आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रमता राम अकेला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाट्यमय सादरीकरणाची भारी हौस आहे. लंडनमध्ये बुधवारी सायंकाळी त्यांनी असाच एक शो सादर केला. प्रख्यात गीतकार प्रसून जोशी यांनी घेतलेल्या या फिल्मी मुलाखतीत मोदींनी कधी प्रश्नकर्त्यांकडून, तर कधी स्वत:च स्वत:चे गुणवर्णन करून घेतले. ब्रिटिश पार्लमेंटजवळील ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. युनोच्या पहिल्या सभेप्रमाणेच मार्टिन ल्यूथर किंग व महात्मा गांधी अशा दिग्गजांची भाषणे तेथे झाली आहेत. तेथे उपस्थित राहिलेल्या अनेक थोर नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व बळकट विचारसरणीचा प्रभाव ब्रिटिश जनतेवर बराच काळ राहिला. मोदींना ते साधणे शक्य नव्हते. मोदी काही वैचारिक खाद्य पुरवतील, नवा विचार देतील, अशी अपेक्षा नव्हती. पण निदान आपल्या चार वर्षांच्या कारभाराबद्दल काही स्पष्टपणे बोलतील असे वाटले होते. भारतातील पत्रकारांना ते क्वचित मुलाखती देतात व त्याही एकतर्फी असतात. भारतातील बहुसंख्य पत्रकार त्यांच्याविरोधी असल्याने कारभारातील बारीकसारीक त्रुटी भिंग लावून पाहत असतात हे खरे आहे. पण पत्रकारांचे ते कामच आहे व काँग्रेस सरकारबाबतही बहुसंख्य पत्रकार असेच काम करत होते. लंडनच्याच कार्यक्रमात मोदी म्हणाले की, लोकशाहीसाठी टीका आरोग्यदायी आहे. तेव्हा भारतीय पत्रकारांकडून टीकेचे डोस घेतले तर सरकार व मोदींचे आरोग्य टिकून राहील. पण ते न करता, परदेशात आपल्या कामगिरीचे आपल्याच तोंडून कौतुक करून घेण्यात मोदींंना काय आनंद वाटतो ते कळत नाही. आपल्या कामाचा लेखाजोखा परदेशस्थित भारतीयांसमोर मांडण्याऐवजी त्यांनी आधी स्वदेशात मांडला तर अधिक चांगले होईल. परदेश दौरे व कार्यक्रम जरूर करावेत, पण जनतेच्या पैशातून केलेल्या दौऱ्यांतून काय साधले हे भारतीयांना समजणे आवश्यक आहे. नेहरू तसे करत असत. मोदींनी लंडनमधील भारतीयांना एक प्रश्न विचारला की, तुमच्या पासपोर्टचे वजन वाढल्याचा अनुभव तुम्हाला येतो ना? उपस्थितांनी मान डोलावली व भारतीय पासपोर्टचे वजन भाजप सरकारमुळे वाढल्याचे श्रेय मोदींनी स्वत:च घेऊन टाकले. भारतीयांच्या पासपोर्टची किंमत वाढली ती जागतिकीकरणात भारत सहभागी झाल्यामुळे. त्यातही डिजिटल व्यवसायात भारतीयांनी वेळीच प्रवेश केल्यामुळे. या दोन्ही गोष्टींची सुरुवात नरसिंह राव व मनमोहनसिंग यांच्या काळात झाली व वाजपेयी यांनी त्याला अधिक चालना दिली.

 

भारतीयांनाच नव्हे, तर ब्रिटनमधील भारतीयांनाही उत्सुकता होती ती मोदी भारतातील घटनांबद्दल काय बोलतात याची. त्याबाबत पूर्ण निराशा झाली. लहान मुलींवरील बलात्कारांसंबंधी मोदींनी तत्त्वज्ञानाची भाषा केली व मुलांच्या पालकांना दोष दिला. बलात्कारासारख्या हिणकस वृत्तीला किंवा दलितांवरील अत्याचारांना भाजपचे आमदार-खासदार अप्रत्यक्षपणे समर्थन कसे देतात व मोदी त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक का करत नाहीत, हा प्रश्न मोदी समर्थकांनाही छळतो. परिवारातील अधम कार्यकर्त्यांची जाहीर झाडाझडती मोदी का घेत नाहीत? समाजातील दुर्बल घटकांसाठी अनेक कार्यक्रम राबवूनही मोदीविरोधी प्रचार त्या समाजाला का आकर्षित करतो? अल्पसंख्यांमध्ये दुराव्याची भावना का वाढते? प्रत्येक राजकीय पक्ष भाजपच्या विरोधात का जातो? आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुरेसा वेग का घेत नाही? आर्थिक गुन्ह्यांना अटकाव का होत नाही? नोटबंदीमुळे आर्थिक आरोग्य खरोखर सुधारले का व कसे? असे अनेक प्रश्न भारतीयांच्या मनात आहेत. लोक माझ्याकडून फार अपेक्षा करतात व म्हणून माझ्यावर टीका करतात असे मोदी आढ्यतेने म्हणाले. ते खरे आहे. पण अपेक्षा त्यांच्याकडूनच असल्यामुळे प्रश्नांची उत्तरेही त्यांच्याकडूनच मिळाली पाहिजेत. मोदी व्यक्तिमत्त्व विकासाचे बरेच धडे असल्या कार्यक्रमातून देतात. स्वप्नाळू भारतीयांना ते कदाचित आवडत असेलही. पण बहुसंख्य जनतेला व्यावहारिक उत्तरे हवी आहेत. मोदींनी काही पावले योग्य टाकली आहेत व काही वर्षांत त्याची चांगली फळे मिळतीलही. पण लोकांना ‘अच्छे दिन’चा साक्षात अनुभव येईल, असा कारभार अद्याप झालेला नाही. राव-मनमोहनसिंग यांच्या काळात पहिल्या तीन वर्षांतच उद्योजक, मध्यमवर्गापासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना परिस्थितीतील बदल साक्षात कळत होता. मोदींकडून तशा कारभाराची अपेक्षा आहे. एकमार्गी गुणगौरव करणाऱ्या मुलाखतींची नाही. मोदींनी त्यांच्या मनात दडलेल्या फकिरीबद्दल बोलताना ‘रमता राम अकेला’ या स्वत:च्याच जुन्या कवितेची आठवण करून दिली. काव्य म्हणून हे ठीक असले तरी जनता फकिरीत रमण्यास तयार नाही हे लक्षात घ्यावे.  

 

बातम्या आणखी आहेत...