Home | Editorial | Columns | Column article about Fighter Aircraft of Air Force

हवाई दलासमोर लढाऊ विमानांची चिंता

पराग पुरोहित | Update - Jul 24, 2018, 08:42 AM IST

सध्या हवाई दलाला विमानांची कमतरता भासत आहे. लढाऊ विमानांच्या बाबतीत हवाई दलाकडे गरजेपेक्षा आणि मंजूर संख्येपेक्षा १० तुक

 • Column article about Fighter Aircraft of Air Force

  सध्या हवाई दलाला विमानांची कमतरता भासत आहे. लढाऊ विमानांच्या बाबतीत हवाई दलाकडे गरजेपेक्षा आणि मंजूर संख्येपेक्षा १० तुकड्या कमी आहेत. अन्य देशांकडून विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया दीर्घ आणि खर्चिक असल्यामुळे 'तेजस'च्या सामिलीकरणाने विमानांची कमतरता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.


  स्वदेशी बनावटीचे 'हलके लढाऊ विमान-तेजस' १ जुलै २०१८ रोजी भारतीय हवाई दलात औपचारिकपणे सामील झाले आहे. तामिळनाडूतील सुलूर येथील हवाई तळावर पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात ४५ व्या तुकडीत (फ्लाइंग डॅगर्स) ९ 'तेजस' विमानांचा समावेश करण्यात आला आहे. ही विमाने भारतीय हवाई दलाचा एक भाग झाली असली तरी युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे अंतिम प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या अजून काही महत्त्वाच्या चाचण्या पूर्ण होण्याची गरज आहे.


  भारतीय हवाई दलात स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक लढाऊ विमाने सामील करण्याच्या हेतूने १९८३ मध्ये 'हलके लढाऊ विमान (एलसीए)' विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्याद्वारे विकसित झालेली विमाने हवाई दलात १९६२ पासून कार्यरत असलेल्या 'मिग-२१' विमानांची जागा घेणार होती. पण नंतरच्या काळात निधीचा अनियमित पुरवठा, स्वबळावर पहिल्यांदाच अत्याधुनिक स्वनातीत विमानाचा विकास करताना येणाऱ्या अडचणी, हवाई दलाच्या वाढत्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करताना विमानाच्या आरेखनात करावे लागलेले बदल, पोखरण येथील मे १९९८मधील अणुचाचण्यांनंतर अमेरिकेने लादलेले निर्बंध, स्वबळावर जेट इंजिन विकसित करताना आलेल्या मर्यादा अशा अनेक अडचणींमुळे 'एलसीए' हवाई दलाला मिळण्यास प्रचंड विलंब होत गेला आहे.


  'हलक्या लढाऊ विमाना'च्या प्रकल्पाने खऱ्या अर्थाने गती घेतली वाजपेयी सरकारच्या काळात. त्याच काळात या विमानाचे 'तेजस' असे अधिकृत नामकरण करण्यात आले. अखेर चार जानेवारी २००१ रोजी बंगळुरू येथे 'तेजस'चे पहिले यशस्वी उड्डाण झाले. 'संरक्षण संशोधन आणि विकास संघटने'च्या (डीआरडीओ) 'एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी'ने 'तेजस'चे आरेखन केले आहे, तर 'हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड' त्याची बांधणी करत आहे.


  कालांतराने बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर लादलेले उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील निर्बंध काहीसे शिथिल केले. त्याचा 'हलक्या लढाऊ विमाना'च्या प्रकल्पालाही लाभ झाला. त्यानंतरच्या काळात 'तेजस'च्या राजस्थानातील वाळवंट, लडाख, गोवा, बंगळुरू अशा विविध ठिकाणी आणि विविध प्रकारच्या हवामानात चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या वेळी जाणवलेल्या काही त्रुटी दूर केल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात 'तेजस' कोणत्याही हवामानात, दिवसा व रात्रीही प्रभावीपणे कामगिरी पार पाडण्यास सिद्ध होणार आहे. 'आयर्न फिस्ट' आणि 'गगन शक्ती' अशा युद्धसरावांमध्ये 'तेजस'ने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 'तेजस'ची इंधन पुनर्भरण चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे. त्यापाठोपाठ 'आय-डर्बी' हे दृष्टिपलीकडील लक्ष्य भेदणारे क्षेपणास्त्र डागण्याची 'तेजस'ची क्षमता चाचणीही यशस्वी ठरली आहे.


  'हलक्या लढाऊ विमाना'चा प्रकल्प रखडत गेल्याने 'मिग-२१' विमानांचे आयुष्य वाढवून त्यांचा वापर करण्याशिवाय हवाई दलासमोर पर्याय उरला नाही. दुसरीकडे विलंबामुळे 'तेजस'च्या प्रकल्पाचा एकूण खर्चही २५ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. या स्वदेशी विमानाला स्वदेशी बनावटीचेच 'कावेरी' जेट इंजिन बसवण्यात येणार होते. पण हे इंजिन विकसित करण्यात भारतीय तंत्रज्ञांना अजूनही पूर्ण यश आलेले नाही. त्यामुळे हवाई दलात सामील होत असलेल्या सुरुवातीच्या ४० 'तेजस' विमानांना अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक्सचे 'जीई-४०४ आयएन' हे इंजिन बसवण्यात येत आहे. पण या विमानाच्या दुसऱ्या तसेच नौदल आवृत्तीला 'कावेरी' इंजिनेच बसवली जातील, अशी आशा 'हिंदुस्थान एअरोनॉटिक्स कंपनी'ने व्यक्त केलेली आहे. त्या आवृत्त्या सध्यापेक्षा अधिक शक्तिशाली असतील, असेही सांगण्यात येत आहे.


  'तेजस' या बहुउद्देशीय डेल्टा विंग विमानावरील शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठीच्या आठ जागांवरून (हार्ड पॉइंट) विविध प्रकारची ४ टन वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेता येतात. मानवी दृष्टीच्या पलीकडील लक्ष्याचा वेध घेणारे स्वदेशी बनावटीचे 'अस्त्र' क्षेपणास्त्र या विमानावर बसवण्यात येणार आहे. 'तेजस'वरील सर्व यंत्रणा संगणकीकृत असून त्यामुळे वैमानिकावर येणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत झाली आहे. डिजिटल फ्लाइट कंट्रोल ही अशीच एक महत्त्वाची यंत्रणा. वैमानिकाला सहायक ठरणारी आणखी एक यंत्रणा म्हणजे ऑटो-पायलट यंत्रणा. त्या यंत्रणेच्या मदतीने विमान हेलकावे खात असेल, ते जमिनीच्या अगदी जवळून उडत असेल, तर त्या परिस्थितीतून विमानाला ही यंत्रणा सुरक्षित बाहेर काढू शकते.


  जगातील सर्वांत हलके आणि छोटे लढाऊ विमान अशी 'तेजस'ची ओळख आहे. त्यामुळे 'तेजस'च्या सांगाड्यामध्ये अल्युमिनियम-लिथियम, कार्बन फायबर आणि टिटॅनियमचा वापर करण्यात आलेला आहे. उड्डाणाच्या वेळी त्यावरून अतिरिक्त इंधनसाठाही वाहून नेता येतो. हवेत उडत असतानाच इंधन भरण्याची सोय आणि 'एईएसए' रडार यांसारख्या काही महत्त्वाच्या सुधारणा केलेली 'तेजस मार्क-१' आवृत्ती सध्या विकसित केली जात असून तिची पहिली चाचणी लवकरच होणे अपेक्षित आहे. नव्या आवृत्तीवरील 'एईएसए' रडारच्या मदतीने एका वेळी १० लक्ष्यांचा शोध घेता येईल. हवाई दलाने अशा ८३ 'तेजस मार्क-१' विमानांची मागणी नोंदवली आहे.


  अशा वैशिष्ट्यपूर्ण 'तेजस'ने विविध आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमधून आपल्याकडे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आता नौदलाच्या विमानवाहू जहाजांवर तैनात करण्यासाठी हलक्या लढाऊ विमानाची स्वतंत्र आवृत्ती विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 'तेजस'च्या सध्याच्या नौदल नमुन्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची मागणी नौदलाने केलेली आहे. भविष्यात हवाई दलासाठी 'तेजस मार्क-२' ही आवृत्ती विकसित करण्यात येणार आहे.
  अनेक अडचणींना तोंड देत असलेल्या 'हलक्या लढाऊ विमाना'चा प्रकल्प पूर्ण होण्याचे जून २०१८ हे लक्ष्यही चुकले आहे. 'तेजस' २०१२ मध्ये हवाई युद्धासाठी पूर्णपणे सज्ज होईल, असे संरक्षण मंत्रालयाने पूर्वी जाहीर केले होते. मात्र, आजही 'तेजस' सज्ज होऊ शकलेले नाही. 'तेजस'मध्ये हवाई दलाला आढळलेल्या अनेक त्रुटी दूर करण्यात 'एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी'ला पूर्ण यश मिळालेले नाही. 'तेजस'च्या विकासाची आणि त्याला युद्धासाठी पूर्णपणे सज्ज करण्याची जबाबदारी या संस्थेवरच आहे. मात्र, ही संस्था आणि विमानाची बांधणी करणारी 'हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड' यांच्या कामकाजात योग्य ताळमेळ साधला जात नसल्याचे बोलले जात आहे. त्याचाच परिणाम प्रकल्प रखडण्यावर होत आहे. म्हणूनच या दोन्ही संस्थांमध्ये योग्य समन्वय साधून प्रकल्प गतिमान करण्याच्या उद्देशाने हवाई दल हा प्रकल्प थेट आपल्या देखरेखीखाली घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


  सध्या हवाई दलाला विमानांची कमतरता भासत आहे. लढाऊ विमानांच्या बाबतीत हवाई दलाकडे गरजेपेक्षा आणि मंजूर संख्येपेक्षा १० तुकड्या कमी आहेत. अन्य देशांकडून विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया दीर्घ आणि खर्चिक असल्यामुळे 'तेजस'च्या सामिलीकरणाने विमानांची कमतरता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. हवाई दलाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी 'हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड'ची 'तेजस'च्या निर्मितीची क्षमता वार्षिक ८ वरून १६ पर्यंत वाढण्याचे प्रयत्न आता होत आहेत. मात्र, उपलब्ध संसाधनांच्या जोरावर हे लक्ष्य गाठणे शक्य होईल का हे सांगणे अवघड आहे. भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हानांचा विचार करता दोन आघाड्यांवरील युद्धाची आणि दीर्घ अंतरावरील मोहिमांची तयारी करणाऱ्या हवाई दलासाठी लढाऊ तसेच अन्य प्रकारची विमाने पुरेशा संख्येने आणि लवकरात लवकर उपलब्ध होणे आवश्यक आहे.

  - पराग पुरोहित, संरक्षण अभ्यासक
  Parag12951@gmail.com

Trending