आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : लगीन घाईत, अपघात टाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यातील शिरवाडेवणी फाट्यावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका क्रूझर गाडीला भीषण अपघात झाला. त्यामध्ये आठ जणांचा हकनाक बळी गेला. मृतांमधील आठपैकी सात महिला होत्या. त्यात एका लहान मुलीचाही समावेश होता. 


राज्य परिवहन महामंडळाची बस अन्् क्रूझर यांच्यात धडक झाल्यानंतर हा अपघात झाल्याचा खुलासा नेहमीप्रमाणे पोलिसांकरवी केला गेला. पोलिस खात्याच्या शिरस्त्यानुसार तपास सुरू होईल, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, अपघाताची भीषणता व मृतांच्या संख्येमुळे आपसूक प्राप्त होणारी गंभीरता लक्षात घेऊन आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकरवीही अपघाताच्या कारणांच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न होईल. दोन-चार दिवस पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होईल. सगेसोयरे वा नातेवाईक यांच्यासह अन्य काही आप्तस्वकीय शोकसागरात बुडालेले असतील. सर्वत्र धीरगंभीर वातावरण बघावयास मिळेल. हे सारे वातावरण घटना घडल्यापासून पुढचा आठवडाभर वा अजून काही दिवस जडत्व प्राप्त झाल्यागत असेल. हा झाला मनुष्य स्वभावाचा भाग. खरा प्रश्न असा आहे की, असे अपघात आपल्याला टाळता येणे शक्य नाही का? कारण, लग्नसराई सुरू झाली की देश-राज्य वा जिल्ह्याच्या ठिकाणांहून हमखास अशा अपघातांच्या बातम्या यायला सुरुवात होते. कधी कधी तर त्यातील मृतांचा आकडा ऐकूनच मन सुन्न होते. लग्नबेडीत अडकल्यानंतर आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेव-नवरीला एकाच वेळी मृत्यूने कवटाळलेले असते वा दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो अन्् एक जण बचावतो. 


अपघातानंतर प्रसारित होणाऱ्या या बातम्या खरं तर समाजमन हेलावून टाकतात. त्याहीपेक्षा या अपघातामध्ये कुठल्या तरी कुटुंबाचा प्रमुख असलेला पुरुष वा महिला जेव्हा दगावते तेव्हा त्या पाच-दहा सदस्यांच्या कुटुंबावर दु:खाचे काय आभाळ कोसळत असेल याचा विचारच करवला जात नाही. त्यातही कुटुंबातील नुकताच हाताशी आलेला वा एकुलता एक कर्ता मुलगा गेला तर ही बातमी अंगावर शहारे आणते. अपघातातील मृतांची हृदय पिळवटून टाकणारी असंख्य दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याउपरही ना अपघातांचे प्रमाण कमी झाले, ना मृतांचा आकडा कमी होताना दिसतो आहे. शिरवाडेवणी फाट्यावरील अपघात हा त्याच मालिकेतील एक दु:खदायक घटना आहे. अशा घटना वारंवार घडताहेत. त्यात कुठेही खंड पडताना दिसत नाही. पण लोक अशा गंभीर घटनांमधून धडा घ्यायला तयार नसल्याचे विदारक चित्र आहे. आर्थिक स्थिती बिकट वा गरिबीची पार्श्वभूमी हे एक प्रबळ कारण अवैध वाहतुकीच्या मागे असते. त्याहून अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव हे कारण त्याच्या केंद्रस्थानी आहे. 


राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या लग्नसराईमध्ये वेळच्या वेळी अन्् पुरेशा रस्त्यावर धावल्या तरी गाव-खेड्याकडची मंडळी आत्मघाती पथकासारख्या वावरणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहनांमधून प्रवास करणे टाळू शकतील. तीच व्यवस्था नेमकी तोकडी पडते आहे. हा एक भाग असला तरी काही मंडळीची मानसिकता ही माणसांना ढोरांसारखं कोंबून नेणाऱ्या वाहनातूनच प्रवास करण्याची असते. कारण त्यामुळे शंभर-दीडशे किलोमीटरचा प्रवास थोडक्या पैशात होऊ शकतो, अशी त्यांची दाट धारणा आहे. आनंदाच्या भरात प्रवासही सुरू होतो. पण जे वाहन भाडोत्री घेतले त्याची स्थिती काय आहे? त्याच्या टायरची अवस्था, ब्रेक, आसनव्यवस्था, चालकाची सवय याचा विचार होत नाही. फक्त त्यामध्ये मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळी बसतात की नाही याचा सरधोपट विचार केला जातो. मग जेव्हा अपघात होतो अन्् त्यात अनेकांचा जीव जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कुटुंबातीलच जेव्हा दोन-तीन वा कधी कधी तर अख्ख्या कुटुंबातील सदस्य मृत्यूच्या दाढेत लोटले गेल्यावर आयुष्यभर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. 


लग्नसराईमध्ये आनंदाच्या भरात अवैध वाहनातून प्रवास करण्याचे टाळलेले बरे. विशेषत: ज्या वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असतील अशा वाहनांपासून चार हात दूरच राहिले पाहिजे. अशा काळात जशी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, तशीच ती पोलिसांनी व प्रादेशिक परिवहन खात्याच्या मंडळींनीही घ्यायला हवी. प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कठोर पावले उचलली गेली तर राज्य असो की राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघातांना ब्रेक लागू शकतो. त्याबरोबरच अशा अपघातांमध्ये हकनाक बळी जाणाऱ्या निष्पाप जिवांचाही जीव वाचू शकतो, त्यासाठी केवळ घाई टाळावी लागेल. 

- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...