आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Today Is The 7th Anniversary Of Dainik Divya Marathi दिव्य मराठी दैनिकाचा आज सातवा वर्धापनदिन

निष्ठा वाचकांवर (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी दैनिकाचा आज सातवा वर्धापनदिन. भास्कर समूहाच्या या मराठी भावंडाने २०११मध्ये औरंगाबादमधून महाराष्ट्रात पदार्पण केले आणि गेल्या सात वर्षांत सात आवृत्त्यांतून लाखो वाचकांना जोडून घेतले. निष्ठावान वाचकांबरोबर दरवर्षी नवे वाचक मिळत गेले आणि वाचकांचा आधार अधिकाधिक भक्कम होत गेला. वाचक आणि जाहिरातदार यांच्या भक्कम   आधारामुळेच महाराष्ट्रातील सात शहरांत दिव्य मराठीचा जम बसला. याची पूर्ण जाणीव दिव्य मराठीचा संपादकवर्ग व व्यवस्थापनाला आहे. वाचक व जाहिरातदारांना कृतज्ञतेचा प्रणाम.

 

दैनिक भास्करच्या नि:पक्ष व वेगळेपणा जपणाऱ्या पत्रकारितेला १२ राज्यांतील वाचकांचा अमाप प्रतिसाद मिळाला व ते देशातील सर्वाधिक खपाचे दैनिक ठरले. केंद्रस्थानी वाचक हा भास्कर समूहाच्या पत्रकारितेचा गाभा. वाचकाच्या गरजा, माहितीची भूक लक्षात घेऊन वृत्तपत्राला आकार देण्यासाठी भास्करचा संपादकीय वर्ग अथक प्रयत्न करतो. त्याच मुशीतून दिव्य मराठी तयार झाले. याची प्रचिती आजपर्यंतच्या प्रवासात मराठी वाचकांना आलेली आहे. दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेल्या अनेक वृत्तमालिका व बातम्या याची साक्ष देतील. मात्र केंद्रस्थानी वाचक म्हणजे वाचकांचा अनुनय नव्हे वा खप वाढवण्यासाठीचा खटाटोप नव्हे. केंद्रस्थानी वाचक म्हणजे अचूक व उपयुक्त अशी माहिती पुरवून वाचकाला समर्थ करणे. त्याचा आत्मविश्वास वाढवणे. विविध क्षेत्रांतील असंख्य घडामोडींच्या बातम्या देण्याबरोबरच त्या घडामोडींना आकार देणाऱ्या प्रवाहांची माहिती देणे. दिव्य मराठीचा अग्रक्रम याला आहे. अद्ययावत माहिती देऊन वाचकाला केवळ स्मार्ट करायचे नाही तर माहितीचा अन्वयार्थ सांगून त्याला स्मार्ट विचार करायला प्रवृत्त करणे ही भूमिका भास्कर समूहाच्या दिव्य मराठीची आहे.

 

माहितीच्या महापुराच्या युगात अशा स्मार्ट विचाराची अत्यावश्यकता वेगळी सांगायला नको. एकीकडे या महापुराचे स्वागत असले तरी याच महापुरामुळे वाचक गोंधळून जात आहे. असंख्य ठिकाणांहून असंख्य प्रकारांची माहिती सतत येत असल्यामुळे वाचकांवर कमालीचा ताण पडतो. यातून दोन समस्या उद्भवतात. माहितीचा अतिरेक व माहिती मिळण्याची ठिकाणे अनंत यामुळे कोणती माहिती विश्वासार्ह मानायची हा प्रश्न वाचकांना पडतो. हाती पडलेली माहिती खोटी असण्याची शक्यता वाचकाला साशंक व बेचैन करते. याचा परिणाम म्हणजे तो आपल्या आवडत्या दृष्टिकोनाला घट्ट पकडून ठेवतो. तोच दृष्टिकोन मांडणाऱ्या गटांमध्ये सामील होतो. दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्नही करीत नाही. सोशल मीडियावर यातून ‘इको चेम्बर्स’ तयार होतात. यामध्ये नवी माहिती वा नवा दृष्टिकोन शिरकाव करू शकत नाही, तेथे फक्त प्रतिध्वनी ऐकायला मिळतात. डावे-उजवे, प्रतिगामी-पुरोगामी, मोदी विरोधक-समर्थक, हिंदुत्ववादी-निधर्मी, अल्पसंख्याक-बहुसंख्याक अशा विविध विचारसरणींची बंदिस्त तटबंदी बांधलेले गट सोशल मीडियावर उभे राहिले आहेत. यामध्ये भर पडली आहे ती विशिष्ट जात, पंथ, धर्म, यांच्या टोकदार अस्मिता जपणाऱ्या गटांची. स्वत:ची अस्मिता असणे गैर नव्हे, किंबहुना आत्मविश्वासाने जगण्यासाठी त्याची आवश्यकताही असते. मात्र ही अस्मिता जेव्हा अन्य समाजांचा द्वेष करण्यावर भर देते तेव्हा ती सुदृढ राष्ट्राच्या निर्मितीला घातक ठरते.

 

दिव्य मराठी हे प्रतिध्वनी निर्माण करणारे, आपल्याच आवडत्या दृष्टिकोनाला कुरवाळत बसून एकाच मताची टिमकी वाजवणारे ‘इको चेम्बर’ नाही. दिव्य मराठी हे उदारमतवादी व्यासपीठ आहे. द्वेषविरहित, अचूक आणि सत्य माहितीवर आधारित कोणत्याही मजकुराचे इथे स्वागत आहे. विविध क्षेत्रांतील अचूक व जास्तीत जास्त सत्य माहिती देणाऱ्या बातम्या आणि त्याचा अन्वयार्थ सांगणारे भाष्य यांचा मेळ इथे घातलेला वाचकांच्या अनु‌भवास आला असेल. विविध वैचारिक निष्ठा ही भारताची परंपरा आहे. या सर्व निष्ठांना दिव्य मराठीत सारखेच स्थान मिळेल असा प्रयत्न नेहमी केला जातो. महाराष्ट्रासमवेत देशपातळीवरील घडामोडींचेही सर्वंकष वार्तांकन करण्यावर भर असतो. लोकसभा निवडणुकीच्या वार्तांकनाला दिव्य मराठीने वर्षभर आधीच सुरुवात केली. वाचकाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्याची धडपड त्यामागे आहे. अशीच धडपड आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांबाबत दिव्य मराठीकडून सुरू आहे. नाशिक येथे होत असलेला मराठी लिटरेचर फेस्टिव्हल हे उदारमतवादी सांस्कृतिक व्यासपीठाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. मराठीचा अभिमान जपण्याबरोबर अन्य भाषांचे उत्साही स्वागत त्या व्यासपीठावर करण्यात येते. प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर वा विषयावर दिव्य मराठीचा स्वत:चा दृष्टिकोन असतोच; पण तो वाचकांवर लादला जात नाही तर अन्य दृष्टिकोनही वाचकांसमोर ठेवले जातात. दृष्टिकोनांचे आदान-प्रदान हे दिव्य मराठीचे वैशिष्ट्य आहे. ते जपण्याची व सुदृढ करण्याची संधी वाचक व जाहिरातदार यांनी दिली. त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.

 

बातम्या आणखी आहेत...