आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही कळ्या उमलतीलच...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात आयपीएल लिलावात आपलं नाव आलं व बोली लागत राहिली, तेव्हा तेज गोलंदाज कमलेश नागरकोटीने म्हणे स्वच्छतागृहाचा आसरा घेतला! त्याचीच गोष्ट कशाला, डुप्लेसिससारख्या दक्षिण आफ्रिकन कसोटी कर्णधारांचेही लक्ष विचलित होतंय की! काही प्रमाणात तसे होणारच ही गोष्ट राहुल द्रविड गुरुजी समजून घेत होते. पण तरीही युवा खेळाडू, युवा ‘विश्व’चषक जिंकण्याच्या मोहिमेवर मनापासून एकत्रित असावेत, याच प्रयत्नात होते. 


‘समजून घेण्याचा प्रयत्न करा

आयपीएलचा लिलाव यंदाच नव्हे, तर दरवर्षी होत आहे, होत राहील. पण युवा विश्वचषकाच्या उपांत्य-अंतिम फेरीत खेळण्याची सुवर्णसंधी तुमच्या आयुष्यात एकदाच येणार! (कशावर ध्यान केंद्रित करायचं ते विचारपूर्वक ठरवा)” 


आपल्या मुलाच्या वयातील नौजवान शिष्यांच्या भावनांशी राहुल द्रविड गुरुजी एकीकडे समरस होत होते. त्यांना मोहात पाडणाऱ्या गोष्टी समजून घेत होते, नैसर्गिक मानत होते. पण त्याच वेळी त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचे कर्तव्यही पार पाडत होते. पण त्यासाठी वापरत होते किती सुसंस्कृत भाषा. मुलांना झापत नव्हते. आदळआपट करत नव्हते. पण मुलं शहाणी आहेत या भावनेतून मार्मिक शब्दांचा सौम्य मारा करत होते. 


आयपीएल

म्हणजेच दीड-पावणेदोन महिन्यात किमान अर्धा-पाऊण ते एक-दोन-चार कोटी रु. कमावून घेण्याची अनोेखी संधी. तीही वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षी. तीही पदवी परीक्षा देण्याआधी व इतर कोणतेही खास व्यावसायिक कौशल्य अंगी नसताना ही पर्वणी साधण्याचा, लॉटरी लागतेय का ते अाजमावण्याचा मोह युवकांना पडणं स्वाभाविक. भारतात आयपीएल लिलावात आपले नाव आलं व बोली लागत राहिली, तेव्हा तेज गोलंदाज कमलेश नागरकोटीने म्हणे स्वच्छतागृहाचा आसरा घेतला! त्याचीच गोष्ट कशाला डुप्लेसीसारख्या दक्षिण आफ्रिकन कसोटी कर्णधारांचेही लक्ष विचलित होतंय की! काही प्रमाणात तसे होणारच ही गोष्ट राहुल द्रविड गुरुजी समजून घेत होते. पण तरीही युवा खेळाडू, युवा ‘विश्व’चषक जिंकण्याच्या मोहिमेवर मनापासून एकत्रित असावेत, याच प्रयत्नात होते. 


राहुल द्रविड गुरुजी कसोटी-रणजी क्रिकेटमधून निवृत्त झाले. आयपीएल स्पर्धेच्या प्राथमिक अवस्थेत, ठेकेदारांना (फ्रँचायझी) राहुलसह, जॅक कॅलिस, वसीम जाफर आकर्षक भासले. पण काही काळातच ठेकेदारांची नजर फटकेबाजांकडे आणि खेळातील पाच-पाच षटकांच्या टप्प्यात उपयुक्त ठरणाऱ्या फलंदाजाकडे-गोलंदाजाकडे वळत गेली. हशीम अमला, ईशांत शर्मा त्यांना नकोसे झाले. राहुलही आकर्षक वाटेनासा झाला! मग राहुल वळला टीव्ही समालोचनाकडे. गावसकर-मांजरेकर वेगवेगळ्या कारणांतून त्या समालोचनाकडे रमले. पण राहुलला अस्वस्थता जाणवू लागली. क्रिकेटसाठी काही योगदान दिलं जात नाहीये असं वाटू लागलं. 


एक मुद्दा अडचणीचा ठरू शकत होता. तो म्हणजे मानधनाचा. कुंबळे-शास्त्री या राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मानधनास साजेसे पैसे त्याला अपेक्षित होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळही वेगळी चार पावलं पुढं आले. वर्षाला चार कोटी रु. असा त्रैवार्षिक करार सर्वमान्य झाला. लगेच समालोचक राहुल बनला राहुल द्रविड गुरुजी. दोन वर्षांपूर्वीच्या ज्युनियर विश्वचषकाची मोहीम अंतिम फेरीत फसावी ही गोष्ट त्याच्या मनाला टोचली. २०१८च्या मोहिमेच्या तयारीस पुरी दोन वर्षे गुरुजींना मिळत होती. आखणी पद्धतशीर होत गेली म्हणून स्पर्धेआधी तीन आठवडे भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये गेला.  


सुरुवात झाली संघनायक पृथ्वी शॉपासून. मुंबईने त्याला रणजी संघातून खेळवलं, त्यासाठी त्यांनीही आपलं वजन वापरलं. पृथ्वीनेही रणजित शतकांचा सपाटा सुरू केला अन् गुरुजींचा विश्वास सार्थ ठरवला. शुभमन गिलला ते हुकमी पान मानत. इंग्लंड दौऱ्यात गिलची उंच बॅकलिफ्ट म्हणजे चेंडूला सामोरं जाण्याआधी बॅट मागे उंच उगारण्याची पद्धत त्यांनी प्रयत्नपूर्वक सुधारून घेतली. इंग्लिश युवक टोमणेबाजीचा वापर, एक तंत्र म्हणून करू लागले. त्यांना त्याच भाषेत, पण शिवीगाळ न करता (हरभजनसारखं ‘माँ की’ टाळून) जबाब देण्यास त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. ‘विश्व’चषकात सराव संपल्यानंतर, ड्रेसिंग रूममध्ये संघ-बैठक व्हायची. नेमकं त्याच वेळी शेजारच्या खोलीतील ऑस्ट्रेलियन संघाचे हास्याचे स्फोट सुरू झाले, ते थांबेचनात! आपल्याला सतवायचे हे डावपेच आहेत, हे भारतीयांच्या लक्षात यायला फारसा वेळ लागला. मग पंजावी अभिषेक शर्माच्या पुढाकाराखाली, भारतीय गोटातून सतत हसण्याचे धबधबे कांगारूंवर सोडले गेले! 


सुरेख सलामी, भक्कम पायाभरणी यातच अर्धी लढाई जिंकली जाते, हा गुरुमंत्र गुरुजींनी पृथ्वी शॉच्या मनावर बिंबवला. पृथ्वीला तसं सांगण्याची फारशी गरजही नसावी. पृथ्वी अगदी दिल्लीचा डावखुरा मनज्योत कालरा धावांचे भुकेले. त्यांनी दिलेली सुरुवात बघा. १८०, ६७, १५५, १६, ८९ व अंतिम फेरीत ७१. तिसऱ्या क्रमांकावर चंदिगडचा गिल यानं सलामीचा फायदा सातत्याने उठवला तो असा : ६३, ९०, ८६, पाकसमोर नाबाद १०२ व ३१. त्या सातत्याच्या ओघात स्पर्धेचा मानकरी, असा किताब. 


फलंदाजाच्या त्रिमूर्तीस जोड तेज त्रिमूर्तीची. राजस्थानमधील बारमेर-जयपूरचा कमलेश नागरकोटी अन्् उत्तर प्रदेशातील नोएडा शिवम मावी यांचा वेग ताशी १४० ते १४५ किमी. अगदी बुमरा-शामी-ईशांत-उमेश यादव यांना साजेसा. या दोघांपेक्षा उंच, सव्वासहा फुटी ईशान पोरेलचा वेग थोडा कमी, भुवनेश्वर कुमारसारखा ताशी १३५च्या आसपासचा. पण तेज त्रिमूर्ती ही अँग्लो-ऑस्ट्रेलियन, दक्षिण आफ्रिकी-पाकिस्तानी त्रिमूर्तीपेक्षा सरस निघाली, ही गोष्टच भारतीय क्रिकेटसाठी अभूतपूर्व. ऑस्ट्रेलियन गोलंदाज व प्रशिक्षक हॅरिसला अचंबित करणारी व त्याच्याकडून शाबासकीची थाप मिळवणारी.

 
या तेज त्रिमूर्तीला घडवण्यात मात्र द्रविड गुरुजींपेक्षा त्यांच्या स्थानिक मार्गदर्शकांची भूमिका मोलाची. जयपूरच्या सुरेंद्र राठोड यांनी, चेंडू हातातून सोडताना मनगटांचा योग्य वापर करण्यास शिकवलं. गोलंदाजीच्या रन-अपमधील लय त्यांनीच मिळवून दिली, असं कमलेश नागरकोटीही मानतो. सैनिकी विद्यालयात क्रिकेटचं वातावरण नव्हतं म्हणून त्यांनीच आपल्याला तिथून बाहेर काढलं, हेही कमलेश कृतज्ञतापूर्वक मानतो. कमलेश इतका मावी धडधाकट नाही. उंचीही पावणेसहा फूटच. काही जणांना त्यांच्यात अजित आगरकर दिसतो. त्याने टिपलेले काही अप्रतिम झेलही आगरकरच्या चापल्याची आठवण काढून देणारे. पोरेलचे गुरू मोंडल व दास. त्याचे आजोबा कबड्डीपटू व वडील कबड्डी-पंच! 


पृथ्वी शाॅच्या संघाने सर्वांची तारीफ मिळवली ती क्षेत्ररक्षणात. त्याचं काही श्रेय दिलंच पाहिजे क्षेत्ररक्षणाचे खास गुरू अभय शर्मा यांना. अळूर येथील सरावात त्यांनी विश्वचषकातील परिस्थितीशी साजेसं क्रीडांगण आणि वातावरण बनवलं. न्यूझीलंडसारखं हिरवंगार क्रीडांगण, चेंडू उसळणारी खेळपट्टी, जिथे चेंडू गरगर फिरतो, वाॅबल होतो, म्हणून सिंथेटिक चेंडू वापरले. झेल पहिल्या प्रयत्नात हाती लागला नाही तरी दुसऱ्या पूरक प्रयत्नाचाही सराव. ओव्हरथ्रो परावृत्त करण्यासाठी यष्टिरक्षक व गोलंदाज यामागे तिघांची साखळी, ज्यामुळे चेंडू थेट यष्टींवर मारण्याचे प्रयत्न अधिक. 


ही पिढी भाग्यवान, तिच्यावर पैसे वापरण्यात हयगय झाली नाही. सुरुवात द्रविड गुरुजींपासून : मानधन १२ कोटी रु.चे अन् सहा जणांचा सपोर्ट स्टाफही भरपूर मानधनावर करारबद्ध. दोन वर्षांच्या पूर्वतयारीवर साडेचार पावणेपाच कोटी. विजयी संघाच्या रोख इनामावर तूर्त साडेदहा कोटी रु. भारतातील ९९ टक्के लोकांकडे देशातील तीस टक्के पैसा. यातील ३० - ४० टक्के नागरिक दारिद्र्य रेषेखालचे. पण देशातील एक टक्का लोक अति अति अति अति अति श्रीमंत. तसंच सधन क्रिकेट हे मागासलेल्या क्रीडाक्षेत्रातील सुबत्तेचं बेट. ही स्पर्धा चालू असतानाच दिल्लीतील खेलो इंडिया स्पर्धेतील आंध्रच्या व्हाॅलीबाॅलपटूंना शूज घ्यायला पैसे नव्हते व ते अनवाणी खेळले. असो. हा दोष क्रिकेटचा नाही, असं म्हणून हा मुद्दा सोडून देणं भाग पडतं.

 
युवा खेळाडू या साऱ्या उमलत्या कळ्या. त्यातील फारच थोड्या उमलतात, फुलतात हा आजवरचा अनुभव. आता आयपीएलमध्ये अल्पसंतुष्टतेचाही धोका. पण वातावरण सुबत्तेचे. बहुधा काही कळ्या तरी उमलतीलच!


- वि. वि. करमरकर (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

बातम्या आणखी आहेत...