आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: ‘निर्लेप’चा प्रागतिक निर्णय!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अापल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाप्रमाणेच उद्याेग-व्यवसाय अाणि व्यवहारांवरदेखील जागतिकीकरणाचा प्रभाव वाढत चालला अाहे. ग्राहकवाद अाता व्यापक अर्थाने विस्तारत चालला असून त्याद्वारे नवसमाजनिर्मिती हाेत चालली अाहे. त्यातच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने हाेत असलेल्या नवनव्या बदलांची भर पडत असल्याने जनजीवनाचा सांस्कृतिक अाकृतिबंध बदलत अाहे. साेबतच व्यापार-उद्याेग, वस्तू, बाजारपेठ, अार्थिक गुंतवणूक अाणि धाेरणे, मनुष्यबळ यांच्यावरही त्याचा परिणाम हाेत चालला अाहे.

 

मुळातच उदारीकरणाशी जागतिकीकरणाची नाळ जाेडलेली अाहे. त्यामुळेच बहुराष्ट्रीय कंपन्या, काॅर्पाेरेशन्स स्वत:चे व्यावसायिक जाळे जगभर विस्तारत अाहेत. माहिती-तंत्रज्ञानामुळे खंड अाणि देशांच्या सीमा धूसर हाेत असताना विकासाच्या स्पर्धात्मक संधी अाणि शक्यता यासंदर्भात अधिक डाेळसपणे विचार करणे अावश्यक ठरते. ‘निर्लेप’च्या अधिग्रहण प्रक्रियेकडे याच दृष्टिकाेनातून पाहायला हवे. तब्बल ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९६८ मध्ये ‘निर्लेप’ची स्थापना झाली. ज्या काळात भांडी विकण्याच्या व्यवसायाला दुय्यम दर्जा मिळायचा, त्याच काळात नाॅनस्टिक तंत्राने युक्त भांडी विकण्याच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ राेवली गेली. या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देत युराेपात अापली उत्पादने निर्यात करणारी ‘निर्लेप’ही या क्षेत्रातील पहिली भारतीय कंपनी ठरली.

 

अर्थातच या उद्याेगाची पाळेमुळे अाैरंगाबादेत रुजलेली असल्याने विशेषत: मराठवाड्याशी ‘निर्लेप’ची नाळ अधिक समरस झाली हाेती. जगभर नाॅनस्टिक कुकवेअरची नवी बाजारपेठ अाकारास येत असताना मराठी माणसाने स्वत:च्या उत्पादनासाठी संधी निर्माण करणे हे काम साेपे नव्हते; परंतु हे अाव्हान नानासाहेब भाेगले अाणि ‘निर्लेप’ परिवाराने लीलया पेलले अाणि हा वारसा राम भाेगले यांनी पुढे चालवला हे इथे विशेषत्वाने उल्लेखनीय ठरते. ‘निर्लेप’कडे मराठी माणसाने घडवलेला ब्रँड म्हणून घराघरात अाजही अात्मीयतेने पाहिले जाते.  प्रत्येक कुटुंबातील किमान तीन पिढ्यांचे तरी ‘निर्लेप’शी भावनिक सख्य निर्माण झालेले अाहे, त्यामुळे अाता हा ब्रँड मराठी माणसाचा राहणार नाही, या भावनेने सामान्य जनांना हळहळ वाटणे स्वाभाविकच अाहे.  


जागतिक पातळीवरील अाैद्याेगिक अर्थकारण अाणि विस्ताराचे बदलते स्वरूप, नवनव्या व्यावसायिक संकल्पना लक्षात घेता एखाद्या उद्याेगाचे किंवा व्यवसायाचे अधिग्रहण ही बाब तशी नवी नाही. उद्याेग-व्यवसाय क्षेत्रातील ही एक सामान्य प्रक्रिया असली तरी ‘निर्लेप’च्या व्यवस्थापनाने कंपनी अाणि कामगारांचे हित जाेपासले याकडे दुर्लक्ष करता येत नाही. व्यवसाय मग काेणताही असाे, त्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळते, नाॅनस्टिक कुकवेअरचा उद्याेग त्यास अपवाद ठरू शकला नाही. गेल्या चार वर्षांपासून अार्थिक स्थिती खालावत असतानाही ‘निर्लेप’ने जगभरातील तगड्या ब्रँडशी जिगरबाज टक्कर दिली.

 

या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत १०० काेटींची उलाढाल केली, हेही नसे थाेडके. किरकाेळ उत्पादक अगदी लहानसहान गावांपर्यंत पाेहोचत असताना त्यांना शह देण्यातही मर्यादा जाणवत हाेत्या. एकीकडे जगभर माेठ्या ब्रँडशी व्यावसायिक स्पर्धा सुरू असतानाही खांदेवाडीत नवा प्रकल्प, नवे उत्पादन सुरू करीत सावरण्याचा प्रयत्न चालवला ही जमेची बाजू ठरावी. याशिवाय अाणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे जगातील नामवंत ब्रँडच्या अाॅफर्स असतानाही भारतीय ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ला भाेगले कुटुंबीयांनी पसंती दिली. खरे तर एखाद्या बहुराष्ट्रीय ब्रँडला ते शेअर्स विकू शकले असते. या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर ‘निर्लेप’चा ब्रँड ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ या भारतीय परंतु जगभर लाैकिक असलेल्या माेठ्या ब्रँडशी जाेडला गेला. यामुळे दर्जेदार उत्पादन देणारी, सक्षम विपणन व्यवस्था असलेली ‘निर्लेप’ अाणि प्रभावी मार्केटिंग, वितरणाचे नेटवर्क अाणि गेल्या तिमाहीत ४,७०० काेटींचे उत्पन्न असलेल्या ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ या दाेन शक्तींचा मिलाफ हाेऊ शकला. बड्या उत्पादकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी घेतलेला हा एक प्रागतिक निर्णय म्हटला तर असंयुक्तिक ठरणार नाही. स्वाभाविकच यामुळे ‘निर्लेप’चीदेखील भरभराट हाेणार हे नि:संशय.

बातम्या आणखी आहेत...