आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: सीबीएसईचा कौल आणि कल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेला देशभरातून १६ लाख ३८ हजार ४२८ मुले बसली होती. यामध्ये ६ लाख ७१ हजार १०९ मुली आणि ९ लाख ६७ हजार ३२५ मुले होती. निकालाची टक्केवारी पाहिली तर या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे.  एकूण निकाल पाहिला तर ३.५ टक्क्यांनी मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. सेंट्रल बोर्डाच्या दहावी परीक्षेच्या निकालाचे केवळ एवढेच विश्लेषण करून चालणार नाही, तर सेंट्रल बोर्डाला एवढे महत्त्व का आले? याचे विश्लेषण करणे निदान महाराष्ट्रासाठी तरी गरजेचे आहे.

 

२०१३ पूर्वी वैद्यकीय क्षेत्रात मुलांना करिअर करायचे असेल तर बारावीच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीत स्कोअर केला की एमबीबीएसला प्रवेश सहज मिळत असे. पण, त्यानंतर सीईटी आली आणि आता सीईटी जाऊन नीट परीक्षा आली. नीट परीक्षेचा अभ्यासक्रम हा केंद्रीय मंडळाच्या अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमावर अाधारित असतो. त्यामुळे यापुढे नीट ही देशपातळीवर एकच परीक्षा असणार आहे. यापुढे जाऊन ती आंतरराष्ट्रीय पातळीवरही होऊ शकेल. आयआयटीतून इंजिनिअरिंग करायचे असेल तर त्यासाठीदेखील सेंट्रल बोर्डाच्या अकरावी, बारावीचा अभ्यासक्रमच असतो.

 

या दोन्ही परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थी कमी पडत असत. नीट परीक्षा सुरू झाल्यानंतर मेडिकलसाठी महाराष्ट्रातील मुलांसाठी ८० टक्के जागा राखीव राहतील, असा निकाल कोर्टाने दिला आहे. पण, तो पुढे जाऊन बदलू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि जाणकार पालकांनी काळाची पावले ओळखून सीबीएसईकडे मुलांना वळवले आहे. पालकांची मानसिकता ओळखून संस्थाचालकांनीही सीबीएसई शाळा उघडायला सुरुवात केली आहे. अर्थात, महाराष्ट्र बोर्डानेदेखील सातवीपासूनच अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीचा केला आहे. पुढे जाऊन महाराष्ट्र बोर्डाला अधिक महत्त्व येईल. आज मात्र पालकांचा कल माेठ्या प्रमाणात सेंट्रल बोर्डाकडेच वळला आहे, हे मात्र खरे आहे. हे सोमवारी लागलेल्या सीबीएसईच्या निकालाच्या उत्सुकतेवरून लक्षात येते.  


पूर्वी केंद्रीय कर्मचारी किंवा वेगवेगळ्या कामांसाठी कुटुंबासोबत देशभर फिरणारेच मुलांचे प्रवेश सीबीएसई शाळेत घेत असत. कारण कोणत्याही राज्यात गेले तरी त्यांना शाळेत टाकणे सोपे होत असे. त्यामुळे ते सीबीएसई शाळाच मुलांसाठी निवडत असत. परंतु, तेव्हा महाराष्ट्रात सीबीएसई शाळा फारच कमी होत्या. आता नीट आणि जेईईने पालकांची झोप चांगलीच उडवली आहे. त्यातूनच सीबीएसई शाळांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहेत. त्या आणखी वाढणार आहेत. ज्या शाळांमध्ये केवळ स्टेट बोर्ड होते तेथे आता मुलांनी दुसऱ्या शाळेत जाऊ नये, यासाठी स्टेट बोर्डासोबत सीबीएसईचे वर्गही सुरू केले आहेत. मोर नाचला म्हणून लांडोर नाचण्याचा हा प्रकार आहे.  


गेल्या ४ ते ५ वर्षांपासून सीबीएसई शाळा आणि त्यांचा निकाल याची उत्सुकता स्टेट बोर्डाप्रमाणे वाढली आहे. महाराष्ट्रात शाळा वाढल्या तशी विद्यार्थी संख्याही वाढली. बोर्डाचा देशभरातील निकाल पाहिला तर महाराष्ट्र त्यात खूपच मागे आहे. याचे कारण शाळांची संख्या वाढली, पण गुणवत्ता वाढवायला अजून स्कोप आहे. नुसत्या सीबीएसई शाळा उघडून मुले नीट परीक्षेशी स्पर्धा करू शकत नाही. कारण तसा दर्जा शाळांचा असला पाहिजे अाणि त्या लेव्हलचा अभ्यासक्रमही शिकवणारे शिक्षक असले तरच महाराष्ट्रातील मोठी शहरे वगळता ग्रामीण भागातील मुले स्पर्धा करू शकतील.

 

कारण नीट आणि जेईई या परीक्षा घोकंपट्टीवर  उत्तीर्ण होता येत नाही, तर  त्यासाठी संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. सीबीएसईकडे पालक आणि संस्थाचालकांचा निव्वळ कल असून चालणार नाही, तर  त्यासाठी निकालही देशपातळीवरील दर्जाचा राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हाच कुठे  महाराष्ट्राचा टक्का वाढेल.  


त्र्यंबक कापडे

निवासी संपादक, जळगाव 

बातम्या आणखी आहेत...