आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मश्री’ अाणि संन्यस्त वृत्ती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भौतिक सुखाच्या शोधात निघालेल्या अांधळ्या समाजाला जीवनमार्ग दाखविण्यासाठी श्री सिद्धेश्वर स्वामींनी संन्यासी होण्याचा निश्चय केला. वास्तव जीवनात संन्यास निजगुण अंगीकारलेल्या या महान योग्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराचा माेह तरी कसा हाेणार? त्यांनी ‘पद्मश्री’ नाकारल्यामुळे पुरस्कार लाेलुप तथाकथित संन्याशांसह अनेकांचे डाेळे उघडले अाहेत. 

 

आदरणीय, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, प्रणाम. अत्यंत प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार मला घोषित केल्याबद्दल मी आपणासह सरकारप्रति आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. मी हा सन्मान पुरस्कार स्वीकारू शकणार नाही, कारण मी एक संन्यासी आहे. मला अशा पुरस्कारात रस नाही. माझा हा निर्णय आपणास मान्य होईल, अशी आशा आहे. आदरपूर्वक प्रणाम. 
आपला, 
श्री सिद्धेश्वर स्वामीजी, विजयपूर. 


अशा शब्दांत भारत सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार विजयपूर येथील ज्ञानयोग फाउंडेशनच्या श्री सिद्धेश्वर स्वामींनी नाकारला. पुरस्कार वापसीचे प्रकरण, त्यावरून उठलेला गदाराेळ सर्वज्ञात अाहेच. मात्र ‘पद्मश्री’ प्राप्त हाेण्यापूर्वीच स्वामींनी सविनय नाकारला त्यामागे कार्याप्रति असलेला त्यांचा समर्पण भाव अाणि तात्विक अधिष्ठान इतरांसाठी प्रेरणादायक तितकाच अनुकरणीय देखील ठरताे. समाजासाठी प्रेरक, अनुकरणीय कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा गाैरव पुरस्कार देऊन करण्याची प्रथा अापल्याकडे अाहे. मात्र काळ तसेच संदर्भानुरूप पुरस्कारांचे पिक सर्वत्र फाेफावले. पुरस्कार प्राप्तीचा साेस जसा वाढत राहिला तसे त्यात राजकारण अाणि बाजारूपण बाेकाळले. परिणामी पुरस्काराची महत्ता, विशेषत्व कालाैघात मागे पडले ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. खरे तर सातत्यपूर्ण समाजाेपयाेगी कर्तृत्वाला कुठल्या पुरस्काराचा हव्यास, साेस हा कधी नसताेच, कारण ते कर्तृत्वच नेहमी काेणत्याही पुरस्कारपेक्षाही श्रेष्ठ, कालातीत ठरत असते. ही बाब या निमित्ताने पुन्हा अधाेरेखित झाली अाहे. 


कर्नाटकातील बिज्जरगी (विजयपूर) येथील जन्मगावी गुरू वेदांतकेसरी श्री मल्लिकार्जुन महाशिवयोगी यांचे ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामींना बाल्यावस्थेपासून अध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले. गुरूंच्या आदर्श मानवतावादी विचारांनी श्री सिद्धेश्वर स्वामीजींची वैचारिक बैठक परिपक्व होत गेली. गुरूंच्या सूचनेवरून श्री सिद्धेश्वर स्वामी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयात एम. ए. झाले. तेव्हापासून आजवर महाराष्ट्र, कर्नाटकसह देश-विदेशात स्वामीजींनी आपल्या लोभस वाणीतून जनसामान्यांना ज्ञानामृत पाजले. मराठी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत आणि हिंदी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. उपनिषदे, भगवद््गीता, पातंजल योगशास्त्र, वचनशास्त्रांचा प्रगाढ अभ्यास आहे. भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, श्री निजगुण शिवयोगी, श्री अक्कमहादेवी, संत बसवेश्वर, श्री अल्लमप्रभू, श्री सिद्धरामेश्वर अशा प्रभावळीतील विभूतींच्या मानव कल्याणविषयक चिंतनाचे वेध स्वामींच्या व्याख्यानातून पदोपदी प्रकट होतात. प्रवचनाची प्रवाही भाषा सर्वांना भावते. भौतिक सुखाच्या शोधात निघालेल्या अांधळ्या समाजाला जीवनमार्ग दाखविण्यासाठी श्री सिद्धेश्वर स्वामींनी संन्यासी होण्याचा निश्चय केला. त्यांच्या संन्याशी आचरणात ओशोंनी सांगितलेली संकल्पना डोकावते. स्वामींची साधी राहणी सर्व वर्गातल्या समाजाला भावते. अंगात साधा पांढरा सुती सदरा, पांढरा पंचा, गळ्याभोवती पांढरा ुमाल आणि पायात अतिशय साध्या चपला. साध्या राहणीने पाय सदैव जमिनीवर. आचार-सात्त्विक व्यासंगी तत्त्वज्ञानी विचाराद्वारे अंतराळाची उंची गाठण्याची प्रचंड क्षमता. व्याख्यानात आक्रमकता नसली तरी त्यांनी ज्ञानामृताद्वारे समाजाला डोळस बनविण्याच ध्यास घेतला आहे.

 
गुरुमहिमा सांगताना श्री सिद्धेश्वर स्वामी म्हणतात... करुणासागर गुरू हा सर्वांना आत्मतत्त्वाचा उपदेश करणारा आहे. कशाचाही मोह न बाळगणारा आहे. पापकर्माचा लवलेश स्वप्नातील मनातही न आणणारा आहे, परम पुण्यमयी असा सद्गुरू नित्य माझ्या मनी राहो! अगदी शब्दश: गुरुंप्रति भावनेशी एकरूप जीवन सिद्धेश्वर स्वामी तंतोतंत जगताहेत. ते नामधारी संन्यासी नाहीत. वास्तव जीवनात  संन्यास निजगुण अंगीकारलेल्या अशा महान योग्याला कसला मोह, नि कसला पद्मश्री पुरस्कार? त्यांना पद्मश्री पुरस्कारासाठी गृहीत धरलेल्या अनुयायांचे श्री सिद्धेश्वर स्वामींच्या पुरस्कार नाकारण्याच्या भूमिकेने डोळे उघडले आहेत. क. या निमित्ताने सर्वांना स्वयंप्रकाशी स्वामींच्या संन्यासी जीवनाचे दर्शन मात्र निश्चित घडले आहे. श्री सिध्देश्वर स्वामींची एक तत्वज्ञानी, अध्यात्मिक संन्यासी गुरू अशी ओळख आहे. साधारण १९९४ पासून स्वामीजींनी अध्यात्म आणि तत्वज्ञावर व्याख्यान देण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आजवर त्यांनी कोणत्याही पक्ष, संघटना, संस्थशी किंवा विशिष्ट विचारसरणीशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष बांधिलकी मानली नाही. संन्याशी या तत्वाशी कधीच प्रतारणा केली नाही. स्वामीजींना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी शिफारस नक्की कोणी केली असेल हे सांगणे कठीण आहे. पुरस्कारासाठी ज्यांनी स्वामीजींच्या नावाची शिफारस केली ते भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस किंवा अशा पक्षपुरक विचारसरणीच्या संघटना असू शकतील. पण याला दुजोरा देणाऱ्या एकाही व्यक्ती किंवा संस्थेचे नाव समोर आलेले नाही. कर्नाटकात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तापलेल्या राजकीय वातावरणात राजकीय लाभासाठी पद्मश्री पुरस्कार स्वामीजींना मिळावा म्हणून त्यांच्या नावाची शिफारस कदाचित काेणी केलीही असेल मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. कारण सर्वपक्षीय समाज घटकातील कित्येक दिग्गजांना स्वामीजींचे विचार निश्चितच आवडले असतीलही, पण अशा मखलाशी करणाऱ्या घटकांनाही स्वामींनी आजवर कधीच जवळ केले नाही. वरकरणी स्वामीजी जितके शांत नि संयमी भासतात तितकेच ते आपल्या विचारावरही ठाम-कठोर असतात, कारण त्यांच्यातली संन्यस्त वृत्ती सदैव जागी असते. पद्मश्री पुरस्कार नाकारण्याची ही काही पहिलीच घटना नव्हे. किंबहुना स्वामीजींनी पुरस्कार नाकारण्यामागची भूमिका लक्षात घेता आजवर पुरस्कार नाकारलेल्या मान्यवरांच्या तुलनेत  श्री सिद्धेश्वर स्वामी सर्वश्रेष्ठ ठरतात, हे मात्र नक्की. श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या पद्मश्री पुरस्कार नाकारण्याने एकीकडे समाजातील सर्व जाती धर्माच्या थोतांड तथा पुरस्कार लोलूप ढोंगी साधू-संत कुळातील संन्याशांना चांगलेच उत्तर मिळाले आहे. कारण, असे स्वयंघोषित ढोंगी संन्यासी लोक हे राजकीय, धार्मिक, सामाजिक किंवा अध्यात्मिक छताचा आश्रय घेऊन वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आपला स्वार्थ बेमालूमपणे साधून घेत अाहेत. ढोंगी संन्याशाचे मुखवटे घालणाऱ्यांसाठी स्वामींच्या पुरस्कार नाकारण्याने एक प्रकारे ठोस उत्तर मिळाले आहे. मुळात स्वामीजींनादेखील आपला संन्यासी मार्ग साधकांनी चोखाळावा, असे अभिप्रेतच नाही तर किमान समाजाने डोळस वृत्तीने अध्यात्माकडे पहावे. सत्कर्माच्या संकल्पना समजून घ्याव्यात. मानवी कल्याणाची मूल्ये आपल्या अंगी बाणवावीत, ती वर्तणुकीतून दाखवून द्यावीत. स्वत:ला ओळखण्यासाठी प्रत्येकाने आपापली माध्यम प्रणाली शोधावी. त्यावर चिंतन करून आपल्या हातून सदैव निरपेक्ष कृती घडण्याची आस जागी करावी, अशा या श्री सिद्धेश्वर स्वामींचा मार्ग लोकहिताचा ठरताे हे निश्चित.

 

- यशवंत पाेपळे

बातम्या आणखी आहेत...