Home | Editorial | Agralekh | article on indian football team captain sunil chatri

छेत्रीची खंत (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - Jun 07, 2018, 06:07 AM IST

भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फुटबॉल स्पर्धा फारशा होत नाहीत. ज्या होतात त्या स्थानिक पातळीवरच्या. त्याला मिळणारा प्र

  • article on indian football team captain sunil chatri

    भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फुटबॉल स्पर्धा फारशा होत नाहीत. ज्या होतात त्या स्थानिक पातळीवरच्या. त्याला मिळणारा प्रतिसाद यथातथाच असतो. मुंबईत सुरू असलेल्या चार देशांच्या इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल स्पर्धेला तुरळक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. भारताने चायनीज तैपेईला पाच विरुद्ध शून्य गोलने हरवले, पण या सामन्याला केवळ अडीच हजार प्रेक्षक हजर असल्याने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री दुखावला. त्याने ट्विटरवरून भारतीय प्रेक्षकांना आवाहन केले की, आमचा खेळ स्पॅनिश वा युरोपियन लीगसारखा दर्जेदार नसेल, पण आम्ही त्या खेळाडूंसारखीच मेहनत घेतो. ती मेहनत पाहायला स्टेडियमवर या. आमच्यावर टीका करा, आमच्यावर ओरडा, पण आमचा खेळ पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित राहा. सुनील छेत्रीचे हे आवाहन मुंबईतल्या शौकिनांनी इतके मनावर घेतले की, मंगळवारी केनिया विरुद्ध झालेल्या सामन्यात अंधेरीमधील संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी भरून गेले. सर्व तिकिटे विकली गेली.


    योगायोगाची गोष्ट अशी की, सुनील छेत्रीचा तो शंभरावा सामना होता आणि त्याने या सामन्यात २ गोल करून प्रेक्षकांच्या लक्षणीय उपस्थितीला कुर्निसात केला. आम्हाला प्रेक्षकांनी असा पाठिंबा दिला तर मैदानात आम्ही जीवही देऊ, असे भावनिक उत्तरही त्याने सामना संपल्यानंतर दिले. सुनील छेत्री हा गुणी खेळाडू आहे. त्याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील कामगिरीही उत्तम आहे. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात आजपर्यंत ६१ गोल केले असून आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये त्याने तिसरे स्थान कमावले आहे. अशा मेहनती खेळाडूला भारतीय फुटबॉलची अवस्था नक्कीच माहीत आहे. हा देश प्रचंड क्रिकेटवेडा आहे. पण जग हे फुटबॉलवेडे आहे याचीही त्याला जाण आहे. भारतीय फुटबॉल शौकिनाला देशी फुटबॉलपेक्षा युरोप व इतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये रस आहे हेही त्याला जाणवते. त्यामुळे या देशातला फुटबॉल अधिक तंत्रशुद्ध करण्यासाठी त्यामध्ये थरार, रोमांच. चापल्य आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार याचेही त्याला भान आहे. तरीही त्याने हे आवाहन केले ते प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा म्हणून. त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे. कारण कोणताही खेळ लोकप्रिय होण्यामागे प्रेक्षकांचा दबावगट कारणीभूत असतो. प्रेक्षकांना खेळातला थरार आवडतो. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये १७ वर्षांखालील कुमारांची १७ वी फिफा फुटबॉल स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण सामने झाले ५२ व प्रत्येक सामन्याला सरासरी २५ हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. ही स्पर्धा दर्जेदार होईल याची ग्वाही फिफाचे तांत्रिक अभ्यास गटाचे सदस्य, इंग्लंडच्या आर्सेनल फुटबॉल संघ व इंग्लंडच्या संघाचे माजी खेळाडू सोल कॅम्पबेल देत होते. त्यांचे म्हणणे होते की, फुटबॉलचे तांत्रिक कसब, खेळाचं सर्वांगीण ज्ञान, डावपेच, खेळाडूंचे पोझिशनिंग यामध्ये विलक्षण सुधारणा झाली असल्याने भारतातील ही स्पर्धा फुटबॉल शौकिनांची मने जिंकेल. कॅम्पबेल यांनी म्हटल्याप्रमाणे शौकिनांनी भरभरून प्रतिसाद दिला. देश-विदेशातील कुमारवयीन फुटबॉलपटूंचा खेळ त्यांना पाहता आला.

    खेळाची लोकप्रियता ही खेळातील थरार, खेळाडूंचा फिटनेस, त्यांच्या चापल्यावर अवलंबून असते. कबड्डीसारखा देशी खेळ आज घराघरात लोकप्रिय झाला तो या खेळात येणारे नव्या दमाचे तजेलदार, तंदुरुस्त खेळाडूंमुळे. भारतीय क्रिकेटही फुलत गेले ते खेळाडूंनी घेतलेली अथक मेहनत, त्यांनी रचलेल्या विक्रमांनी. क्रिकेटला मार्केटिंगची जोड मिळाली ती या खेळात असणाऱ्या लवचिकतेमुळे. सुनील छेत्रीच्या भारतीय फुटबॉल जगण्याविषयीच्या तळमळशी आपण सर्वच जण सहमत असू. पण या खेळावर भारतात जेवढी मेहनत घेतली जाणे अपेक्षित आहे ती घेतली जात नाही. फुटबॉलमध्ये नवनवे येणारे तंत्रज्ञान, डावपेच, कौशल्य यांचा भारतीय फुटबॉलमध्ये समावेश होताना दिसत नाही. कारण या देशात चांगले खेळाडू जन्मास येतात, पण त्यांच्यापर्यंत तंत्रकौशल्य पोहोचू शकत नाही. त्यामुळे एकही भारतीय खेळाडू युरोपियन किंवा स्पॅनिश लीगमध्ये खेळताना आढळत नाही. परिणामी भारतीय फुटबॉल शौकिनांचा कल देशीपेक्षा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने पाहण्याकडे अधिक असतो. हे शौकीन रात्ररात्र जागवत सामने पाहत असतात, तरुणांमध्ये बार्सिलोना, अर्सेनल, मँचेस्टर क्लबच्या चर्चा रंगत असतात. सध्या वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तिचे वेध कोट्यवधी शौकिनांना लागलेले आहेत. आपल्याकडे जाणकार प्रेक्षक तयार आहेत, पण उत्तम खेळाडू नाहीत. छेत्रीची खंत योग्य आहे, पण तसा थरार भारतीय फुटबॉल खेळाडूंच्या खेळातही हवा.

Trending