Home | Editorial | Columns | Column article about Hima Das

पूर्वोत्तर भारतातील भाग्योदयी हिमा!

सुधीर जोगळेकर | Update - Jul 25, 2018, 07:10 AM IST

शाळेपासून घर दोन मैल अंतरावर. ती वेगानं धावत सुटली आणि सुमोला हरवून तिच्या आधी घरी पोहोचली.

 • Column article about Hima Das

  हिमाच्या आईनं सांगितलेला एक किस्सा भलताच बोलका आहे. शाळेतून परत येत असताना तिनं एका सुमोवाल्याला हात दाखवून लिफ्ट मागितली. तो सुमोवालाही असा मग्रूर, की त्यानं बाकीच्या मुलांना लिफ्ट दिली, पण हिमाला घेतलं नाही. हिमा वैतागली, सुमोवाल्याला म्हणाली, तुला हरवून दाखवते बघ. शाळेपासून घर दोन मैल अंतरावर. ती वेगानं धावत सुटली आणि सुमोला हरवून तिच्या आधी घरी पोहोचली. आईनं तेव्हाच ठरवून टाकलं, हिमाला धावण्यात करिअर करायचं असेल तर अवश्य करू दे.


  पूर्वोत्तर भारतात गेल्या पंधरवड्यात क्रीडा क्षेत्रातला सर्वोत्तम विजयोत्सव साजरा झाला तो तीन घटनांनी. या विजयोत्सवाची सुरुवात केली आसामच्या हिमा दासनं, पण त्यावर कळस चढवले ते त्रिपुराच्या दीपा कर्माकरनं आणि सिक्कीमच्या करिष्मा रायनं. दीपा कर्माकर त्रिपुराची. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धांत तिचं ब्राँझपदक थोडक्यात हुकलं होतं आणि त्यानंतर लिगामेंटला दुखापत झाल्यानं तिला दोन वर्षे खेळापासून दूर राहावं लागलं होतं. पण दुखापत बरी झाली, पुरेसा सराव झाला आणि दीपानं टर्कीत मेर्सिनमध्ये भरलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये बांबूच्या आधाराने मारल्या जाणाऱ्या उंच उडीत (vault event) भाग घेतला आणि दोन वर्षे खेळाबाहेर राहावे लागल्याची सारी कसर भरून काढली. २४ वर्षांच्या दीपानं १४,१५० गुण पटकावले आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.


  करिष्मा राय ही दक्षिण सिक्कीममधल्या रोबोन्ग्लात राहणारी फुटबॉलपटू सिक्कीम फुटबॉल असो.कडून खेळते. जोहान्सबर्गमध्ये ब्रिक्स राष्ट्रांच्या फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी ती नुकतीच जोहान्सबर्गला रवाना झाली. भारताच्या १७ वर्षे वयाखालच्या मुलींच्या संघात तिची निवड करण्यात आली आहे. देशाचं तसंच सिक्कीमचं नाव उज्ज्वल करू, असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे.


  हिमा ही आसामच्या सीमावर्ती भागातील कंधुलीमारी गावची १८ वर्षे वयाची मुलगी. पेशानं शेतकरी असलेले रणजित दास आणि सोनाली दास हे तिचे आईबाप. चार मुलांमधली ही सर्वात मोठी. ढिंग पब्लिक स्कूलमध्ये मुलांबरोबर ती फुटबॉलही खेळायची. वडील रणजित दास हे स्वतः उत्तम फुटबॉलपटू. तंदुरुस्त राहण्यासाठी ते रोज धावायला जायचे. हिमा त्यांच्याबरोबर बाहेर पडायची. ती अनवाणीच धावायची. वडील ज्या रस्त्यावर धावायचे, त्याच रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात हिमा धावायची. नंतर शाळेतल्या सर्व स्पर्धांवर तिचंच नाव कोरलं जाऊ लागलं. ढिंगमधल्या नवोदय विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शमसुल हक यांचं तिच्याकडे लक्ष होतं. २०१४ मध्ये एका आंतरशालेय स्पर्धेत त्यांनी तिला हेरलं आणि त्यांनी नागांव येथे तिची गाठ घालून दिली गौरी शंकर राय या प्रशिक्षकाशी. राय यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६च्या आंतरजिल्हा धावस्पर्धेत हिमानं पहिलंवहिलं सुवर्णपदक पटकावलं. त्याच वर्षी झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत तिनं रौप्यपदक पटकावलं. तिचं नाव राज्यस्तरावर घेतलं जाऊ लागलं.


  हिमा गुवाहाटीला गेली, तिची भेट तिथे निपॉन दास आणि नबजीत मालाकार या क्रीडा आणि युवा मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांशी झाली. त्यांच्या शिफारशीनं हिमाचं औपचारिक प्रशिक्षण गुवाहाटीत २०१७मध्ये सुरू झालं. पण इथेही तिचा आग्रह मुलांबरोबर प्रशिक्षण घेण्याचाच राहिला. कडवी स्पर्धा असेल तरच सुधारणा होते, असं तिचं म्हणणं असे.


  हिमाच्या मेहनतीवर, कर्तृत्वावर निपॉन आणि नबजीत यांचा इतका दृढ विश्वास होता की त्यांनी तिला नैरोबीत होत असलेल्या वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपसाठी पाठवण्याकरिता कर्ज काढलं. २०० मी. शर्यतीत ती पाचवी आली. पण निपॉन आणि नबजीत हिंमत हरणारे नव्हते. त्यांनी मार्च २०१८ मध्ये पतियाळा फेडरेशन कप स्पर्धेसाठी तिला पाठवलं. ४०० मीटर्सच्या शर्यतीत ती धावली. पाठोपाठ गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सला ती गेली.


  फिनलंडची २० वर्षे वयाखालच्या धावपटूंची जागतिक स्पर्धा हिमानं जिंकली आणि इतिहास घडला. दोन वर्षांपूर्वी अनवाणी हिरवळीवर धावणारी हिमा दोन वर्षांत फिनलंडमध्ये धावून जग जिंकली होती. अन्य सेलिब्रिटी खेळाडूंबाबत जसं घडतं तसं हिमाच्या बाबतीत घडलंच नाही. ती तिकडे धावत होती आणि तमाम भारतीय क्रीडा समीक्षक झोपेच्या अधीन होते. हिमानं त्याची खिल्ली उडवताना म्हटलंही, तिकडे तुम्ही झोपला होतात आणि इकडे मी धावत होते, एक इतिहास घडत होता. पण हिमा मात्र आपल्या मित्रांना विसरली नव्हती. २०१३ मध्ये हिमानं मोनजाय नावाची एक सामाजिक संस्था स्थापन करून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम अनेकदा केलं होतं.


  घुसखोरीविरोधात आसू नावाच्या ज्या विद्यार्थी संघटनेनं आसामात सहा वर्षांचं आंदोलन छेडलं होतं, त्या संघटनेची ती सक्रिय सदस्य होती. पूरग्रस्तांना मदत करणं, दारूविक्री करणाऱ्या दुकानांविरोधात महिलांना संघटित करणं असे अनेक उद्योग हिमा करत असे. २०१६ सालात अशीच एक घटना घडली. एका दारू दुकानाविरोधात हिमानं महिलांना संघटित केलं व ते दुकान उद्ध्वस्त केलं. संतापलेल्या दुकान मालकानं हिमाच्या वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. जूनच्या २७ तारखेला शेवटची सुनावणी झाली. रणजित दास खुशीनं सुनावणीला सामोरे गेले, मला काहीही गैर वाटत नाही, माझ्या मुलीनं जे काही केलं त्यानं माझी मान उंचावली गेली आहे.


  हिमाच्या आईनं सांगितलेला एक किस्सा भलताच बोलका आहे. शाळेतून परत येत असताना तिनं एका सुमोवाल्याला हात दाखवून लिफ्ट मागितली. तो सुमोवालाही असा मग्रूर, की त्यानं बाकीच्या मुलांना लिफ्ट दिली, पण हिमाला घेतलं नाही. हिमा वैतागली, सुमोवाल्याला म्हणाली, तुला हरवून दाखवते बघ. शाळेपासून घर दोन मैल अंतरावर. ती वेगानं धावत सुटली आणि सुमोला हरवून तिच्या आधी घरी पोहोचली. आईनं तेव्हाच ठरवून टाकलं, हिमाला धावण्यात करिअर करायचं असेल तर अवश्य करू दे.


  हिमाचं तिच्या धावण्यावर इतकं लक्ष असतं की बरोबरच्या स्पर्धक काय करताहेत हे तिला कळतही नाही. फिनलंडमध्ये हेच घडलं. ४०० मीटरपैकी ३०० मीटरपर्यंत ती मागेच होती. चौथ्या-पाचव्या स्थानावर. मग मात्र तिनं जोर लावला आणि सगळ्यांना मागे टाकत तिनं पहिलं स्थान गाठलं.


  भोगेश्वर बारुआ हे आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सुवर्णपदक पटकावणारे आसामचे पहिले अॅथलिट. बँकॉकमध्ये झालेल्या १९६६ च्या आशियाई स्पर्धांत बारुआ यांनी ८०० मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. ही घटना तब्बल ५२ वर्षांपूर्वीची. आपला हा विक्रम आपल्या हयातीत तरी कुणी मोडेल की नाही असा प्रश्न त्यांना पडे आणि ते दुसऱ्या भोगेश्वरची वाट पाहत बसत. पण हिमानं ४०० मीटरची स्पर्धा विक्रमी वेळ नोंदवत मोडली आणि अस्वस्थ होत बारुआ म्हणाले, मी चुकलो, आपल्याकडे दुसरा बारूआ निघालाय.


  पदकप्रदानाचा कार्यक्रम पार पडला आणि हिमानं, तिनंच स्थापन केलेल्या मोनजाय संस्थेच्या भास्कर ज्योती नाथ नावाच्या सदस्याला फोन करून चौकशी केली होती, तेव्हा कुणालाच काही अप्रूप वाटलं नव्हतं. काही दिवसांपूर्वीच आसाममध्ये रेल्वे गाडीत, २४ तासांच्या अवधीत दोन घटनांमध्ये स्वच्छतागृहात दोघा महिलांचे भीषण खून झाले होते. ते खून करणाऱ्या अपराध्यांना अटक झाली की नाही याची उत्सुकता तिला तिथेही अस्वस्थ करत होती.


  त्यामुळेच ढिंग जिल्ह्यातल्या सुदूर गावात वीज पोहोचली आणि घराघरात टीव्ही पाहिले जाऊ लागले, तेव्हा उत्तर आसाममधल्या सोनितपूर जिल्ह्यातल्या ढेकियाजुली पोलिस स्टेशनअंतर्गत मोडणाऱ्या घोगोरा काचरी गावातल्या महिलांशी आंतरजालावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला प्रश्न विचारला, "हिमा माहित्ये की नाही, तिने केलेला पराक्रम पाहिलात की नाही", तेव्हाचं त्या महिलांचं उत्तर होतं, माहित्ये तर, तिनं पदक पटकावलं ते आम्ही रात्ररात्र जागून डोळे भरून पाहिलं. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेत सौभाग्य योजनेनं हा चमत्कार घडवला होता. टीव्ही तर दिसू लागला होताच, पण वीज आल्यानं अन्य अनेक समस्या हलक्या होण्यास मदत होऊ लागली होती. भाग्योदय भाग्योदय म्हणतात तो याहून दुसरा कुठला असू शकतो?

  - सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार
  sumajo51@gmail.com

Trending