आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संस्कृतीचा सम्यक विचारवंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार, १७ जून २०१८ रोजी नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या वैचारिक भूमिकेचा धावता परिचय करून देणारा हा लेख...

 

‘दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करत असतानाच आपल्याकडून इतरांवर आणि विशेषत: आपल्याहून दुर्बल असलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल.’  
- डॉ. आ. ह. साळुंखे   
(वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी, एक्सप्रेस पब्लि. हाऊस, कोल्हापूर, द्वि. आ. ६ वे पुनर्मुद्रण, पृ.क्र.१२६)  


महाराष्ट्राच्या उज्ज्वल वैचारिक परंपरेतील प्रभावी विचारवंत म्हणून आ. ह. साळुंखे यांचा सर्वदूर परिचय आहे. जवळपास चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांच्या लेखनातून प्रबोधनासाठी वैचारिक आणि भावनिक मशागत होत आली. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन प्राच्यविद्येच्या क्षेत्रात असाधारण कामगिरी त्यांनी केली. टोकदार आणि विसंवादी वातावरणात त्यांनी सहअस्तित्वाचा आणि हिंसेविना परिवर्तनाचा विचार मांडला. विवेक, संयम आणि सुसंवादातून समाजाचे प्रश्न सोडवता येतात, याचे भानही दिले. आजवर त्यांचे पन्नासहून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांनी वैचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रकारचे लेखन केले.

 

हे लेखन विलक्षण विचारप्रवर्तक आणि प्रतिभासंपन्न आहे. अनिष्टाला नकार आणि सर्जनशील पर्यायांची रुजुवात हे त्यांच्या एकूण लेखनाचे सूत्र दिसून येते. त्यांचे लेखन आणि सामाजिक चळवळीतील कार्य सातत्यपूर्ण आहे. भारतीय समाजातील धर्माच्या अनन्यसाधारण महत्त्वाची जाणीव त्यांना आहे. त्या अनुषंगाने त्यांनी धर्माचा पर्यायाने धर्मशास्त्राचा अभ्यास केला. त्यांच्या मते, धर्मात अनेक गंभीर दोष असले तरी त्याला प्रभावी पर्याय मात्र अनुपलब्ध आहेत. परिणामी धर्माने लोकांचा कितीही विनाश केला तरी लोक त्याला सोडायला तयार होत नाहीत. अशा स्थितीत लोकांच्या मनाचे प्रबोधन करण्यासाठी प्राथमिक पातळीवर काही कृतींची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने नृत्य, संगीत, शिल्प, चित्र, साहित्य यांसारख्या कलांमधून धर्मातीत, धर्मनिरपेक्ष अथवा किमान धर्मसमन्वयाचा आशय समाजासमोर आणणे त्यांना आवश्यक वाटते.

 

याशिवाय धर्माचा प्रभाव वाढवण्यात व टिकवून ठेवण्यात धार्मिक स्थळे आणि त्यांचे स्थान माहात्म्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याचा निर्देश करून ते परिवर्तनवादी व्यक्तींच्या स्थानांचे माहात्म्य वाढवण्याचा विचार मांडतात. असे करताना त्यास धार्मिक चाकोरीचे वळण लागणार नाही, याची खबरदारीही घेण्याचे सुचवतात. त्यांच्या मते, धर्म आणि विज्ञान यांचा संतुलित स्वीकार आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना विवेकाला प्रमाण मानणे अत्यावश्यक वाटते.  
डॉ. साळुंखे यांच्या धर्मचिंतनाचा फार मोठा भाग हा धर्मचिकित्सेचा आहे. ही चिकित्सा धर्माचा शोषणासाठी वापर करणाऱ्या विचारसरणीविरुद्ध आहे. त्यासाठी ते सर्वसामान्य धर्मनिष्ठ माणसांना दोषी मानीत नाहीत. इतकेच नव्हे, तर सामान्य धर्मनिष्ठ माणसाचा आपण तिरस्कारही करू नये, असेही त्यांचे मत आहे. धर्मचिकित्सा करणे म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणे, असा एक ग्रह समाजात प्रचलित आहे.

 

तो बराच दृढही आहे. मात्र, तो पूर्वग्रहावर आधारित आहे. धर्मचिकित्सकाची बाजू नीट समजून न घेता, घाईघाईने आणि बरेचदा चतुराईनेही असा ग्रह पसरवण्यात येतो. यासंदर्भात त्यांचे मत असे की, वैदिक धर्मात चातुर्वर्ण्यासह शोषणाचे इतर अनेक घटक आहेत. त्यांची चिकित्सा करताना ब्राह्मण्याची चिकित्सा अपरिहार्य ठरते. या मताकडे बघता असे दिसून येते की, ही अपरिहार्यता म्हणजे द्वेष नव्हे, हे समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. साळुंखे यांनी वेदवाङ््मयातील आख्यायिका व स्मृती, पुराणे आणि महाकाव्ये यांच्यातील अनेक कथांचीही चिकित्सा केली आहे. या कथा काल्पनिक व कालबाह्य असल्या तरी इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी त्या अतिशय उपयुक्त आहेत, या दृष्टिकोनातून ते या कथांकडे बघतात.  


डॉ. साळुंखे यांच्या धर्मविषयक चिंतनाचा एक भाग हिंदू-मुस्लिम यांच्यातील चर्चेचा आहे. हिंदू-मुस्लिमांमधील वादविवाद सोडवण्यासाठी या दोन्ही घटकांनी परस्परांसोबत सामंजस्याने राहणे, हाच परिणामकारक उपाय ते दर्शवतात. यासाठी त्यांनी दोन्ही समाजांतील लोकांनी एकमेकांविषयी बाळगलेल्या चुकीच्या प्रतिमांचा त्याग करण्याचेही आवाहन केलेले आहे. धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता हा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा आहे. बहुजनाच्या प्रगतीच्या दिशा खुल्या होणाच्या दृष्टीने त्यांना धार्मिक स्वातंत्र्य हे अनन्यसाधारण वाटते. त्या दृष्टीनेच पर्यायी धर्मविचारांची मांडणी ही त्यांनी केली आहे. ही मांडणी वर्तमान सामाजिक स्थितीगतीच्या पार्श्वभूमीवर पुढे आलेली आहे.   


वर्तमानाचे नीट आकलन करून घेणे आणि भविष्यकाळातील वाटचालीची दिशा ठरवणे यासाठी त्यांना इतिहास महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या मते, इतिहासाच्या प्रेमात अडकून वर्तमान दुर्लक्षित करणे योग्य नाही. इतिहास हा कितीही उदात्त आणि भव्य असला तरी ती केवळ एक स्मृती असते. त्यातून भावी काळात चांगले करण्याची प्रेरणा घेतल्यास काही चांगले घडू शकेल. मात्र, त्याच्यात गुणगौरवात अडकून पडल्यास मानवी समाजाची प्रगती शक्य नाही. इतिहास संशोधनात साधन म्हणून उपलब्ध असणाऱ्या लेखन/वाङ््मयीन पुराव्यांची सत्यासत्यता तपासण्यासाठी प्रक्षेप, रूपांतरे आणि भाषांतरे यांची दखल घेण्याची आवश्यकता त्यांनी दर्शवली आहे. इतिहासाचे महत्त्व आणि मर्यादा याविषयीचे त्यांचे प्रतिपादन मौलिक आहे. मिथके, लोककथा आणि दंतकथा यांचा इतिहासलेखन करत असताना साधन म्हणून तारतम्याने वापर करण्यावरही त्यांनी भर दिलेला आहे.  


चिकित्सेच्या कसोट्यांवर इतिहासाविषयी समोर येणारे संशोधन पुढे येत असते. अशा संशोधनांचा शाळा आणि विद्यापीठ अशा औपचारिक शिक्षणात अंतर्भाव करण्याला ते महत्त्वाचे मानतात. आपल्या गटाच्या स्वार्थासाठी/वर्चस्वासाठी आजवर ज्यांनी इतिहासात अनेक चुकीच्या बाबी घुसडल्या त्यांच्या आजच्या वंशजांना इतिहासातील चुकांसाठी दोषी धरता कामा नये, असेही त्यांनी निक्षून सांगितले आहे. जातीय ओळख न बाळगता भारतीय संविधानाने दिलेली ‘नागरिक’ ही ओळख त्यांना महत्त्वाची वाटते. त्यांनी जातिसंस्थेच्या व्यावहारिक बाजूंकडे लक्ष वेधले आहे.    


त्यांच्या मते, प्रबोधन म्हणजे मानवमुक्तीच्या चळवळीच्या कळीचे पूर्णपणे उमललेल्या फुलात रूपांतर होणे होय. ते करण्यासाठी व्यक्तीने सर्वप्रथम स्वत:चे प्रबोधन करावे. शिकण्याआधीच इतरांना शिकवायला निघणे, त्यांच्या मते उचित नाही. उलट असे झाल्यास प्रबोधनाच्या बाबतीत घातकच कृती घडू शकते. प्रबोधन करण्यापूर्वी ज्यांचे प्रबोधन करायचे आहे, त्यांचा नीट अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मांडले आहे. असा पूर्व अभ्यास असल्याखेरीज कुशलतेने प्रबोधन करणे शक्य होत नाही. आत्मपरीक्षण, स्वयंशिस्त, संवाद कौशल्य, संघटन कौशल्य, विवेक, संयम, नवीन बदलांचा स्वीकार, श्रवणशीलता, दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणे, नम्रता, मर्यादांची जाण, संवेदनशीलता, चिकित्सेचा सम्यक दृष्टिकोन यांसारख्या गुणांच्या संदर्भात त्यांनी तपशीलवार सोदाहरण चर्चा केली आहे.

 

प्रामुख्याने चळवळीमधील व्यवहार अधिक निकोप होऊन चळवळी यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्यांचे हे प्रतिपादन महत्त्वाचे आहे. एकूणच, आ. ह. साळुंखे यांच्या लेखनातील भारतीय संस्कृतीचा सम्यक विचारच व्यक्त होत आहे. भारतीय भूमीतील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचा विचारवारसा लेखनातून आणि जीवनकार्यातून व्यक्त होत आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना मन:पूर्वक सदिच्छा!

 

भगवान फाळके
phalke_b @rediffamil.com

बातम्या आणखी आहेत...