आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; भोग सरेना, सुख येईना !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरण बदलाची माहिती घेत हवामान खात्याने राज्यात वादळी आणि गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज आठ दिवसांपूर्वीच वर्तवला होता. अनेकदा हवामान खात्याचे अंदाज चुकतात. दुर्दैवाने या वेळेस वर्तवलेला अंदाज खरा ठरला आणि मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील काही भागातील शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला. राज्यभरात या अवकाळी पावसाने आठ जणांचा बळी घेतला, काही जनावरेही मृत्युमुखी पडली. लहरी निसर्गाची शेतकऱ्यांना सवय झाली आहे. अवकाळी पाऊस येतो आणि तो होत्याचं नव्हतं करून जातो. त्यातूनही शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि हे सर्व सहन करण्याची ताकद बळीराजाला पिढीजात मिळाली आहे. पण या वेळच्या गारपिटीचा मार बळीराजा सहन करू शकला नाही. हाता-तोंडाशी आलेला घास लहरी निसर्गाने हिरावून घेतल्याचे पाहताच मनातल्या मनात कुढणारा, धडधाकट शेतकरी या वेळेस हंबरडा फोडून रडताना उभ्या महाराष्ट्राने पाहिला.


 दोन महिन्यांपूर्वी बोंडअळीमुळे कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. पांढरा कापूस फुटण्याच्या तयारीत असलेल्या बोंडात अळी शिरली आणि तिने कापसाचे अख्खे शेत पोखरून काढले. त्याआधी फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. अखेर कृषितज्ज्ञांचा सल्ला घेऊन बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कापसाची झाडे उपटून काढली, तेथे जनावरे चरायला सोडली. खरिपाने धोका दिला म्हणून पटापट कापसाचे शेत रिकामे केले, बळीराजा पुन्हा राबराब राबला आणि त्याने शेतात गहू, हरभरा, पपई या रब्बी पिकांची पेरणी केली. यंदा मनासारखा पाऊस होता, वातावरणातही गारवा अनेक दिवस राहिला. त्यामुळे हंगाम चांगला येईल या आशेवर तो होता. शेतात हिरवीगार पिके डोलताना पाहून त्यानेही स्वप्ने रंगवायला सुरुवात केली होती. खरिपाची भर आता रब्बीत निघेल, आपले कर्ज आणि भोग दोन्ही सरतील, असे त्याला वाटत होते. पण रविवारी कांदा, डाळिंबाच्या आकाराची गार मराठवाड्यातील परभणी, बीड, जालना, हिंगोली, विदर्भातल्या अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती आणि खान्देशातील जळगाव, धुळे जिल्ह्यातील काही भागात पडली. या गारांचा फटका एवढा जबरदस्त होता की त्यात काढणीला आलेला गहू, हरभरा व ज्वारीचे माेत्यावाणी आलेले पीक मातीमोल झाले. द्राक्ष, पपईच्या बागाही मोडून पडल्या. एवढे सर्व मोठे नुकसान पाहिल्यावर कोणता बळीराजा पुन्हा लढायची भाषा करेल, रडण्याशिवाय त्याच्याजवळ पर्यायच  उरणार नाही. आधीच नगदी कापूस पीक हातचे गेले, त्यात मागील हंगामाचे कर्ज वरून हे अवकाळी संकट म्हटल्यावर त्याच्या हातात तरी उरते काय? भले आठ दिवस आधी हवामान खात्याने वादळी पाऊस, गारपिटीचा अंदाज दिला होता. मात्र, गारपीट आणि वादळापासून बचाव करायचे म्हटले तरी उभ्या शेतातील पीक घेऊन शेतकरी जाणार तरी कुठे? काढणीला आलेले पीकही काढायचे म्हटले तरी दोन दिवसांत ते काढणार कसे? ठेवणार कुठे? हा प्रश्न आहेच. 
 
 
मध्यमवर्गीय आणि दोन, चार एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडे काढलेले पीक ठेवायलाही जागा नाही. त्यात असे संकटापाठोपाठ संकट येणार म्हटल्यावर उभे राहण्याची ताकदही निघून जाते. म्हणून आता शेतकऱ्यांची शेती खरोखर शाश्वत करण्याची वेळ आली आहे. निसर्गावर अवलंबून असलेली शेती शाश्वत होऊच शकत नाही, असा युक्तिवादही केला जातो. तो काही अंशी खराही आहे. पण निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी काहीतरी करावेच लागणार आहे. कारण प्रत्येक वेळेस नुकसानीचे पंचनामे करायचे, नुकसान भरपाई द्यायची आणि कर्ज फेडायचे हे कोणत्याही सरकारला आणि शेतकऱ्यांना परवडणारे नाही. आपत्तीत शेतकरी जेवढे गमावून बसतो, त्या पटीत त्याला काहीच मिळत नाही. जे मिळते ते केवळ त्याला उभे करण्यासाठी सरकारने केलेली ती एक मदत असते. म्हणून अशा मदतीवर शेतकऱ्यांनी अवलंबूनच राहू नये, अशी उपाययोजना म्हणजे शाश्वत शेतीची गरज आहे. दोन दिवसांच्या गारपिटीने जे काही नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याच्या कृषिमंत्र्यांनी दिले आहेत. विमा कंपन्यांच्या तातडीने बैठका घेऊन त्यांच्यामार्फतही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. उशिरा का होईना शेतकऱ्यांना काही ना काही मदत मिळेल, अशी अपेक्षा ठेवली तरी लहरी निसर्गाच्या शापातून शेतकऱ्याची जोपर्यंत मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्याचे भोग सरणार नाही आणि त्याला सुखही मिळणार नाही, हे मात्र तेवढेच खरे आहे.   


- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...