूक निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरेसे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशाेक जगदाळे यांना पराभव स्वीकारावा लागला. या प्रतिष्ठेच्या लढाईत रमेश कराड यांनी एेनवेळी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्राेक लगावला तेव्हाच राष्ट्रवादीच्या पराभवाची चिन्हे स्पष्ट झाली. अपेक्षेप्रमाणे सुरेश धस विजयी झाले.

 

या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासूनचा भाजपचा पहिलाच विजय अाहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मात दिली, असे म्हणायचे की लक्ष्मीदर्शनाचा चमत्कार? वस्तुत: स्व. गाेपीनाथ मुंडे अाणि विलासराव देशमुख यांच्यातील मित्रत्वामुळे हा मतदारसंघ माजी अामदार दिलीप देशमुख यांच्या रूपाने तीन वेळा काँग्रेसकडे हाेता. त्या वेळी भाजपकडे पुरेसे संख्याबळदेखील नव्हते. मात्र, या तिन्ही जिल्ह्यांतील भाजपच्या वाढत्या संख्याबळाची अाश्वासक ताकद अाणि या भागातील साऱ्या शक्तिस्थळांशी चांगल्या परिचयाचा सुरेश धसांना असलेला अात्मविश्वास हे दाेन घटक निर्णायक ठरले. या मतदारसंघात सर्वाधिक राजकीय गुंतागुंत बीड जिल्ह्यात पाहायला मिळते. बीडमध्ये अनेक राजकीय घराणी तर अाहेतच, शिवाय प्रत्येक मतदारसंघात चार-दाेन मातब्बर मंडळी राजकीय दबदबा राखून अाहेत.

 

त्यांच्यातील कुरघाेड्यांना अावर घालताना खुद्द शरद पवार यांनादेखील कठीण जात असे. या निवडणुकीतही धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश साेळंके, संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर, अक्षय मुंदडा, सुरेश धस असे चित्र पाहायला मिळाले. बजरंग साेनवणे यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिल्याने भारतभूषण क्षीरसागर पक्षनेतृत्वावर नाराज नसतील तरच नवल!  अजित पवार यांच्या हल्लाबाेल सभेकडे न फिरकलेल्या जयदत्त क्षीरसागर अाणि भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत केलेल्या चहापानाने नव्या समीकरणांचे संकेत दिले, परंतु राष्ट्रवादीच्या जाणत्यांना ते हेरता अाले नसावेत. याशिवाय रजनीताई पाटील, रमेश अाडसकर, बदामराव पंडित यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. भाजपने नेहमीच बीड राष्ट्रवादीतील कुरघाेडीच्या राजकीय डावपेचांचा फायदा घेतला, जिल्हा परिषद निवडणुकीतील गणिते पंकजा मुंडे यांनी याच समीकरणांचा अाधार घेत साेडवली. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नव्या-जुन्या पिढीचा मेळ घालत राजकीय गुंतागुंत साेडवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळाले असते.  


या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाेंधळलेला असल्याचे पाहायला मिळाले. १९८५ पासून शरद पवार यांच्यासाेबत असलेल्या बाबाजानी दुर्राणी यांना परभणीत उमेदवारी नाकारून काँग्रेसचे सुरेश देशमुख यांना तिकीट दिले. लातूर जिल्हा बँक, लातूर ग्रामीणमधून दाेन वेळा भाजपकडून निवडणूक लढवून पराभवाची धूळ चाखलेल्या रमेश कराड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देत भाजपवर कुरघाेडीचा प्रयत्न केला. याशिवाय राष्ट्रवादीसाेबत राहिलेल्या सुरेश धस यांना भाजपशी घराेबा करायला भाग पाडले गेले. वस्तुत: गेल्या लाेकसभा निवडणुकीत स्व. गाेपीनाथ मुंडे यांच्याविराेधात चुरशीची लढत देणाऱ्या सुरेश धस यांना भाजपत प्रवेश देऊ नये यासाठी अनेक कारस्थाने झाली.

 

भाजपने पक्ष प्रवेशासाठी त्यांना बराच काळ ताटकळत ठेवले. मात्र परळी, केज, अाष्टी मतदारसंघावरील त्यांचा प्रभाव, बीड जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी पंकजा मुंडे यांना केलेली मदत लक्षात घेता विधान परिषदेच्या माेर्चेबांधणीसाठी हिरवा कंदील दिला गेला. अर्थातच राष्ट्रवादीने उमेदवारी देताना गृहीत धरलेल्या निकषांमुळे नामुष्की अाेढवून घेतली. धनंजय मुंडे यांच्या राजकीय कामगिरीवर नकारात्मक शिक्कामाेर्तब हाेत अाहे, ताे भाग निराळाच. भविष्यात धनंजय मुंडे यांच्या अाग्रहावरून काेणी राष्ट्रवादीच्या तंबूत जाण्यास धजावेल का? निवडणुकीत भलेही उमेदवार विजयी हाेईल किंवा पराभूत तरी हाेईल, परंतु विश्वासाने पक्षात अालेल्या व्यक्तीला जर साेडून दिले जात असेल तर काेण विश्वास ठेवेल? वादाच्या भाेवऱ्यात अडकलेल्या या निवडणुकीत सुरेश धस यांनी ७६ मतांनी विजय मिळवला. एकूण १००४ मतांपैकी धस यांना ५२७, तर जगदाळे यांना ४५१ मते मिळाली, १ नोटा व २५ बाद ठरली. राष्ट्रवादीकडे भाजपच्या तुलनेत १०० मते जास्त असताना सुरेश धस यांनी बाजी मारली, याचा अर्थ त्यांना काँग्रेस अाणि राष्ट्रवादीची मते मिळाली हे स्पष्टच अाहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना धक्का देणारा हा निकाल अागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा अात्मविश्वास तसेच भाजपतील त्यांची पत वाढवणारा ठरावा.  

 

श्रीपाद सबनीस

बातम्या आणखी आहेत...