आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान प्रक्रिया नियमित मानायची की ‘क्लायमेट चेंज’चा शिक्का मारायचा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहेंजोदरो-हडप्पासारख्या अतिप्राचीन मानवी संस्कृत्या नद्यांची पात्रे बदलल्याने, तीव्र दुष्काळांमुळे उद्ध्वस्त झाल्या. डायनासोर हा अतिविशाल प्राणी कायमचा नष्ट पावला. पाच-सात कोटी वर्षांपुर्वी जिथे खोल समुद्र होता तिथे आज एव्हरेस्टच्या रुपाने जगातले सर्वात उंच शिखर उभे आहे. दुष्काळ, वणवे, अतिवृष्टी आदी हवामान प्रक्रियांचे दाखले आदीम काळापासूनचे आहेत. तेव्हा तापमानवाढ-हवामान बदल असे काही नव्हते का? 


पर्यावरणाच्या अभ्यासासाठी बर्लिनला होतो तेव्हाची गोष्ट. जून महिना होता. एके दिवशी प्रोफेसर आईस्क्रीमचा भला मोठा ट्रे घेऊनच वर्गात आले. ते म्हणाले, “अलिकडच्या काही वर्षांतला जर्मनीतला सर्वात उष्ण दिवस आज आपण अनुभवतो आहोत.” त्यानंतर वातानुकूलित वर्गातही मानेवरचा घाम पुसत ‘हॉट डे’वरचा उतारा म्हणून त्यांनी आईस्क्रीम वाटले. उन्हाळ्यात ४०-४२ अंशांची सरासरी सामान्य असलेल्या सोलापूर जिल्ह्यात लहानाचा मोठा झालेल्या माझ्यासाठी हा प्रसंग गमतीचा होता. परंतु, वर्षातले सहा महिने उणेच्याही खाली ते पाच अंशांदरम्यान आणि उरलेल्या महिन्यात सरासरी वीस अंशांपर्यंतच्या तापमानाची सवय असणाऱ्या बर्लिनर प्रोफेसरना ३० अंश ‘हॉट’ वाटणे स्वाभाविक होते. आताच्या गारपिटीनंतर विदर्भ-मराठवाड्यात ‘काश्मिर’ अवतरल्याचा भास लोकांना व्हावा, हेही तितकेच स्वाभाविक आहे. 


अतिवृष्टी, गारपीट, उष्णतेची लाट, त्सुनामी, चक्रीवादळे या तीव्र हवामान प्रक्रिया जगाच्या पाठीवर नियमीत घडू लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे अघटीत (अनप्रेसिडेंटेड) आणि अवकाळी (अनसिझनल) हवामान घटनांची संख्या यात लक्षणीय आहे. पाच-पाच वर्षे थेंब न बरसणाऱ्या राजस्थानच्या वाळवंटात अतिवृष्टी होते. कडाक्याच्या हिवाळ्यात पंजाबला पाऊस झोडपतो. जगातल्या सर्वाधिक पावसाच्या चेरापुंजीतला पाऊस कमी होतो. उत्तरेकडच्या उष्णतेच्या लाटा वाढतात. महाराष्ट्रात वारंवार गारपीट होते. हिवाळ्यात थंडीऐवजी पाऊस पडतो. जे भारतात तेच जगात. म्हणजे बर्फवृष्टी, अतिवृष्टीमुळे आखाती देशांमधले जनजीवन विस्कळीत होते. उष्णता वाढल्याने चक्क इंग्लंडमध्ये ‘हिटर्स’ऐवजी वातानुकुलीत यंत्रांची मागणी वाढते. अमेरिकेसारख्या प्रगत, संपन्न देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या नऊ राज्यात एका वर्षात ८० वणवे भडकतात. हा भडके आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पावणेदोन अब्ज डॉलर्स खर्च करावे लागतात तरीही दीड कोटी एकर जंगल खाक होते. अतिवृष्टीमुळे दक्षिण चीनमध्ये भयानक पूर येतो आणि जगातला सर्वात मोठा वीजप्रकल्प बंद ठेवावा लागतो. शेकडो घटना नोंदवता येतील. या सगळ्यातली सामाईक बाब कोणती तर या घटनांचे सातत्य अलिकडच्या दोन-तीन दशकात वाढलेले आहे. यातूनच ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आणि क्लायमेट चेंज (हवामान बदल) हे दोन शब्द राजकारण, उद्योग, अर्थ आणि कृषी क्षेत्रात ऐरणीवर आले आहेत. 


‘कोल्हा आला रे आला,’ या स्वरुपाचे पोकळ भीती दाखवणारे हे शब्द नव्हेत. हवामानशास्त्राच्या ज्ञात इतिहासात सर्वात तप्त म्हणून ज्या १८ वर्षांची नोंद झाली, त्यातली सतरा वर्षे ही तर फक्त गेल्या दोन दशकातलीच आहेत. सन २०१६ हे आजवरचे ‘हॉटेस्ट’ वर्ष आहे. दुसरा क्रमांक २०१५ चा तर २०१७ हे तिसऱ्या क्रमांकावर येते. सन १८८० पासूनचा हवामान तपशील आजमितीस उपलब्ध आहे. त्या आधारे पाहिले तर अलिकडची तीन वर्षे ही ज्ञात मानवी इतिहासातली सर्वाधिक तप्त वर्षे आहेत. या निरिक्षणांच्या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल वॉर्मिंग इज रियल’ असे मानणाऱ्यांची संख्या जगात वाढू लागली आहे. उद्योग, अर्थ, कृषी क्षेत्रातली धोरणे आखताना हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचा अंदाज घेतला जाऊ लागला आहे. 


लोकसंख्येचा विस्फोट अलिकडच्याच दोन दशकातला आहे. या लोकसंख्येच्या गरजा आणि काहींची हाव भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडणे सुरु आहे. आधुनिक जीवनशैलीत प्रचंड उर्जा गरजेची आहे. क्रुड तेल, नैसर्गिक वायू, कोळसा जाळून ती भागवली जाते. विविध मार्गांनी होणारी उर्जा निर्मिती आणि तिचा सढळ वापर हे मोठे कारण जागतिक तापमानवाढीमागे आहे. तापमानवाढीमुळे बाष्पनिर्मितीचे प्रमाण वाढले आहे. विसाव्या शतकाच्या तुलनेत या शतकात जागतिक भूपृष्ठ आणि सागरी पृष्ठभागाचे तापमान ०.९ अंश सेल्सिअसने वाढले आहे. याचा परिणाम वाऱ्यांची निर्मिती आणि त्यांच्या दिशेवर होतो. अतिवृष्टी, बर्फवृष्टी, चक्रीवादळ, गारपिटीसारख्या घटनांमागे हे हवामान बदल आहेत. उदाहरण सांगायचे तर अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीपासून दोनशे-तीनशे किलोमीटर अंतरावर वादळ होते. या समुद्री वादळाचा व्यासच चारशे-पाचशे किलोमीटरचा असतो. याचा परिणाम महाराष्ट्रातल्या पाऊसमानावर होत असतो. साशंकता एवढीच आहे, की या हवामान प्रक्रिया नियमित मानायच्या की त्यावर ‘क्लायमेट चेंज’चा शिक्का मारून मोकळे व्हायचे. बरेच शास्त्रज्ञ म्हणतात की पुरेसा डाटा उपलब्ध होण्याची वाट पाहिली पाहिजे. परंतु, अशा घटनांचे वाढते प्रमाण पाहता जग ‘क्लायमेट चेंज’च्या दिशेने चालले आहे, असे मानण्यास वाव आहे. 


अर्थात असाही एक वर्ग आहे, ज्याला जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हे मुळातच मान्य नाही. हिमनद्यांचे वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, वाळवंटीकरण होणे, जग तापणे वगैरे निष्कर्ष म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या आणि श्रीमंत देशांनी उभा केलेला बागुलबुवा वाटतो या मंडळींना. विश्वाच्या अवाढव्य पसाऱ्यात आणि काळाच्या विशाल पटापुढे मानवी अस्तित्त्वच ते काय, असा प्रश्न उभा राहतो. दीडशे-दोनशे वर्षांच्या नोंदीवरुन निष्कर्षाप्रत येण्यात घाई कितपत योग्य, हा प्रश्न आहे. मोहेंजोदरो-हडप्पासारख्या अतिप्राचीन मानवी संस्कृत्या नद्यांची पात्रे बदलल्याने, तीव्र दुष्काळांमुळे उध्वस्त झाल्या. डायनासोर हा अतिविशाल प्राणी कायमचा नष्ट पावला. पाच-सात कोटी वर्षांपुर्वी जिथे खोल समुद्र होता तिथे आज एव्हरेस्टच्या रुपाने जगातले सर्वात उंच शिखर उभे आहे. दुष्काळ, वणवे, अतिवृष्टी आदी हवामान प्रक्रियांचे दाखले आदीम काळापासूनचे आहेत. तेव्हा तापमानवाढ-हवामान बदल असे काही नव्हते का? हवामान चक्राचा हा निरंतर भाग आहे. या चक्राशी जुळवून घेत अनुकूल बदल घडवून आणण्याची क्षमता असणारे जीवजंतू पृथ्वीवर टिकले. हवामानाशी अनुकूल बदल घडवून न आणू शकलेल्या, निसर्गाशी जुळवून न घेतलेल्या प्रजातींचे अस्तित्त्व नष्ट झाले, या मुद्द्यावर मात्र कोणाचेच दुमत नाही. नैसर्गिक संकटे थांबवता येणार नाहीत. त्यांच्यापासून कमीतकमी मनुष्यहानी, वित्तहानी होण्यासाठी काय करणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारवरची जबाबदारी सर्वात मोठी आहे. नैसर्गिक आपत्ती ओढवण्यात लोकांचा दोष नसतो. त्यामुळे फटका बसल्यानंतर आर्थिक-वैद्यकीय मदत दिलीच पाहिजे. तीही पंचनाम्याची दिरंगाई, भ्रष्टाचार आडवा येऊ न देता. विमा कंपन्यांची मुजोरी मोडून त्यांना शेतकरी अनुकूल धोरणे घेण्यास भाग पाडण्यासंदर्भात सरकार गंभीर दिसत नाही. कृषी विद्यापीठांनी अंग झटकून काम केले पाहिजे. हवामान बदलांचा आढावा घेत तालुकानिहाय पीक पद्धती आणि शेती पद्धतीत बदल सुचवणे, प्रतिकूल हवामानात तग धरणाऱ्या वाणांचे संशोधन यात कृषी विद्यापीठांची कामगिरी समाधानकारक नाही. शेतीतले धोके कमी करणारे शास्त्रोक्त तंत्रमंत्र बांधांवर पोचवण्यासाठी विद्यापीठांनी कंबर कसायला हवी. नैसर्गिक संकटांचा आगावू अंदाज देणे, हे अंदाज शक्य तितके स्थानिक पातळीवर वर्तवणे आणि त्यात अचूकता आणण्याचे आव्हान हवामान विभागापुढे आहे. या दिशेची वाटचाल संथ असल्याची खंत आहे. बाकी तापमानवाढ आणि हवामान बदलांबाबतचे वाद तज्ज्ञांमध्ये झडतच राहतील. कार्बन उत्सर्जनावरुन विकसीत विरुद्ध विकसनशील हा संघर्ष एवढ्यात विझणार नाही. तोवर सरकारने आपत्ती निवारणातली तत्परता आणि परिणामकारकता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. 


- सुकृत करंदीकर, विशेष प्रतिनिधी, पुणे

बातम्या आणखी आहेत...