Home | Editorial | Columns | Column article about Artificial meat in the world food culture

जागतिक खाद्यसंस्कृतीत कृत्रिम मांसाची भर

समीर गायकवाड | Update - Jul 21, 2018, 07:45 AM IST

१२ जुलै रोजी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) एक लोकबैठक बोलावली होती.

 • Column article about Artificial meat in the world food culture

  १२ जुलै रोजी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता 'प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा'. या बैठकीत FDAने उपस्थितांना, संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत ऊती-अमांस) अशी नावे या वेळी सुचवली गेली.


  'द अॅटलांटिक' या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा 'द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट' हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षली गेली होती, त्याबाबतीतचा हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. १२ जुलै रोजी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता 'प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा'. या बैठकीत FDAने उपस्थितांना, संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत ऊती-अमांस) अशी नावे या वेळी सुचवली गेली. खरे तर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत याची ही चाचणी होती.


  प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मांसावर संशोधन अनेक वर्षे सुरू होते. सायन्स जर्नलमधून त्यावर दोनेक शोधनिबंध प्रकाशित झाले होते. खरे तर 'क्लोनिंग'च्या प्रयोगानंतर कृत्रिम अवयव बनवले जाऊ लागले, स्टेमसेल (कोशिका) हा बायोटेक्नोलॉजीचा मूलमंत्र झाला. कृत्रिम रक्तापासून ते मातीशिवाय चारा उगवण्यापर्यंत अनेक मौलिक शोध लावले गेले. अवकाशयानातील अंतरिक्ष चमूसाठी कॉम्पॅक्ट फूडची निर्मिती आकार घेत होती. किमान आकाराच्या व वजनाच्या अन्नात जास्तीत जास्त कॅलरीज आणि जास्तीचे प्रोटिन्स असणाऱ्या डाएटच्या निर्मितीस वेग आला होता. २००२ मध्ये नासा व तुर्की सरकारच्या एका शोध प्रकल्पाच्या पुढाकाराने प्रयोगशाळेत निर्मिलेले मानवी आहारास योग्य पहिले सामिष भोजन आकारास आले. ती डिश होती,गोल्डफिशच्या स्टेमसेल्सपासून बनवलेल्या फिश फिलेट्सची (माशाचे काप). याच वेळी दबक्या आवाजात कृत्रिम बीफची चर्चा सुरू झाली.


  खरे तर या विषयावरची पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया विन्स्टन चर्चिल यांनी १९३१ मध्ये 'पॉप्युलर सायन्स' या अमेरिकी नियतकालिकाला दिली होती. तेव्हा चर्चिल म्हणाले होते की, 'कोंबडीची एक तंगडी किंवा तिच्या शरीराचा काही भाग खाण्यासाठी अख्खी कोंबडी मारण्यापेक्षा जर तेवढंच मांस जर आपण योग्य माध्यमात वाढवू शकलो तर अख्खी कोंबडी पोसायची गरज भासणार नाही.' याकडे एक कल्पनाविलास म्हणून तेव्हा पाहिलं गेलं. १९७१ मध्ये रसेल रोस यांनी मसल फायबर बनवलं. १९९८ मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन व्हेन यांनी प्राणिज पेशीपासून प्रयोगशाळेत निर्मिलेल्या आहारयोग्य मांसाच्या पेटंटसाठी अर्ज केला. या पेटंटनुसार मांसात बाह्यवर्धित स्नायू आणि चरबीच्या समावेशास अनुमती होती. २००१मध्ये हॉलंडचे त्वचाविकार अभ्यासक विल्यम व्हॅन एलेन यांनी मानवी आहारयोग्य कृत्रिम मांस बनवून प्रक्रियाजन्य पद्धतीने जागतिक स्तरावर विकण्यास अनुमतीचे पेटंट मिळवले. २००३ मध्ये हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या ओरॉन कॅट्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही सेंटिमीटर लांबीची मसल स्टिक निर्माण केली. २००५ मध्ये टिश्यू इंजिनिअरिंगच्या सायन्स जर्नलमध्ये प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढवलेल्या मांसावरचा शोधनिबंध प्रकाशित केला तेव्हा 'पेटा'चे (PETA) याकडे लक्ष वेधले गेले. मग गुगलसह अनेकांनी याकडे ध्यान वळवले. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या अन्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा प्राणिरक्षण, भूतदयेसाठी काम करणाऱ्या 'पेटा'चे कान टवकारले. 'पेटा'ने २००८ मध्ये कृत्रिम मांस बनवणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला १० लाख डॉलरचं बक्षीस देण्यात येईल, असं जाहीर केलं. तेव्हा बराच उहापोह झाला. लोकांनी हा पैशाचा अपव्यय असल्याचं म्हटलं तेव्हा तासाला दहा लाख प्राणी मारले जातात, त्यांच्या जिवासाठी दहा लाख डॉलरचा निधी वाया गेला तरी हरकत नाही, अशी आग्रही भूमिका 'पेटा'ने घेतली. यापुढे जात नेदरलँड्सनं २०१२मध्ये ४० लक्ष अमेरिकी डॉलर अनुदान प्रयोगशाळेत मांसनिर्मिती करण्याच्या संशोधनासाठी जाहीर केलं. पण त्याही आधी अशा प्रकल्पासाठी अमाप पैसा उपलब्ध होऊ लागला. याची योग्य ती परिणती होऊन आता हे मांस बाजारात येण्याची चिन्हे आहेत.


  ५ ऑगस्ट २०१३ रोजी नेदरलँडस्थित 'मॅस्ट्रिश्ट युनिव्हर्सिटी'तील प्रा. मार्क पॉस्ट यांनी प्रयोगशाळेत निर्मिलेल्या बीफपासून तयार केलेल्या बर्गरला प्रेसपुढे सादर केले. या बीफपासून तयार केलेले बर्गर अत्यंत सुरक्षित आणि नेहमीच्या बर्गरइतकेच पौष्टिक असल्याचा त्यांचा दावा होता. असे कृत्रिम पदार्थ तयार करून जगभरातील कोट्यवधी कुपोषितग्रस्तांसाठी तजवीज करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रयोगशाळेत केवळ १४० ग्रॅम वजनाचे (अंदाजे ५ औंस) बीफ (गायीचे मांस) तयार करण्यासाठी अडीच लाख युरो (३,३० हजार डॉलर अर्थात १ कोटी ९९ लाख ८० हजार रुपये) खर्चण्यात आले होते. या बीफच्या निर्मितीसाठी जिवंत गायीच्या मांसपेशीच्या कोशिकांचा भाग वापरण्यात आला. या बीफ 'बर्गर'साठी बीफसह मीठ, अंड्याची पावडर, ब्रेडक्रम्सबरोबरच चव आणि रंग बदलण्यासाठी केशर आणि बीटच्या रसाचे मिश्रण करण्यात आले. बर्गरच्या मूळ निर्मिती प्रक्रियेत बदल करूनही नव्या पदार्थाच्या चवीत तसूभरही फरक पडला नसल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. याचा निर्मिती खर्च हा अतर्क्य आणि अफाट वाटत असल्याने याच्या वास्तवातील वापरास कधीच मूर्त स्वरूप प्राप्त होणार नाही, असा अनेकांचा होरा होता.


  मात्र, गुगलचे सहसंस्थापक सर्जी बेन यांनी एक दशलक्ष युरोचा निधी देऊ केलेल्या 'मोसामीट' या कंपनीने २०२१ पासून युरोपातील अनेक सामिष भोजन उत्पादक आस्थापनांना आपली कंपनी कृत्रिम मांस उपलब्ध करून देईल, असे जाहीर केले आहे. एक डॉलरला मिळणाऱ्या लोकप्रिय बर्गरमध्ये याचा सहज वापर करता येईल आणि त्याच वेळी त्याच्या किमतीत, दर्जात काही फरक पडणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलंय. गायीच्या मांसपेशींच्या एका कोशिकेच्या नमुन्यापासून ८० हजार पौंड बर्गरसाठीचं मांस बनवता येईल, असा कंपनीचा दावा आहे. सीबीएस शिकागोला १८ जुलै रोजी 'मोसामीट'ने ही माहिती दिली आहे. 'बेल-फूड' या युरोपियन खाद्य कंपनीने २०२१ पासून स्वित्झर्लंडमधील रेस्तराँपासून कृत्रिम मांसाचा वापर सुरू होईल, असं जाहीरही करून टाकलंय. दरम्यान, युरोपमधील काही फूडचेन्सनी आपल्या दालनात प्रायोगिक तत्त्वावर या मांसखंडाच्या डिशेस उपलब्ध करून दिल्यावर त्याला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळालाय. जगातील सर्व मांसाहारी खाद्य उत्पादक कंपन्यांनी डच संशोधकांच्या दारात रांगा लावल्याचे चित्र येत्या काही महिन्यांत दिसेल. अमेरिकन एफडीएने याचा अधिकृत व्यावसायिक वापर करण्याचा परवाना दिल्यानंतर अख्ख्या जगातील मांसाहाराचे स्वरूप बदलून गेल्याचे दिसल्यास नवल वाटू नये. १५ मार्च २०१८ रोजी 'द वेस्टर्न प्रोड्युसर' या नियतकालिकात सर्व्हेगो या कंपनीने अमेरिकन व ब्रिटिश खवय्यांचा एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार एकतृतीयांश लोकांनी कृत्रिम मांस खाण्यास आपले प्राधान्य असेल, असे सांगितले आहे.


  फूड इंडस्ट्री याला एक नव्या युगाची अभूतपूर्व संधी म्हणून पाहत आहे. हे मांस चव, वास आणि स्वरूप या मुद्द्यांच्या कसोट्यांवर सिद्ध झालेय. स्वच्छ, निर्जंतुक, समान चवीचे, समान रंगरूपाचे हे मांस वापरात आल्याने मांसाहारात मोठे बदल घडतील. तरीदेखील काही खवय्ये या मांसाला तुच्छतेने 'फ्रँकेन मीट' असं म्हणतात. हे मांस कृत्रिमरीत्या निर्मिलेले असले तरी प्राण्यांच्या कोशिकेपासून ते बनले असल्याने त्याला मांसाहारच म्हणावे लागेल, हे स्पष्ट आहे. जोपर्यंत खनिज तेलातून कार्बनी रेणू मिळवून त्यापासून मांसजन्य पदार्थ निर्माण केला जात नाही, तोपर्यंत त्या मांसाला शाकाहारी मांस म्हणता येणार नाही.
  - समीर गायकवाड
  sameerbapu@gmail.com

Trending