आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी यमगरवाडीत बहरला शिक्षणाचा मळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि केंद्रीय रस्ते, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत यमगरवाडीच्या माळावर भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान/परिषदेचा स्नेहमेळावा अाज अायाेजित करण्यात अाला अाहे. नानाविध ५२ प्रकारच्या जाती-जमातींच्या उत्थानासाठी संघर्ष, अडचणींना ताेंड देत १९९३ पासून कार्यरत या परिषदेने येथे शिक्षणाचा मळा खऱ्या अर्थाने फुलवला; त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले अाहे. यानिमित्त या परिषदेच्या कार्याची अाेळख करून देणारा हा विशेष लेख. 

 

सा माजिक क्षेत्रात संघर्ष, अडचणी या कायमच सोबत घेऊन अखंडपणे काम करणे हे दिव्य. पण अशा संघटनांपैकी एक आहे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान/परिषद समाजातील वंचित, दुर्लक्षित भटक्या विमुक्त समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न घेऊन १९९३ पासून कार्यरत आहे. पारधी समाजातील दोन तरुणांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज एकवटला, त्यातून खोट्या शिक्षेची जाणीव झाली आणि त्यांच्यावरील गुन्ह्याची ओळख पुसण्यासाठी यमगरवाडीच्या माळरानावर शिक्षणाचा मळा फुलला. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. 


महाराष्ट्रात भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान/ परिषदेची वेगळी ओळख आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता आहे. यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सरकार्यवाह सुरेश जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची यमगरवाडी (ता. तुळजापूर) इथे प्रमुख उपस्थिती आहे. यमगरवाडीचा शोध घ्यायचा झाला तर माणसांच्या आठवणीवर विसंबून राहावे लागेल. एक तपाचा कालखंड. थोडा अधिक. उत्खननात सापडलेल्या खापराच्या तुकड्यावरून समाजजीवनाचा - लोकसंस्कृतीचा शोध घेता येतो. अनुमान काढता येते. तुकडे - तुकडे जुळवून त्या खापराचा आकार व घाट शोधता येतो. तसं काहीस करावं लागेल. यमगरवाडीचा शोध म्हणजे तिथल्या परिसराचा शोध. ‘हरणे’च्या काठावरचे यमगरवाडी. पावसाळ्यात एखादा महिनाच वाहणारी टिटवाळयाच्या चाटुफळे यांनी ही जमीन दिली अन् एका ओसाड नापीक जमीनीचे रूपांतर सदा बहरलेल्या बागेत झालं. पण यमगरवाडी म्हणजे केवळ अठरा अधिक वीस  एकर जमीन म्हणजे यमगरवाडी नव्हे. तिथल्या इमारती... तिथले कालचे कार्यकर्ते... विद्यार्थी.... झाडं.... झुडपं... सारं सारं ... मर्ढेकरांच्या ‘अजुन येतो वास फुलां’ सारखं... 


ही साधारण १९९० ची गोष्ट. कुर्डुवाडीजवळील ढवळज इथे पारधी समाजातील दोन तरुण रेल्वे रूळावर मृत अवस्थेत सापडले. नेत्रावती एक्स्प्रेसवर माढ्याजवळ दरोडा पडला होता. या दरोड्याच्या वेळी उडालेल्या चकमकीत हे तरुण गोळया लागून मारले गेले असा बनाव पोलिसांनी रचला. पण वास्तव हे होते की, दरोड्याच्या खेाट्या आरोपावरून पारध्यांच्या पालावरून या तरुणांना पोलिसांनी बेदम मारहाण करीत उचलून नेले होते. खोटे गुन्हे कबूल करण्याच्या हट्टापायी झालेल्या मारहाणीत आणि त्यानंतर पोलिसांनी गोळ्या घातल्याने या दोघा तरुणांचा मृत्यू झाला. पण सत्य सर्वांना ठाऊक होते. पारधी समाजाने उठाव केला. त्यातून मोठा संघर्ष उभा राहिला. आणि इंग्रजांच्या काळात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या भटक्या जमातीमधील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २३ आॅगस्ट १९९३ रोजी यमगरवाडी येथे सेवा प्रकल्पाची रुजुवात झाली. 


पारधी, जोशी, मसनजोगी, डोंबारी, कोल्हाटी, गोंधळी, ओतारी, कैकाडी, वडार, वंजारी, धनगर, रामाेशी, गोपाळ, नंदीबैलवाले, बेरड अशा विविध जाती-जमातींच्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्या मुलांना यमगरवाडी सेवा प्रकल्पात आणण्यास प्रारंभ झाला. २०-२२ मुलांसह पहिलीचा वर्ग सुरू झाला. यमगरवाडीच्या माळरानावर विहिरीच्या काठावर असलेले पळसाचे झाड तोडून एक  झोपडी उभी करण्यात आली. सुरुवातीला रस्ता नव्हता, पाण्याची सोय नव्हती, पारध्यांचा प्रकल्प होतोय याची सर्वांना भीती वाटे. लोकांचा विरोध होई, मुले पळून जायची, त्यांना शोधून आणावे लागे. मुलींची वाटचाल बिकट होती. सुरुवातीला एक मुलगी आली. हळूहळू ही संख्या वाढून १५० वर पोहोचली. त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केली.


यमगरवाडीचा प्रकल्प आता या सर्व कामाचे मूळ धरू लागला आहे. भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत आहे. आज या ठिकाणी अतिशय दुर्लक्षित अशा ३२ जाती-जमातीतील ४७४ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. १० वीपर्यंतची एकलव्य आश्रमशाळा आहे. २४० मुलांचे अनुदान शासन देते. उर्वरित मुलांचा खर्च समाजातून मिळालेल्या मदतीवर चालतो. आज या ठिकाणी शबरीमाता कन्या वसतिगृह, आरोग्य केंद्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, महात्मा फुले व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, डाॅ. जयंत नारळीकर विज्ञान कक्ष, सांस्कृतिक दल, क्रीडा कुल, शेती विकास केंद्र या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा उपयोग केला जातो. शिक्षण आणि श्रमाचे धडे देऊन उन्नतीचा प्रयत्न व्यवसाय प्रशिक्षणातून चालू आहे.

 

शिक्षणाबरोबर शिवणकाम, इलेक्ट्रिक, प्लम्बिंग, इत्यादी प्रशिक्षण दिले जाते. शाळेच्या माध्यमातून स्वावलंबी पिढी घडवण्यासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काही प्रयोग केले जातात. शेतीमध्ये श्रमदान, स्वच्छता, केशकर्तन यांचा समावेश आहे. शाळेमध्ये सामान्यज्ञान, वक्तृत्व, कथाकथन , चित्रकला इ. स्पर्धांचे अायोजन केले जाते. सुसज्ज इमारतीत मुलांसाठी २० संगणक संच, ३० शिलाई मशीन आहेत. सुमारे ८५ लाख रु. खर्च करून शाळेची इमारत बांधण्यात आली आहे. शिक्षकांसाठी १२ निवासस्थाने बांधून देण्यात आली आहेत. मुंबई येथील एका उद्योगपतीने मुलींच्या वसतिगृहासाठी ७० लाख रु. खर्च करून सर्व सोयींनी युक्त वसतिगृह बांधून दिले आहे. बायोगॅस प्रकल्प सुरू आहे. परिसरामध्ये १ हजार वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना केली जात आहे. आज एका नव्या जगाचा उदय यमगरवाडीच्या माळावरून होत आहे आणि यामागे सर्व समाजाचा हात आहे.  या धडपडीमागे एकच अपेक्षा आहे ती म्हणजे एकात्म, समरस समाज निर्मिती करणे आणि ते आपणा सर्वांच्या पाठबळावर यापुढील काळात वेगाने सुरू राहील.

 

भटक्यांचे जीवन  अन‌् पालावरची शाळा...
भटक्यांचे जीवनच आगळे, भटकंती हा त्यांचा स्थायीभाव, नव्या गावात पोहोचल्यावर तंबू उभारला की राहण्याची सोय झाली. मग संघर्ष सुरू होतो तो जगण्याचा. स्वतःच्या जगण्याच्या विवंचनेपलीकडे जाऊन पोरांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची फुरसत इथे व्हावी कुणाला असेल. शाळेत नाव टाकावं तर पाल केव्हा, कुठे हलेल याचा नेम नाही. त्यामुळे सरकारच्या सक्तीच्या शिक्षणाची जादू या पालावर काही चालत नाही. त्यामुळे २० ते ३० कुटुंबांच्या या पालाच्या मागे धावत, पाल जिथे हलेल तिथे जाऊन शाळा चालविण्याचा अभिनव उपक्रम भटके विमुक्त विकास परिषदेनं हाती घेतला आहे. विदर्भातील उदासा, मकरधेाकड्यापासून मराठवाड्यातील परभणी, निलंगा, जालन्यापर्यंत, उमरगा, अनसरवाडा, नळदुर्ग, परतूर, पेनूर पासून संपूर्ण महाराष्ट्रात मसनजोगी, गोपाळ, पारधी, मरीआई, कुडमुडे जोशी, नंदीबैलवाले, भिल्ल, डोंबारी, नाथजोगी अशा ५२ वेगवेगळ्या जातींसाठी ही शाळा चालवली जाते. 

 

- उमाकांत मिटकर

बातम्या आणखी आहेत...