आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी ‘आमिर’ कामगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये प्रत्येक वर्षी कमीअधिक प्रमाणात दुष्काळाचे सावट असते. पाऊस कमी होत असल्यामुळे शेतीचे उत्पन्न गेल्या काही वर्षांत कमालीचे घटले आहे. केवळ शेती हाच एकमेव उद्योग असलेल्या शेतकऱ्यांना तर शेतीने पुरते कर्जबाजारी केले आहे. त्यामुळे देशभरात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रातदेखील हा आकडा वाढताच आहे. ज्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात, त्याच महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या गावांमधील शेतकरी मात्र सधन होतोय. आता या दोन गावांमध्ये धुळे जिल्ह्यातील बारीपाडाही सहभागी झाला आहे.


बारीपाडा हे तर आदिवासी गाव आहे. तेथील शेतकरी सौरऊर्जेसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापरही करू लागले आहेत. खऱ्या अर्थाने या गावातील लोक दुष्काळावर मात करीत आहेत. महाराष्ट्रातील या दोन-तीन गावांनी जी प्रगती केली आहे, त्याव्यतिरिक्त कोणतेही मोठे काम राज्यात झालेले नाही. भाजप असो की यापूर्वीचे काँग्रेस आघाडी सरकार, दुष्काळावर सर्वच सरकारांनी वारेमाप पैसा खर्च केला आहे. पण दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात कोणत्याही सरकारला यश आलेले नाही. महाराष्ट्रात दुष्काळ निवारणार्थ शासनपातळीवर यश न मिळण्याचे कारण म्हणजे तज्ज्ञांनी वेळोवेळी जे इशारे दिले त्याकडे होत असलेले दुर्लक्ष, सरकार आणि राजकीय पक्षांमध्ये असलेला इच्छाशक्तीचा अभाव. योजना खूप चांगल्या असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीत असलेल्या त्रुटी आणि तळापर्यंत झिरपलेला भ्रष्टाचार. यामुळे व्यवस्थेला दुष्काळाची हळहळ तर वाटते; पण तो कायमस्वरूपी संपावा असेही वाटत नाही. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या कायमस्वरूपी दुष्काळी भागात पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वाढला आहे.


दुष्काळाची धग कमी होता होईना, अशा स्थितीत सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून चित्रपट अभिनेता अामिर खान, त्याची पत्नी किरण राव यांनी श्रमदानातून जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचे  ठरवले. खरं तर जेथे सरकार अपयशी ठरले आहे, ते काम लोक सहभागातून करणे अतिशय अवघड आहे. पण अामिर खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ठरवले की, आपण हे आव्हान पेलायचेच. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपली संकल्पना त्यांच्यापुढे मांडली. त्यानंतर त्यांनीही आमिर खानच्या या लोकचळवळीला पाठिंबा देत  योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मुंबईत राहणारा, देश- विदेश फिरणारा आणि चित्रपटातून रग्गड पैसा कमावणारा अामिर आणि त्याच्या पत्नीने एकदा असहिष्णुतेच्या कारणावरून देश सोडून जावेसे वाटते, अशी भावना व्यक्त केली होती. त्याच अामिरने २०१६ मध्ये पाणी फाउंडेशनची स्थापना केली. हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धी या गावांमध्ये स्वत:  आणि फाउंडेशनच्या सहकाऱ्यांना पाठवून माहिती जाणून घेतली. जलसंधारणातून या गावांचा कायापालट होऊ शकतो तर अन्य गावांचा का नाही, हा विचारही केला. त्यानंतर आमिर खानच्या पाणी फाउंडेशनने दुष्काळी भागात फिरून पावसाचे प्रमाण, उपलब्ध जलसाठे, दुष्काळ हटवण्यासाठीचे झालेले काम, अशी सर्वच माहिती मागवली.


त्यानंतर महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचे आव्हान स्वीकारत आराखडा तयार केला. लोकचळवळीतून जलसंधारणाची कामे हाती घेण्याआधी त्यांना मनसंधारण करावे लागले. अामिर खानने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली जलसंधारणाची चळवळ आजही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. किंबहुना अधिक गतिमान होऊन लोकही जोडले जात आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर अामिर खान रविवार, सोमवार असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात होता. कोणताही घाईगर्दीचा कार्यक्रम न आखता नियोजनपूर्वक त्याने दहिंदुले तालुका नंदुरबार आणि लामकानी तालुका धुळे येथे श्रमदान केले. लहान मुले आणि महिलांशी संवाद साधला. गावकऱ्यांना ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे महत्त्व पटवून दिले.  पाणी फाउंडेशनने केलेल्या गेल्या वर्षाच्या कामातून १० हजार कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याचे सिंचन झाल्याचे सांगितले जात आहे. स्पर्धेतून कोणतेही काम अधिक प्रभावी आणि परिणामकारक होते. त्यामुळे फाउंडेशनने वाॅटर कप स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.

 

जलसंधारणाची उत्कृष्ट कामे करणाऱ्या गावांना लाखो रुपयांची बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यभरात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे शेकडो गावांत सुरू झाली आहेत. येणाऱ्या काही वर्षांत
शेकडो गावांतील ६० टक्के जरी पाणीप्रश्न सुटला तरी अामिर खानची कामगिरी ही कायापालट करणारी असेल आणि तीच ‘सत्यमेव जयते’ ठरेल.       
 

 

बातम्या आणखी आहेत...