प्रासंगिक : आंबेनळी घाटात निष्पापांचा बळी
महाबळेश्वर-पोलादपूर या वर्दळीच्या रस्त्यावरच्या आंबेनळी घाटातील खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात झाला.
-
महाबळेश्वर-पोलादपूर या वर्दळीच्या रस्त्यावरच्या आंबेनळी घाटातील खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये तब्बल ३० जिवांचा बळी गेला. त्याच्याशी संबंधित छायाचित्रे अन् त्यातील मृत प्रवाशांच्या हाडा-मांसाचा चिखल पाहताना अंगावर शहारे येत होते. अलीकडच्या काळात आंबेनळीसारख्या असंख्य घटना देशपातळीवर मोठ्या प्रमाणात घडल्याचे दिसत आहे. उत्तराखंडमधील पिथोरागड येथेही प्रवाशांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळून क्षणार्धात पन्नासहून अधिक प्रवासी मरण पावले. नाशिक जिल्ह्यातच गेल्या पंधरवड्यात सलग अपघात होऊन त्यात सुमारे ३५ च्या आसपास लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. हा सगळा घटनाक्रम येथे नमूद करण्याचे कारण असे की, वेगवेगळ्या अपघातांमध्ये निष्पाप जिवांचा घाऊक प्रमाणात बळी जाण्याच्या घटनांमध्ये खंड पडताना दिसत नाही. सर्वाधिक गंभीर तसेच जिवाला चटका लावणारी बाब म्हणजे कुठल्या ना कुठल्या घाटात बस कोसळते अन् त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे, हे विदारक वास्तव डोळ्यादेखत असताना त्यापासून धडा घ्यायला कुणीच तयार नाही. लग्नसराईत वऱ्हाडी मंडळींची अवैधरीत्या वाहतूक राजरोसपणे होताना दिसते आहे. महामार्गावरील पोलिसांच्या गस्ती पथकाच्या नाकावर टिच्चून अशी वाहतूक होते, पण पोलिसांनी अशा वाहनांविरुद्ध धडक कारवाई केली, चालकाला वा मालकाला दंड केला, वाहन जप्त केले, वेळप्रसंगी चालकाला पोलिसी खाक्या दाखवला असे झाले असेल तर माहीत नाही. पण, आजवर अशा रीतीची कारवाई केल्याचे मुळीच ऐकिवात नाही. कारण, पोलिसांकरवी गुन्ह्याचा शोध लागला वा अवैध दारू पकडली अथवा जुगार अड्ड्यावर छापा मारला की लागलीच प्रेस नोट प्रसिद्धीसाठी पाठवली जाते. परंतु अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालट्रक, टेम्पो, जीपगाड्या यांच्यावर तर कोणाचाच वचक राहिलेला ना,ही हे चित्र सार्वत्रिक झाले आहे.
कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना महाबळेश्वरकडे घेऊन जाणारी बस रस्त्यावर धावण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होती की नाही याचा उलगडा चौकशीत होईलच, पण त्या अपघाताचे जे एक कारण बचावलेल्या एकमेव जखमी प्रवाशाकडून उजेडात आले ते वरकरणी क्षुल्लक वाटत असले तरी अतिशय गंभीर आहे. चालत्या वाहनातील प्रवाशांच्या गप्पागोष्टींकडे कान देऊन प्रसंगी त्यांना दाद देण्याच्या नादात वाहनचालकाचा बसवरील ताबा सुटला अन्् ती खोल दरीत जाऊन कोसळली. कोणत्याही वाहनाचे सारथ्य करणाऱ्या सारथ्याने अर्थात चालकाने आपले सर्व लक्ष वाहन चालवण्यावरच केंद्रित करायला हवे, हाच धडा आंबेनळीच्या अपघाताने समोर ठेवला आहे. छोट्या-मोठ्या गावांना जोडणारे रस्ते असो की राज्य वा राष्ट्रीय महामार्ग, यावर चालकांना मार्गदर्शक ठरतील असे फलक लावलेले असतात. चालकांनी काय काळजी घ्यावी. वेगावर नियंत्रण ठेवावे. वेळच्या वेळी ब्रेक तपासून पाहावेत. नशापान करून वाहन चालवू नये इथपासून ते समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना चुकीच्या दिशेने करू नये इथपर्यंतच्या मार्गदर्शक सूचना ठळकपणे लावलेल्या असतात. वाहन हाकताना मोबाइलवर बोलू नये, असे एक मार्गदर्शक तत्त्व आहेच, त्यात आता नव्याने चालकाने वाहन हाकताना प्रवाशांशी बोलू नये असाही दंडक घालण्याची वेळ आली आहे. वास्तविकत: गेल्या दशकभरापासून देशातील बव्हंशी रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण झाले वा अनेक ठिकाणी हेच काम प्रगतिपथावर आहे. महाराष्ट्रातील खंबाटकी, लोणावळा, कसारा, राहुड, भाबडबारी, कन्नड, चंदनापुरी यांसह रत्नागिरी वा कोल्हापूर पट्ट्यातील बहुतेक घाटांतील रस्ते रुंद करण्यात आले आहेत. घाटात दरडी कोसळून रस्ते बंद पडू नयेत म्हणून डोंगरांनाच भरभक्कम तारांच्या आवरणाने बांधून ठेवण्याचे तंत्र अमलात आणले गेलेे. ज्या घाटात पूर्वी मोठ्या मुश्किलीने एखादे वाहन चालू शकत होते, त्या ठिकाणी आजच्या घडीला एकाच वेळी दोन चारचाकी वाहन हाकणे सोपे झाले आहे. एकेरी रस्ते दुपदरी वा काही ठिकाणी तर चौपदरी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची वाहतूक क्षमता वाढलेली असताना अपघातांचे प्रमाण कमी व्हायला हवे होते, पण ते होताना दिसत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे आजही चालक अर्थात ड्रायव्हर या घटकाचे प्रबोधन होणे अगत्याचे वाटते. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या मानसिकतेपासून ही मंडळी कोसोदूर असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. आंबेनळी घाटातील अपघाताची पुनरावृत्ती टाळायची असेल तर महामार्ग पोलिसांची रस्त्यावरील गस्त वाढतानाच वेगवान वाहनांवर वेळीच नियंत्रण अन् बेफाम चालकांना वेसण घालणे काळाची गरज आहे.
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक