Home | Editorial | Columns | Yogendra Yadav write on 2019 election

२०१९ चा अश्वमेध यज्ञ

योगेंद्र यादव | Update - May 30, 2018, 02:00 AM IST

निवडणूक हे केवळ मतांचे अंकगणित नसते. ज्यात दोन आणि दोन चार होतात. निवडणूक ही जनतेच्या विश्वासाशी निगडित असते. मोदी सरकार

 • Yogendra Yadav write on 2019 election

  निवडणूक हे केवळ मतांचे अंकगणित नसते. ज्यात दोन आणि दोन चार होतात. निवडणूक ही जनतेच्या विश्वासाशी निगडित असते. मोदी सरकारला पर्याय द्यायचा असेल तर देशासमोर एखादे भव्य स्वप्न उभे करावे लागेल. भाजपविरोधात जमलेला हा गोतावळा असे कोणते स्वप्न उभे करेल?

  ‘मोदींचा अश्वमेध घोडा अखेर आम्ही अडवलाच...’ कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे हे वाक्य. पण बंगळुरूमध्ये उपस्थित सर्वच विरोधी पक्षनेत्यांच्या चेहऱ्यावर हेच सांगणारे भाव होते. केवळ राजकीय नेतेच नव्हे तर टीव्हीवर चर्चा करणारे सर्वच चेहरे आनंदित होते. जणूकाही तेदेखील मोदींचा देशभर उधळलेला अश्वमेध थांबण्याची वाट पाहत होते. अर्थात कुमारस्वामींच्या वक्तव्यात अतिशयोक्ती आहे, हे सर्वच जण मनातल्या मनात मान्य करतात. मोदींचा घोडा गुजरात निवडणुकीत अडखळला होता. राजस्थान आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत त्याला एक झटका बसला. त्रिपुरात पुन्हा सावरला होता आणि कर्नाटकात पुन्हा थांबला. यामागील सत्य असे की, विजयी अश्व कधीही बांधला गेला नाही. तो केवळ अडखळला आहे किंवा अडकला आहे.

  आता घोडा अडकला आहेच तर आपणही थोडे थांबून विचार केला पाहिजे की, या अश्वमेध यज्ञामागील उद्देश काय आहे? भाजपवाले म्हणतात काँग्रेसमुक्त भारत. माझ्या मनात काँग्रेस हा भारताच्या स्वधर्म पतनाचे प्रतीक आहे. काँग्रेसचा विजय म्हणजे लोकांवर प्रणालीचा विजय. माझ्या मते, काँग्रेस हे भ्रष्टाचाराचे असे कुरण आहे, जे कितीही मुळापासून उपटण्याचा प्रयत्न केला तरी उपटले जात नाही. या अर्थाने भारताला काँग्रेसमुक्त करायचे असल्यास एक राष्ट्रीय पातळीवरील यज्ञ झालाच पाहिजे. मागील चार वर्षांपासून हा यज्ञ करणारे, यापूर्वी काँग्रेस वापरत आलेली क्लृप्ती आणि कुकृत्याचे दाखलेच पुन्हा देत आहेत.

  त्यामुळे भाजप काँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारताचा सर्वात मोठा वाहक आहे. भाजपला काँग्रेसपासून मुक्तता हवी आहे, जेणेकरून एकदा काँग्रेस गेल्यावर भाजपला यापूर्वी काँग्रेस करत असलेले सर्वच प्रकार करता येतील. हा यज्ञ कायदा आणि घटनेच्या बंधनांतून मुक्त होण्याचा सर्वसत्ता यज्ञ आहे. विरोध, विरोधी पक्ष आणि विकल्प (पर्याय) या सर्वांची प्रत्येक शक्यता मोडीत काढण्याचा अश्वमेध आहे.


  लोकशाहीवर श्रद्धा ठेवणारी कोणतीही व्यक्ती या अभियानाशी समरस होऊ शकणार नाही, हे स्वाभाविकच आहे. हेच समीकरण ठेवले तर मलाही कर्नाटकमध्ये भाजपचा घोडा अडखळल्याने आनंद व्हायला पाहिजे होता. पण मी बंगळुरूतील मेळाव्याने किंचितही आनंदी झालेलो नाही. या घोडदौडीत भाजपला बहुमतापूर्वीच रोखणे किंवा बाजारातील किरकोळ विक्रीला ठोक खरेदी करूनच रोखणे वेगळी बाब आहे आणि अश्वमेध यज्ञाच्या घोड्याला अडवणे वेगळी बाब आहे. ही विरोधी एकता कितपत टिकाऊ असेल, याविषयी मला शंका नाही. त्यावर आताच काही बोलणे घाईचे ठरेल. बंगळुरूच्या विरोधी एकतेतील तमाम फोटोंपैकी एकही असा फोटो मला सापडला नाही, ज्यात तेथे हजर असलेले सर्वच विरोधी पक्षनेते एकदाच दिसले.


  मोठ्या ग्रुप फोटोमध्ये नायडू आणि ममता गायब आहेत. उर्वरित फोटोमध्ये हे दोघे आहेत तर इतर नेते नाहीत. नवीन पटनायक आलेच नाहीत. चंद्रशेखर राव आधी आले, नंतर निघून गेले. लालूंसोबत एकदा फोटो काढून फसलेले केजरीवाल या वेळी मात्र फोटोपासूनच दूरच राहिले.
  म्हणजेच अजूनही विरोधी एकता तेवढी पक्की झालेली नाही. एवढ्या कच्च्या दोरीने अश्वमेधाचा घोडा कसा बांधता येईल?


  विरोधी एकतेतून निवडणुकीत काय फायदा होईल, ही केवळ एक शंका नाही. खरे तर देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये भाजपविरोधी एकतेला काहीच अर्थ नाही. कारण या राज्यांमध्ये एक तर थेट काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना आहे किंवा भाजप तेथे एक महत्त्वाची राजकीय शक्ती नाहीच. या महाआघाडीचा फायदा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकसारख्या राज्यांपुरताच मर्यादित असू शकतो.


  या राज्यांमध्ये भाजपला दूर सारणाऱ्या प्रभावी आघाडीने ५० ते ७० जागांचा फरक पडू शकतो. या राज्यांमध्येही भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचा परिणाम भाजपचा जनाधार वाढण्यात होऊ शकतो, हेही लक्षात घ्यावे लागेल. माझी शंका यापुढची आहे. केवळ भाजपविरोधी एकतेतून जनतेच्या मनात आशा पल्लवित होतील का? आज देशाला केवळ विरोध नकोय, तर विश्वास हवाय. गेल्या चार वर्षांपासून मोदींच्या जुमल्यांनी त्रस्त झालेल्या जनतेला आता एका अशा नेतृत्वाचा शोध आहे, ज्याचे कर्म आणि आश्वासन या दोन्हींवर विश्वास करता येईल.

  बंगळुरूच्या ग्रुप फोटोमध्ये जनतेला असा एकही चेहरा दिसला नसेल का?
  निवडणूक हे केवळ मतांचे अंकगणित नसते. ज्यात दोन आणि दोन चार होतात. निवडणूक ही जनतेच्या विश्वासाशी निगडित असते. मोदी सरकारला पर्याय द्यायचा असेल तर देशासमोर एखादे भव्य स्वप्न उभे करावे लागेल. भाजपविरोधात जमलेला हा गोतावळा असे कोणते स्वप्न उभे करेल? बंगाल पंचायत निवडणुकीत तांडव घडवणाऱ्या ममता बॅनर्जींना बाजूला उभे करणारे राहुल गांधी देशाला मोदी आणि शहा यांच्या लोकशाहीविरोधी कारवायांतून मुक्ती देण्याचे स्वप्न दाखवू शकतील? शरद पवार, मायावती, लालूंचे पुत्र, चंद्रशेखर राव आणि करुणानिधी यांचे वारसदार देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे स्वप्न दाखवू शकतील? आझम खान यांची समाजवादी पार्टी (कदाचित शिवसेनादेखील) देशाला धर्मनिरपेक्षतेचा मार्ग दाखवू शकेल?
  सिद्धांत आणि नैतिकतेच्या गोष्टी सोडून दिल्या तरी ही विरोधी आघाडी एका भाजपला आव्हान देण्याजोगा संकल्प, ऊर्जा आणि रणनीती निर्माण करू शकेल? अमित शहा यांच्या निवडणुकीच्या मशीनसमोर कुणीही टिकू शकत नाही, यात काहीच शंका नाही.

  निवडणूक जिंकण्यासाठी राम, दाम, संघ, भेदासह प्रत्येक नैतिक-अनैतिक पद्धतीचा वापर होत असल्यास हे मशीन कुणी बंद पाडू शकेल का? काँग्रेसमध्येच मुळात संघटन नाही. मग ही उणीव कोण भरून काढेल? मग अश्वमेध यज्ञात काय होईल? कर्नाटक निवडणुकीनंतर प्रत्येकाच्या तोंडी हाच प्रश्न आहे. टीव्ही अँकरसह संपूर्ण देश अश्वमेधाला एक घोडदौड समजून बसलाय. प्रत्येक जण सट्टेबाजाच्या मानसिकतेत आहे. कोण जिंकेल? किती जागा येतील? कोण कुणासोबत जाईल? सरकार किती काळ चालेल?


  पण या अश्वमेधात प्रजासत्ताकरूपी अश्वाचे काय हाल होतील, याचा विचार कुणीच करत नाही. वैदिक परंपरेनुसार, विरोधी राजे अश्व पहिल्यांदा बांधतील किंवा त्याचा वध करतील. किंवा हा यज्ञ यशस्वी झाल्यास, विजयाचे प्रतीक असलेल्या अश्वाचे वाजत-गाजत स्वागत होईल. नंतर मंत्रोच्चारासह त्या अश्वाचा बळी दिला जाईल. वध किंवा बळी! आपल्या प्रजासत्ताकासमोर तिसरा कोणताही पर्याय उरलाच नाही का?

  - योगेंद्र यादव
  राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज इंडिया व राजकीय विश्लेषक

 • Yogendra Yadav write on 2019 election

Trending