आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे नेते, असे मतदार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं काही जागांचं मतदान अखेरीस परवाच्या रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी पार पडलं. राहिलेल्या जागांसाठी २७ तारखेला मतदान होईल आणि ३ मार्च रोजी त्या निवडणुकांचा निकाल लागेल. चार वर्षांच्या पूर्वांचलवादी धोरणाचा, अॅक्ट ईस्ट पॉलिसीचा नि त्यासाठी लक्षावधी कोटी रु. ची आर्थिक गुंतवणूक करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न सफल झाला का, हे स्पष्ट होईल.  

 

पूर्वांचलातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं काही जागांचं मतदान अखेरीस परवाच्या रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी पार पडलं. राहिलेल्या जागांसाठी २७ तारखेला मतदान होईल आणि ३ मार्च रोजी त्या निवडणुकांचे निकाल लागेल. चार वर्षांच्या पूर्वांचलवादी धोरणाचा, अॅक्ट ईस्ट पॉलिसीचा नि त्यासाठी लक्षावधी कोटी रु. ची आर्थिक गुंतवणूक करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न सफल झाला का हे स्पष्ट होईल.  


या निवडणुकीदरम्यान मात्र काही मनोरंजक माहिती हाती आली, जी ‘नमामि ब्रह्मपुत्र’ च्या वाचकांची करमणूक करणारी ठरू शकते. यातली एक माहिती त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या वैयक्तिक संपत्तीविषयीची. सरकार यांचा धनपूर मतदारसंघ थेट बांगलादेशाच्या सीमेला खेटून असलेला. १९९८ पासून ते तिथून निवडून येताहेत. भाजप म्हणजे निव्वळ कोकिळा आहे, वसंत ऋतू उगवला की ती कंठ काढू लागते आणि वसंत गेला की गडप होते, ही त्यांनी दिलेली उपमा. पण ही उपमा देऊन भाजपला मते देऊ नका हे सांगण्यासाठी माणिक सरकारांना आपल्याच मतदारसंघात ८०-८० मिनिटे मनधरणी करावी लागली. 


धनपूर हा त्रिपुरातला एकमेव मतदारसंघ, जिथे आदिवासी, बंगाली हिंदू आणि मुसलमान समसमान संख्येत आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार करायचा तर ४० टक्के क्षेत्र हे आदिवासी भागात मोडणारे. सरकारांची लढत आहे ती तीन महिलांशी. लक्ष्मी नाग बर्मन काँग्रेसच्या, प्रतिमा भौमिक भाजपच्या आणि जहिरउद्दीन तृणमूलच्या. सरकार यांचं राहणीमान गरिबीला शोभणारं नसलं तरी स्वतःला गरीब मुख्यमंत्री म्हणवून घेण्यात त्यांना धन्य वाटत असावं. निवडणूक लढताना माझ्या हाती रोख रक्कम होती अवघी १५२० रुपये आणि माझ्या बँक खात्यात शिल्लक होती अवघी २४१० रुपये, अशी माहिती त्यांनीच निवडणूक आयोगाला दिली आहे. 


निरजय त्रिपुरा हे मार्क्सवाद्यांचे आणखी एक गरीब उमेदवार. वय वर्षे फक्त ९०. धलाई जिल्ह्यातील चौमानू मतदारसंघातून निरजय आपलं नशीब अजमावत आहेत. तिसऱ्या सलग विजयाची त्यांना अपेक्षा आहे. मी जगलोय तो मतदारांसाठी आणि मरेन तोही मतदारांसाठीच असं त्यांचं म्हणणं आहे. मणिपूरचे रिशांग किशिंग हे राज्यसभेचे सदस्य, वयाच्या ९४ व्या वर्षी ते सदस्य म्हणून निवृत्त झाले आणि ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांचं निधन झालं. निरजय म्हणतात मला निवडून यायचंय आणि पाच वर्ष जगायचंय. किशिंग यांचा ९४ व्या वर्षी लोकप्रतिनिधी म्हणून निवृत्त झाल्याचा विक्रम मला जगून मोडायचाय. आमदार म्हणून मिळालेल्या भत्त्यापैकी ५५ हजार रुपये अजूनही त्यांच्या खात्यात शिल्लक आहेत. 


काय करायचे इतके पैसे, असा त्यांचा सवाल आहे. निरजय एका अर्धकच्च्या घरात राहतात, त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाली. त्यांना एक मुलगी आहे. चार खुर्च्या, एक पलंग, एक टेबल, आणि काही वाद्य एवढीच आहे त्यांची अचल संपत्ती. ते म्हणतात माझ्या खात्यात अवघे १२१८ रुपये आहेत, माणिक सरकार माझ्यापेक्षा ३०२ रुपयांनी श्रीमंत आहेत. आता बोला! 


२७ फेब्रुवारीला या निवडणुकीतला दुसरा आणि अखेरचा मतदानाचा टप्पा पार पडेल. या टप्प्यावर प्रत्यक्ष मतदान करतील इटाली, अर्जेंटिना, स्वीडन आणि इंडोनेशिया. पूर्वांचलातल्या एका छोट्या राज्याच्या निवडणुकीत या देशांचा काय संबंध, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण ही नावे कुणा देशाची नाहीत, ती आहेत मतदारांची. ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर या नावाचे मतदार आढळून आले आहेत. याच केंद्रात दोन बहिणी मतदार आहेत प्रॉमिसलँड आणि होलीलँड नावाच्या. तर त्यांचे शेजारी मतदार आहेत जेरुसलेम, खिवताम नावाचे. 


हे मतदार आहेत एलाका गावातले. इथल्या मतदार मंडळींना इंग्रजीचं वेड इतकं आहे की नव्या पिढीतल्या नावांसाठी ते अशीच नावं निवडत असतात. एलाकाचा पंचायत प्रमुख आहे प्रीमियरसिंग. माझ्या वडिलांनाही अशा नावांचं आकर्षण होतं, पण सुदैवानं मी पंचायत प्रमुख झालो आणि प्रीमियर नाव चपखल बसलं असं त्याचं म्हणणं. या गावात ८५० पुरुष मतदार आहेत तर ९१६ स्त्री मतदार. बारावी उत्तीर्ण झालेल्या एका तिशीतल्या मतदाराची आई स्वेटर नावाची आणि तिनं त्या मतदाराचं नाव ठेवलं आय हॅव बीन डिलिव्हर्ड. काही कॉमन नावांमध्ये आहेत थर्सडे, संडे. तर काही नावं त्रिपुरा, गोवा अशीही आहेत. टेबल, ग्लोब, पेपर, व्हीनस, सॅटर्न, रिक्वेस्ट, लव्हलीनेस, हॅपिनेस अशीही काही नावं आहेत. त्यातली शेवटची तीन ठेवली आहेत शुकी नावाच्या मातेनं. शुकी हा खासी शब्द, त्याचा अर्थ चेअर, खुर्ची. 


एलाकातल्या या खास नावात भारत, मुमताज आणि दुर्गा एवढी तीनच नावं अस्सल भारतीय वाटावी अशी आहेत, बाकी सारी खासी. नेहरू सुटिंग आणि नेहरू संगमा, फ्रँकेस्टाइन आणि केनेडी असेही काही मतदार या गावात आहेत. आई-बाप शिकले नाहीत, पण इंग्रजी नाव हवं या हट्टीपणातनं अशी काही नावं मुलांना ठेवली गेली.  


अशा लष्कराच्या भाकरी... 
ख्रिस रेगो हे ३२ वर्षं नोकरी करून लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी. पूर्वांचलातल्या संघर्षग्रस्त भागाशी त्यांचा संबंध जवळून आलेला. हा संघर्ष लष्कराबरोबरचा नव्हे, तो जाती-जातीमधला. व्हाइट बुलेट्स ही त्यांनी स्थापन केलेली संस्था. जातीअंतर्गत संघर्षात होरपळून निघालेल्या मुलांना मदत करण्याच्या उद्देशानं स्थापन झालेली. या मुलांचं भविष्य मार्गी लागावं हा त्यांचा स्वच्छ आणि प्रामाणिक हेतू. 


स्त्रियांचं सक्षमीकरण खऱ्या अर्थानं करायचं तर ते शिक्षण देऊन, यावर त्यांचा ठाम विश्वास. त्यांचा या दिशेनं प्रवास सुरू व्हायला कारणीभूत झाली एक मणिपुरी महिला. सुमारे एका दशकापूर्वीची ती गोष्ट. एके दिवशी एका आदिवासी महिलेनं त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि मुलीच्या शिक्षणासाठी काही मदत कराल का, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. त्या महिलेच्या आर्जवानं द्रवलेल्या रेगोंनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बँक अकाऊंटवर नजर फिरवली. काही पैसे इथून-तिथून गोळा केले आणि त्या महिलेची नड भागवली.

 
दोनेक वर्षांनी ती आदिवासी महिला परत त्यांच्या घरी आली. पण या वेळेस तिच्या हातात एक मोठा भोपळा आणि एक शाल होती. ती शाल साधीसुधी, बाजारातून विकत घेतलेली नव्हती. ती तिनं स्वतः विणलेली होती. तिनं तो भोपळा आणि ती शाल रेगोंच्या हातावर ठेवलीच, पण पुन्हा एक पाकीट काढून त्यांच्या हाती टेकवलं. ते होतं पैशांचं. रेगोंनी दिलेले सारे पैसे तिने न चुकता परत केले होते. पैसे बँकेत ठेवल्यावर नाममात्र व्याज मिळालं असतं, ते घेत बसायचं की आहेत त्या पैशांचा असा चांगला उपयोग करायचा हा विचार त्यांच्या मनापुढे उभा राहिला. 
त्यांनी मनाचा हिय्या केला आणि २०१४ मध्ये लष्करातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून सनबर्ड ट्रस्ट नावाचा विश्वस्त निधी स्थापन केला. सनबर्ड ही होती ना नफा तत्त्वावर काम करणारी कंपनी. रेगो त्या कंपनीचे सीईओ बनले. तेव्हापासून आत्तापर्यंत पूर्वांचलातील २१ गावातील हजारांहून अधिक मुलांच्या शिक्षणाचा सारा खर्च त्यांच्या संस्थेनं उचलला आहे. सनबर्डचं मुख्यालय आहे मणिपूरमधल्या इजेइरँग गावात. 


रेगोंचं काम पाहून ल्युमिनस त्यांच्या मदतीला धावून आली. त्यांनी त्या गावात सोलार दिवे बसवले. आता त्या गावाला आणि परिसराला २४ तास वीज उपलब्ध होऊ लागली आहे. व्हाइट बुलेट्सचं नाव आता देशभर पोचलं आहे, व्हाइट बुलेटनं केलेल्या क्रांतीची दखल घेतली जाऊ लागली आहे. अच्छे दिन त्यांच्या वाट्याला तरी निश्चितपणानं आले आहेत. 

- सुधीर जोगळेकर (ज्येष्ठ पत्रकार) 
sumajo51@gmail.com

बातम्या आणखी आहेत...