आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; प्रज्ञासूर्याचा अस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टीफन हॉकिंग यांच्या डोळ्यात मिश्कील भाव होते, पण त्याबरोबरच त्यांच्या नजरेत हे विश्व जाणून घेण्याची प्रचंड जिज्ञासा व कुतूहल होते. मेंदू वगळता त्याचे संपूर्ण शरीर पक्षाघाताने ग्रस्त होते, पण या आजारावर त्यांनी मात करत विश्वाच्या उत्पत्तीच्या संशोधनासाठी उभे आयुष्य खर्च केले. विसाव्या शतकात व आजही प्रख्यात भौतिकतज्ज्ञ न्यूटन व अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे जगावर जे गारूड आहे त्या परंपरेत सुमारे पाच दशके जनमानसावर प्रभाव पाडणारे स्टीफन हॉकिंग यांचे व्यक्तिमत्त्व आहे.  गणित हे सौंदर्य आहे त्यातील समीकरणे हा एकमेव प्रकार रुक्ष आहे, असे ते गंमतीने म्हणत. सत्तरच्या दशकात हॉकिंग यांनी क्वांटम सिद्धांताच्या आधारावर कृष्ण विवरासंबंधी सिद्धांत मांडला तेव्हा हा सिद्धांत आधुनिक भौतिकशास्त्राला वळण देणारा ठरला. कारण हा विचार विश्वउत्पत्तीच्या रहस्याकडे घेऊन जाणारा आणि गुरुत्वाकर्षण व क्वांटम मेकॅनिक्स यांना जोडणारा पूल होता. कृष्णविवर म्हणजे एक प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेली पोकळी असून त्यातून प्रकाशही पार होत नाही, असे मत हॉकिंग यांनी मांडले. कृष्णविवरांना तापमान असते व त्यांना एन्ट्रॉपी (वाया जाणारी उष्णता) असते.

 

थर्मोडायनेमिक्सनुसार एन्ट्रॉपी म्हणजे एक प्रकारची माहिती. या माहितीमुळे कृष्णविवर म्हणजे नेमके काय याचा उलगडा होतो, असे सैद्धांतिक मत हॉकिंग यांनी मांडले. या मतामुळे आपले विश्व तीन मितींचे नसून ते अनेक मितींचे आहे, असे सांगणाऱ्या स्ट्रिंग्ज थेअरीला अधिक बळ मिळाले. या क्रांतिकारी सैद्धांतिक विचारांमुळे हॉकिंग जगप्रसिद्ध झाले. मानवाला केवळ आपल्या अस्तित्वाचे नव्हे, तर या विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य जाणून घेण्याची जिज्ञासा आहे ही जिज्ञासा माझ्या ठायी असल्यामुळे मी या खगोलविज्ञानाकडे वळालो असे ते सांगत असत. पदवीनंतर ते केंब्रिजमध्ये अध्यापनासाठी आले होते. वयाच्या विशीतच त्यांच्या शरीरातील स्नायू एकामागोमाग निष्क्रिय होत चालले होते. डॉक्टरांनी केवळ तीन वर्षे जगाल, असे सांगितले होते. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हॉकिंग यांनी आपल्या आजाराला पुढे ५० वर्षे दुय्यम ठरवले. जणू काही त्यांच्या आजाराने या प्रज्ञावंताच्या इच्छाशक्तीपुढे शरणागती पत्करली होती. माणूस जेव्हा मृत्यूच्या छायेत असतो तेव्हा त्याला त्याच्या जगण्याचे मोल कळते आणि त्या दृष्टीने तो कार्यमग्न होतो, असे हॉकिंग आपल्या इच्छाशक्तीमागचे इंगित सांगतात.  


७० -८० च्या दशकात कृष्णविवराबद्दल त्यांनी केलेली सैद्धांतिक मांडणी आजही शक्तिशाली हबल दुर्बीण व अन्य माध्यमातून जोखली जात आहे. आजचे खगोलविज्ञान कृष्णविवर नाहीत, असे ठामपणे सांगू शकत नाही यातून हॉकिंग यांची सैद्धांतिक मांडणी बळकट आहे हे सिद्ध होते. त्यांचे ‘ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाने जगभर विक्रमी खप केला, शिवाय त्यांना श्रीमंतही केले. विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य मला जेवढे समजले तेवढे लोकांपुढे (कारण जनतेच्या पैशातून संशोधन होत असते) ते आणण्यासाठी मी पुस्तक लिहिल्याची प्रांजळ कबुली ते देतात. मला मिळालेला पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करीन, असेही ते मिश्कीलपणे सांगतात. हॉकिंग हे अन्य शास्त्रज्ञांच्या तुलनेत तसे लोकप्रिय-पॉप्युलर शास्त्रज्ञ होते. जगातल्या मीडियाला त्यांच्या बुद्धिमत्तेचे आकर्षण होते. कारण शारीरिक व्यंग असूनही त्यांनी या अंटार्क्टिकासह अन्य  खंडात होणाऱ्या अनेक विज्ञान परिषदांना हजेरी लावली होती. गंमत म्हणजे त्यांनी आपला ६० वा वाढदिवस बलूनमध्ये बसून साजरा केला होता, तर ६५ वा वाढदिवस एका बोइंग विमानात वजनविरहित अवस्थेत राहून साजरा केला होता. त्यांची अवकाशात सफर करण्याचीही इच्छा होती. माणसाला शारीरिक व्यंग असले तरी त्याच्या मनोनिग्रहात व्यंग असता कामा नये म्हणून मी असे धोके पत्करतो, असे ते म्हणतं. 


पृथ्वीवरील मनुष्य जातीला एक ना एक दिवस वजनविरहित अवस्थेत अवकाशात राहावं लागेल, असे त्यांचे भाकीत आहे. नोबेल पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली, पण त्यांचे खगोलविज्ञानातील त्यांचे कार्य अजरामर राहिल.


- सुजय शास्त्री, डेप्युटी न्यूज एडिटर, मुंबई 

बातम्या आणखी आहेत...