आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवान रेल्वे प्रवासाची 'ट्रेन-१८'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या ऑक्टोबरपासून नवी सेमी-हायस्पीड रेल्वेगाडी नवी दिल्ली आणि भोपाळदरम्यान सध्याच्या 'शताब्दी एक्स्प्रेस'च्या जागी नव्या नावाने (ट्रेन-18) सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या 'हबीबगंज शताब्दी' ७११ किलोमीटरचा प्रवास ८ तास २५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. मात्र 'ईएमयू' तंत्रावर आधारित 'ट्रेन-१८'ला हे अंतर कापण्यासाठी साधारण साडेसहा तास लागतील. 


सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्यांच्या युगात प्रवेश करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने ५ एप्रिल २०१६ रोजी 'गतिमान एक्स्प्रेस' ही सर्वात वेगवान रेल्वेगाडी सुरू केली. हजरत निझामुद्दीनपासून आग्र्यापर्यंत ही गाडी ताशी १६० किलोमीटर वेगाने प्रवास करते. रेल्वेगाड्यांचा वेग वाढवून प्रवासाचा कालावधी कमी करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे अन्य ८ मार्गांवर सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्या सुरू करण्याची योजनेचा तो भाग आहे. या मार्गांवर वेगवान प्रवासी वाहतुकीसाठी नव्या रेल्वेगाड्यांची बांधणी करण्यात येत आहे. मात्र, आलिशान आणि वेगवान प्रवास घडवताना तो रेल्वे आणि प्रवासी या दोघांच्याही दृष्टीने फायदेशीर होण्यासाठी सर्व बाबींचे काळजीपूर्वक नियोजनाला महत्त्व असणार आहे. 


भारतात आजही रेल्वे हे लांब पल्ल्याच्या प्रवासाचे स्वस्त आणि आरामदायक साधन मानले जात आहे. भारतीय रेल्वे दररोज सुमारे सव्वादोन कोटी प्रवाशांची आणि सुमारे ३० लाख टन मालाची ने-आण करत आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांदरम्यान अधिकाधिक रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी सतत मागणी वाढत आहे. सध्या देशातील चार महानगरांना जोडणाऱ्या लोहमार्गांवर क्षमतेपेक्षा कित्येक पटींनी जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यावर मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून २०११-१२ मध्ये देशात महत्त्वाच्या शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वेगाड्या आणि बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार मांडला गेला. मात्र, त्यातील बुलेट ट्रेनचा पर्याय बराच खर्चिक असल्यामुळे तो मागे ठेवला गेला. 'बुलेट ट्रेन' सुरू करण्यासाठी येणारा खर्च प्रति किलोमीटर सुमारे १०० कोटी रुपये इतका होतो, तर सध्याच्या उपलब्ध मार्गांचे मजबुतीकरण, आधुनिकीकरण करून हाय स्पीड रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी प्रति किलोमीटर पाच कोटी रु. इतकाच खर्च येतो. म्हणूनच आधी सेमी-हायस्पीड (ताशी १६० किलोमीटर) आणि कालांतराने त्यात आणखी सुधारणा करून हायस्पीड रेल्वेगाड्या (ताशी २०० किलोमीटर) सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच या रेल्वेगाड्यांमध्ये पारंपरिक तंत्राऐवजी लोकल (उपनगरीय) रेल्वेगाड्यांप्रमाणे 'इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट' (ईएमयू) तंत्र अवलंबण्याचे निश्चित झाले होते. 


या नव्या रेल्वेगाड्यांद्वारे सध्या देशात धावत असलेल्या 'राजधानी' आणि 'शताब्दी' या लोकप्रिय रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्याची योजना होती. त्यानुसार सध्या नवी दिल्ली आणि हबीबगंज (भोपाळ) दरम्यान धावणारी 'शताब्दी एक्स्प्रेस' सर्वात आधी या नवीन 'ईएमयू' तंत्रावर आधारित रेल्वेगाडीत परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'हबीबगंज शताब्दी' ही देशातील पहिली, सर्वात वेगवान आणि सर्वात लांब पल्ल्याची शताब्दी एक्स्प्रेस आहे. त्यामुळे या गाडीचे संचालन अधिक सुयोग्य पद्धतीने करता यावे या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसारच येत्या ऑक्टोबरपासून नवी सेमी-हायस्पीड रेल्वेगाडी नवी दिल्ली आणि भोपाळदरम्यान सध्याच्या 'शताब्दी एक्स्प्रेस'च्या जागी नव्या नावाने (ट्रेन-18) सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या 'हबीबगंज शताब्दी' ७११ किलोमीटरचा प्रवास ८ तास २५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. मात्र 'ईएमयू' तंत्रावर आधारित 'ट्रेन-१८'ला हे अंतर कापण्यासाठी साधारण साडेसहा तास लागतील. 


'ट्रेन-१८'ला स्वतंत्र इंजिन जोडण्याऐवजी ६ मोटर कोच ठरावीक अंतराने जोडले जाणार आहेत. याचे नियंत्रण पुढे बसलेला लोको पायलट (चालक) करेल. अशा प्रकारे गती देणाऱ्या शक्तीचे विकेंद्रीकरण केल्याने गाडीची वेग घेण्याची आणि कमी करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रवासाच्या वेळेत २० टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. परिणामी नव्या रेल्वेगाड्या सुरू करणेही शक्य होणार आहे. या 'ईएमयू' सेटवर आधारित रेल्वेगाड्यांचे नामकरण 'ट्रेन-१८' आणि 'ट्रेन-२०' असे केले जाणार आहे. त्यातून त्यांचे वेगळेपण दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. या गाड्या सध्याच्या 'राजधानी' आणि 'शताब्दी' रेल्वेगाड्यांची जागा घेतील, असे सांगितले जात आहे. 


चेन्नईजवळील पेरांबूर येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी'त ही नवी रेल्वेगाडी तयार केली जात असून ती या महिन्यात चाचण्यांसाठी उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. या 'ट्रेन-१८'मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले हे डबे हलके असणार आहेत. यामध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी 'एलईडी स्क्रीन' बसवण्यात आलेला असेल. तसेच प्रवाशांना गाडीची निश्चित स्थिती आणि पुढचे स्टेशन येण्यासाठीचा संभाव्य कालावधी इत्यादींची माहिती देण्यासाठी 'जीपीएस' यंत्रणा यात बसवलेली असेल. स्वयंचलित सरकते दरवाजे, व्हॅक्युम टॉयलेट, आल्हाददायक अंतर्गत सजावटही या गाडीत केली जाणार आहे. ही नवी गाडी पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. या गाडीच्या 'प्रथम वर्गा'च्या डब्यात (एक्झिक्युटिव्ह क्लास) स्वतःभोवती फिरणारी आसने बसवलेली असतील. यामुळे गाडीच्या धावण्याच्या दिशेने आसनांची दिशा बदलता येईल. वाय-फाय आणि मनोरंजनाच्या सुविधाही या गाडीत पुरवल्या जाणार आहेत. या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिच्या डब्यांना लावण्यात येणाऱ्या अखंड खिडक्याच्या काचा. अशा काचांमुळे गाडी अधिक आकर्षक दिसेल. मात्र, या सर्व वैशिष्ट्यांमुळे या रेल्वेगाडीचे भाडे 'शताब्दी' आणि 'राजधानी'पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. 


या 'ट्रेन-१८' आणि 'ट्रेन-२०' हे प्रकल्प 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत राबवले जात आहेत. यामुळे या गाड्यांचे डबे (ट्रेनसेट) अन्य देशांमधून आयात करण्याऐवजी त्या देशांच्या सहकार्याने भारतातच तयार केले जात आहेत. यामुळे या 'ट्रेनसेट'च्या बांधणीच्या खर्चात कपात झाली आहे. 'ट्रेन-२०'च्या एका डब्यासाठी सुमारे ५ कोटी ५० लाख रु., तर 'ट्रेन-१८'च्या एका डब्यासाठी सुमारे दोन कोटी ५० लाख रु. खर्च येणार आहे. 'ट्रेन-२०' २०२० पर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. गाडी वेग घेताना आणि थांबताना प्रवाशांना धक्के जाणवू नयेत यासाठी या रेल्वेगाडीच्या डब्यांच्या कपलिंगमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पहिल्या रेक्समध्ये जर्मनीहून आयात केलेली कपलिंग बसवण्यात आलेली आहेत. 


अलीकडे रेल्वेचे भविष्य उज्ज्वल असावे यासाठी फारसे प्रयत्न केले जाताना दिसत नाही. नुसतेच आकर्षक रेल्वेगाड्या सुरू करण्यावर भर दिल्यामुळे रेल्वेचे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत वाढत असल्याचे दिसते. २०१६-१७ या वर्षात रेल्वेचे संचालन गुणोत्तर (ऑपरेटिंग रेशो) ९२ पर्यंत राखण्याचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट साध्य न होता ते ९६.९ पर्यंत गेले. हा गेल्या १६ वर्षांमधील उच्चांक ठरला. सध्या उपलब्ध असलेल्या मार्गांची क्षमता वाढवून त्यावरून ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या हायस्पीड ट्रेन सुरू करणे कमी खर्चिक आणि सोयीचे आहे. त्यामुळे २०१२-१३च्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई-बडोदा-रतलाम-दिल्ली या मार्गावर ताशी २०० किलोमीटर वेगाच्या रेल्वेगाड्या सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली होती. अशा रेल्वेगाडीच्या सुरक्षित संचालनासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा या मार्गावर करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये मोठा गाजावाजा करत मुंबई आणि दिल्लीदरम्यान सुरू झालेली 'विशेष राजधानी एक्स्प्रेस' आधीच्या 'राजधानी'पेक्षा २ तास कमी घेणार असे सांगण्यात आले. त्यासाठी या गाडीचे भाडेही आधीच्या 'राजधानी'पेक्षा २० टक्क्यांनी जास्त ठेवले गेले आहे. प्रत्यक्षात या गाडीला प्रवास पूर्ण करण्यासाठी रोज दीड ते अडीच तासांदरम्यान उशीर होत आहे, याकडेही लक्ष द्यावे लागेल. ]

 

- पराग पुरोहित (रेल्वेचे अभ्यासक) 
Parag12951@gmail.com

बातम्या आणखी आहेत...