आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी धोरणात शांततेची उपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१७ मध्ये व्हाइट हाऊसने प्रकाशित केलेल्या 'नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी'तून ट्रम्प प्रशासनाने 'तत्त्वनिष्ठ वास्तववादा'चा अंगीकार केल्याचे स्पष्ट होते. याचाच भाग म्हणून कोणत्याही विचारधारेशी जवळीक न ठेवता आपल्याला हव्या त्या परिणामांच्या निष्पत्तीसाठी प्रयत्न करणे हे अमेरिकन सरकारचे धोरण आहे. 


ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाबाबत रोज नव्या चर्चा घडून येतात. अनेकदा विविध माध्यमांतून होणाऱ्या विवेचनामध्ये ट्रम्प यांच्यावर टीकाच जास्त होते. अमेरिकेने उत्तर कोरियाशी वाटाघाटी सुरू केल्याची एखादीच बातमी थोडीशी सुखद असते. मात्र, बहुतेक बातम्या तशा नसतात. इराण अणुकरार, ट्रान्स-पॅसिफिक करार, हवामान बदलाबाबतच्या करारातून आणि तत्सम अनेक करारातून ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेने माघार घेतली. महिन्याभरापूर्वी अमेरिकेने आपली इस्रायलमधील वकिलात तेल अवीवहून जेरुसलेम येथे नेण्याचा निर्णय घेतला आणि मध्यपूर्वेत खळबळ माजली. युरोपातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर लावलेले कर व भारतासकट इतर देशातून अमेरिकेत जाणाऱ्या लोकांसाठी कडक व्हिसा नियम लागू केल्यानेही ट्रम्पवर टीकेची झोड उठली. हल्लीच ट्रम्प यांच्या युरोपविरोधी विधानामुळे त्रस्त होऊन अमेरिकेच्याच एस्टोनियामधील दूताने आपण निवृत्त होत असल्याचे कळवले. तेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निर्णय व विधाने जागतिक राजकारणावर आणि शांततेवर दूरगामी परिणाम करतात हे निश्चित. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामागे काही विचार असेल का? ते विचार कोणत्या धारणांतून व भूमिकेतून येत असतील? या सगळ्याचा सैद्धांतिक ऊहापोह होऊ शकतो का, हे पाहणे हा या लेखाचा हेतू आहे. 


ट्रम्प प्रशासनाच्या समोर असलेल्या आव्हानांना लक्षात घेता, ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण तीन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवते १. सामरिक बळ, २. आर्थिक सुरक्षा, ३. अमेरिकन परराष्ट्र संबंधांची पुनर्रचना. या तीन गोष्टी एकमेकांपासून स्वतंत्र नाहीत. 


लष्करी सामर्थ्य वाढवणे, सर्व दलांना जगाच्या पाठीवरील इतर कोणत्याही देशाच्या सैन्यापेक्षा अधिक सुसज्ज व अद्ययावत करणे हा ट्रम्पच्या धोरणाचा पहिला महत्त्वाचा पैलू होय. दुसरे म्हणजे, ट्रम्प प्रशासन आर्थिक सुरक्षेला सामरिक सुरक्षेइतके महत्त्व देते व ते एकूण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हितावह मानते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या विविध क्षेत्रांत अमेरिका जागतिक स्पर्धेत कायम उजवी ठरते. इतर देश आणि अमेरिका यांतील हे अंतर कायम राखणे हे आर्थिक स्पर्धेच्या दृष्टीने अमेरिकेन उद्योगांसाठी फायद्याचे आहे. 


तिसरे म्हणजे अमेरिकेची इतर राष्ट्रांसोबत जी व्यापारी आणि सामरिक समीकरणे आहेत त्यांत अमेरिकेच्या हिताचे व सोयीस्कर असे बदल करून आणणे. अमेरिकेला किमान व्यापारी तूट दर्शवणारे नवे व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे आहेत. तसेच, अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी सुरक्षा करारांमध्ये त्यांच्या ऐपतीप्रमाणे व साजेसे योगदान द्यावे, अशी आता अमेरिकेची मागणी आहे. उद्यमशील लोकशाही मित्रराष्ट्रे आणि विकसनशील देशांपैकी ज्यांचा अमेरिकेसारखा दृष्टिकोन आहे व ज्यांची तत्त्वे आणि हित अमेरिकेशी मिळतेजुळते आहे अशा राष्ट्रांच्या सार्वभौमत्वावर किंवा आर्थिक हितावर एखाद्या शक्तिशाली राष्ट्राने आक्रमण करता त्यांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल ही या धोरणाची आणखी एक बाजू होय. या आधीच्या धोरणाच्या उलट या धोरणातून फक्त गरज पडता हस्तक्षेप करायची अमेरिकेची सध्याची मानसिकता दिसून येते. सत्तासंतुलनाचे महत्त्व अमेरिकेने नाकारलेले नाही. केवळ सत्तासंतुलन साधायच्या तऱ्हेमध्ये बदल घडून आल्याचे दिसते. 


अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात इतरही बदल घडले आहेत. ट्रम्प सत्तेत येण्यापूर्वी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यात आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत काही मुद्द्यांवर एक प्रकारचे एकमत होते, असे म्हणता येईल. हे एकमत कालौघाने तयार झालेले होते. परराष्ट्र धोरणांत आणि राजनयात एक प्रकारची एकवाक्यता होती, जी राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असते. राजनयाचे कौशल्य, विविध मुद्द्यांवर जगातील देशांना एकत्र घेऊन काम करणे, बहुपक्षीय वाटाघाटीत दक्ष व सक्रिय असणे, सामोपचाराची भाषा, सामूहिक कृती या एकेकाळी अमेरिकनांचे खास गुण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुणांना अमेरिकन विसरत असल्याचा भास होतो. हे आंतरपक्षीय मतैक्यही आता जरा मागे सरले आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सध्याच्या अमेरिकन परराष्ट्र धोरणावर अमेरिकेतील देशांतर्गत राजकारणाचा वाढलेला प्रभाव. हा प्रभाव अमेरिकेच्या नव्या सुरक्षाविषयक आणि आर्थिक धोरणांवर दिसून येतो. उदारमतवादामुळे वाढते आंतरराष्ट्रीय आर्थिक परस्परावलंबन हे देशाच्या सार्वभौमत्वावर बंधने आणते. लोकांच्या जीवनमानात अनेक बदल घडतात. अमेरिकेसारख्या देशात खुल्या बाजारपेठा आणि मुक्त व्यापारामुळे देशातील स्थानिक लोकांना जगभरातून येणाऱ्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. यातून स्थानिकांच्या त्यांच्या आर्थिक हक्कांच्या आणि हिताच्या संकल्पना आकार घेतात. या अवस्थेवर तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडून येण्याआधी जोरदार प्रचार केला होता आणि त्यात मुख्यत्वे आर्थिक आणि सुरक्षाविषयक मुद्दे अधोरेखित केले होते. त्यांनी अमेरिकेच्या गतवैभवाची आठवण करून देत अमेरिकेला पूर्वपदी नेण्याची इच्छा आणि निर्धार व्यक्त केला होता. या प्रचाराला नक्कीच अमेरिकन राष्ट्रवादाची झालर होती. 


अमेरिका हा एक देश म्हणून उदयास आल्यानंतर बराच काळ इतर देशांशी संबंध जपून पण जागतिक राजकारणापासून तसा अलिप्त होता. अमेरिकेच्या सक्रिय नसण्यामागे नव्याने प्राप्त स्वातंत्र्याची आणि बलाढ्य युरोपीय राष्ट्रांपासून होऊ शकणाऱ्या हस्तक्षेपाची भीती होती. जगाचे राजकीय आणि आर्थिक केंद्र तेव्हा पश्चिम युरोपात होते. भौगोलिक स्थितीमुळे या देशाला जगापासून दूर पश्चिम गोलार्धात आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवता आले. युरोपात उदयास आलेल्या आधुनिक उदारमतवादी तत्त्वांना अमेरिकन द्रष्ट्यांनी आणि शास्त्यांनी आपल्या मातीत रुजवले. या तत्त्वांच्या बळावर अमेरिकेन लोकांनी आपली राजकीय यंत्रणा उभी केली आणि आर्थिक उत्कर्ष साधला. याच बरोबरीने अमेरिकन लोकांमध्ये आपण जगातील इतर देशांपेक्षा फक्त वेगळे नाही, तर जगरहाटीला एक महत्त्वपूर्ण अपवाद आहोत; अमेरिका हा जगातील सर्वांत संपन्न आणि सर्वश्रेष्ठ देश बनण्यासाठी, जगाचे नेतृत्व करण्यासाठीच जन्माला आला आहे व हीच 'नियती' आहे हा विश्वास दृढ झाला. याला 'अमेरिकनिझम' म्हणतात. सध्याच्या अमेरिकन राष्ट्रवादाच्या मुळाशी बऱ्याच अंशी ही विचारधारा आहे, असे म्हणता येईल. 
असे असले तरी सध्याचा अमेरिकन राष्ट्रवाद वेगळा आहे. सर्वसाधारण अमेरिकन घडण आणि संवेदना अशा आहेत की त्यांच्या अस्मितेविषयी बोलताना व्यक्तीचे आर्थिक हित आणि हक्क हे नेहमी केंद्रस्थानी असतात. कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा वांशिकतेपेक्षा हा प्रामुख्याने 'स्थानिक अमेरिकन' म्हणून एकंदर अमेरिकन लोकांच्या मनातील (ज्यात अमेरिकन कामगार आणि अमेरिकन उद्योगपती या दोहोंचा समावेश होतो) आर्थिक हिताचा प्रश्न आहे. याची परिणती म्हणून अमेरिकेने आर्थिकदृष्ट्या बचावाचा पवित्रा घेतला आहे. २०१७ मध्ये व्हाइट हाऊसने प्रकाशित केलेल्या 'नॅशनल सेक्युरिटी स्ट्रॅटेजी'तून ट्रम्प प्रशासनाने 'तत्त्वनिष्ठ वास्तववादा'चा अंगीकार केल्याचे स्पष्ट होते. याचाच भाग म्हणून कोणत्याही विचारधारेशी जवळीक न ठेवता आपल्याला हव्या त्या परिणामांच्या निष्पत्तीसाठी प्रयत्न करणे हे अमेरिकन सरकारचे धोरण आहे. या अतीव अमेरिकाकेंद्रित दृष्टिकोनाचा परिणाम म्हणून सध्याचे अमेरिकन परराष्ट्र धोरण हे जागतिक शांततेसाठी पूरक ठरत नाही. किंबहुना, अमेरिकेने मित्रदेशांतील समान धाग्यांना आणि जाणिवांना पुरेसे अधोरेखित न करणे आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या पदाला साजेशी विधाने न करणे यामुळे अत्यंत महत्त्वाचे जागतिक प्रश्न सोडवणे कठीण होत आहे. 


अमेरिकेसाठी वाईट गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या प्रत्येक कृतीला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पाठिंब्याची गरज असताना जगभर अमेरिकाविषयक मत खराब होत आहे. अमेरिकेकडे जागतिक नेतृत्वाची इच्छा व क्षमता असली तरी त्यासाठी आवश्यक दूरदृष्टी सध्या तरी नाही. 

- विक्रांत पांडे, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, मुंबई विद्यापीठ 
avadhutpande@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...