Home | Editorial | Agralekh | article about pokharan test

पोखरणनंतरची अनास्था (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - May 15, 2018, 07:28 AM IST

पोखरणमध्ये भारताने दुसरी अणुचाचणी केली त्याला वीस वर्षे पूर्ण झाली. पहिली अणुचाचणी इंदिरा गांधींच्या काळात झाली होती

  • article about pokharan test

    पोखरणमध्ये भारताने दुसरी अणुचाचणी केली त्याला वीस वर्षे पूर्ण झाली. पहिली अणुचाचणी इंदिरा गांधींच्या काळात झाली होती, तर दुसरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात. जागतिक शक्तींचा दबाव झुगारून देत अणुचाचणी करण्याचे धैर्य इंदिराजी व वाजपेयी यांनी दाखवले आणि जगाबरोबर पुन्हा सौदार्हाचे संबंधही प्रस्थापित केले. भारताचा आत्मविश्वास वाढवणारी मुत्सद्देगिरीची ही उत्तम उदाहरणे. सध्या प्रत्येक घटनेला राष्ट्रप्रेमाशी जोडण्याची अहमहमिका लागलेली असते. अणुचाचणीच्या वीस वर्षांच्या निमित्ताने टीव्हीवर राष्ट्रप्रेमाचे प्रदर्शन करणारे कार्यक्रम झाले. भारताची त्या वेळची आर्थिक व लष्करी स्थिती पाहता भारताच्या संशोधकांचे यश स्पृहणीय ठरते. अणुऊर्जा आपल्याच जवळ ठेवण्याचा ठेका बड्या राष्ट्रांनी घेतला होता. अणुऊर्जेचा विवेकाने वापर करण्याची अक्कल केवळ आपल्यालाच आहे, असे या राष्ट्रांना वाटत होते. जगावर दोन महायुद्धे लादणारी तसेच घातक शस्त्रांची विक्री करणारी ही राष्ट्रे नैतिकतेचा टेंभा मिरवतात, कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे व त्या तंत्रज्ञानातून उभे राहिलेले बलवान लष्कर व अर्थव्यवस्था आहे. या दोन्ही गोष्टी नसताना भारताने अणुचाचणी करून दाखवली. भारताच्या बुद्धिवैभवाचे ते प्रदर्शन होते.

    मात्र, अणुचाचणीचे पुरेसे फायदे उठवण्यात आपले राज्यकर्ते कमी पडले. इंदिराजी व अटलजी यांनी दूरदृष्टी व धैर्य दाखवले. त्यामध्ये नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांचीही नावे जोडली पाहिजेत. राव व मनमोहनसिंग ही नावे पुढे आली नाहीत, पण या दोघांचे काम इंदिराजी व वाजपेयी यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे. राव यांच्या काळात म्हणजे १९९५-९६मध्येच अणुचाचणी करण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय काही तासांवर आला असताना प्रक्रिया थांबवण्यात आली. अमेरिकेला कुणकुण लागल्याने क्लिंटन यांनी दबाव टाकला व भारताला तो मानावा लागला. अणुचाचणीची बातमी परदेशी वृत्तपत्रांत छापून आली व नरसिंह राव हे अमेरिकेच्या दबावाला बळी पडले, असा प्रचार केला जातो. तथापि, सीतापती यांनी अधिकृत कागदपत्रांच्या आधारे लिहिलेल्या राव यांच्या चरित्रात वेगळा मुद्दा मांडला आहे. दोन प्रकारच्या चाचण्या भारताला करायच्या होत्या. पहिल्या चाचणीची तयारी पूर्ण झाली होती, दुसरीसाठी तीन महिन्यांचा अवधी लागणार होता. दोन्ही चाचण्या एकाच वेळी करण्यासाठी भारताकडूनच मुद्दाम बातमी फोडली गेली काय, अशी शंक्यता सीतापती यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीत पराभव होईल, असे राव यांना वाटले नव्हते. विजयी होताच चाचण्या करण्याची तयारी त्यांनी केली होती. पण राव पराभूत झाले व वाजपेयी सत्तेवर आले. वाजपेयी यांनी लगेच चाचण्या केल्या आणि त्याचे योग्य ते श्रेयही नरसिंह राव यांना दिले. सर्वकाही आमच्यामुळेच होत आहे, असा ताठा अलीकडे मिरवला जातो. तसे वाजपेयींनी केले नाही. तो सुसंस्कृतपणा त्यांच्याकडे होता. या चाचण्यांमुळे भारतावर निर्बंध आले असले तरी दबदबाही वाढला. भारत स्वतंत्रपणे अणुऊर्जा विकसित करणार, हे जगाला पटू लागले व त्यामुळेच भारताला आपल्यामध्ये सामील करून घेण्यास, नाइलाजाने का होईना, बडे देश तयार होऊ लागले. याचा फायदा मनमोहनसिंग यांनी उत्तम उठवला. भारताची वाढती बाजारपेठ जगापुढे ठेवून भारताला प्रचंड ऊर्जा लागेल व त्यातून प्रदूषण वाढेल. म्हणून प्रदूषण टाळणारी अणुऊर्जा आम्हाला हवी, असे सांगत त्यांनी अमेरिकेला भारताकडे वळवून ऐतिहासिक अणुकरार केला. ही फार मोठी घटना होती. त्यामध्ये अमेरिकेचाही स्वार्थ होता, पण भारताचा फायदा मोठा होता.

    दुर्दैवाने मनमोहनसिंगांच्या या प्रयत्नांना सोनिया गांधी व राहुल गांधींच्या राजकारणातून खीळ बसली. सरकारचे अग्रक्रम बदलले आणि अणुकराराचा फायदा आपण उठवू शकलो नाही. अणुकरारातून बड्या देशांशी अधिक घट्ट संबंध निर्माण करण्याची संधी होती. त्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आले असते व भारताची अर्थशक्ती कित्येक पटींनी वाढली असती. याशिवाय चीन-पाकिस्तानच्या विरोधात भारताच्या बाजूने बड्या देशांची मजबूत फळी उभी राहिली असती. ते काहीच होऊ शकले नाही. आज आपण ना अणुऊर्जेत स्वायत्त आहोत, ना तंत्रज्ञानात. आपली अण्वस्त्रेही अद्याप चाचणीच्या अवस्थेत असल्याने आपला लष्करी दबदबा निर्माण झालेला नाही. वीज क्षेत्राची दैना कायम आहे. तंत्रज्ञान देण्यास अन्य देश उत्सुक नाहीत. अणुचाचणी करून आपल्या संशोधकांनी बौद्धिक क्षमता दाखवल्या, पण त्याचा व्यावहारिक फायदा करून घेण्यात राजकीय नेते अयशस्वी ठरले, असे निदान आत्ताचे चित्र आहे. मनमोहनसिंगांना जे काम सोडावे लागले तिकडे मोदी लक्ष देतील असे वाटले होते. पण सोनिया-राहुलप्रमाणेच मोदींचे अग्रक्रम वेगळे आहेत. अणुचाचणीनंतरची वीस वर्षे फुकट घालवली आहेत व आणखीही जाणार, असे दिसते.

Trending