Home | Editorial | Agralekh | Column article about Imran Khan

पाकिस्तानचा 'नया' कप्तान (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jul 27, 2018, 08:51 AM IST

विश्लेषकांचे अंदाज चुकवत पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानपदाची माळ माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गळ्यात पडली आहे.

  • Column article about Imran Khan

    अनेक राजकीय व निवडणूक विश्लेषकांचे अंदाज चुकवत पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानपदाची माळ माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या गळ्यात पडली आहे. या निकालाची अधिकृत घोषणा आज पाकिस्तानचा निवडणूक आयोग करणार आहे. पण मतदानाचे कल इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'च्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. इम्रान खान यांच्या 'नया पाकिस्तान' या घोषवाक्याला मतदारांनी मनापासून प्रतिसाद दिला आहे. इम्रान खान यांच्या विजयावर सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले असले तरी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानच्या लष्करानेही पाकिस्तानच्या जनतेचे सत्ताबदल केल्याबद्दल आभार मानले आहेत. नवाझ शरीफ लंडनमधून पाकिस्तानात आल्यामुळे त्यांना सामान्य पाकिस्तानी जनतेची सहानुभूती मिळत असल्याचे चित्र तयार केले जात होते, तसेच शरीफ यांची लोकप्रियता इम्रान खान यांच्या आड येऊन इम्रान खान यांना निसटता विजय मिळेल, असे अनेक जनमत चाचण्यांत सांगण्यात आले होते.


    या चाचण्यांना इम्रान खान यांनी क्लीन बोल्ड केले हे विशेष. इम्रान खान राजकारणात २२ वर्षांपासून असले तरी त्यांच्या पक्षाचा प्रभाव खैबर पख्तुनख्वा या प्रांतावरच होता. आता संपूर्ण देश त्यांच्या पक्षाच्या प्रभावाखाली आलेला आहे. राष्ट्रीय राजकारणाचा फारसा अनुभव नसलेले अत्यंत नवखे असे इम्रान खान यांचे मंत्रिमंडळ असेल. पण इम्रान खान पाकिस्तानच्या राजकारणात तसे नवखे नाहीत. त्यांची प्रतिमा आपल्याकडील व अन्य परदेशी मीडियात कितीही प्लेबॉयसारखी रंगवली जात असली तरी पाकिस्तानच्या राजकारणातला एक उगवता तारा म्हणून पाकिस्तानी जनतेने त्यांचा केव्हाच स्वीकार केला होता. इम्रान खान अव्वल क्रिकेटपटू असले तरी त्यांचे शिक्षण इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून झाले होते. तेथून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली होती. त्यामुळे राजकारणाचे धडे त्यांनी तरुण वयातच शिकलेले आहेत. आपले उद्दिष्ट स्पष्ट असल्याने क्रिकेटमधून ग्रेसफुल निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी थेट राजकारणात उडी मारली. गेल्या दोन दशकांच्या राजकीय प्रवासात इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाच्या आपल्या महत्त्वाकांक्षा कधीच लपवून ठेवलेल्या नव्हत्या, तसेच त्यांनी अनेक पराभव पचवून आपली प्रतिमा दुय्यम-तिय्यम नेता, प्रादेशिक पातळीवरचा नेता अशीही ठेवली नाही. गेल्या चार वर्षांत तर त्यांनी नवाझ शरीफ यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात देशव्यापी मोहीम उघडली होती. देशाच्या कानाकोपऱ्यात सभा घेऊन देश पिंजून काढला होता. आपल्या सर्व प्रचारात त्यांनी पाकिस्तानी लष्कराची वाहवा केली होती. पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराला दुखावून चालत नाही, हे त्यांना उमजल्याने लष्करानेही त्यांच्या मागे आपली शक्ती पणास लावली होती. सोबत न्यायालय व मीडिया होता.


    इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानचे पंतप्रधानपद आल्याने भारताशी ते कसे संबंध ठेवतात हे महत्त्वाचे आहे. कारण इम्रान खान पाकिस्तान लष्कराचे बाहुले म्हणून काम पाहतील व भारत-पाकिस्तान संबंधांतला तणाव कमी होईल, अशी शक्यताही नाही, असे बोलले जात आहे. पण दुसरीकडे इम्रान खान यांनी निवडणूक प्रचारात काश्मीर धोरणावरून भारतावर टीका केली असली तरी भारताविषयीचा द्वेष त्यांच्या अनेक मुलाखतींतून दिसून आलेला नाही, हेही महत्त्वाचे आहे. काल जेव्हा त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी भारताशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत या मताचे आपण असल्याचे स्पष्ट केले. या देशांदरम्यान व्यापार वाढला तर दोन्ही देशांमध्ये प्रगती होईल. समृद्धी येईल. काश्मीर प्रश्न हा समोरासमोर बसून चर्चा करून सोडवण्याचा विषय आहे, भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पावले त्यांच्या दिशेने टाकू, असे त्यांचे म्हणणे होते. ही प्रतिक्रिया सध्याच्या काळात आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एक लक्षात घेतले पाहिजे की, कालच्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत दहशतवादाने पोळलेल्या बलुचिस्तानपासून समृद्ध असलेल्या पंजाब, सिंध प्रांतातील तरुणांनी इम्रान खान यांच्या पक्षाला भरभरून मतदान केले आहे. बहुतेक सर्वच कट्टर, कडव्या इस्लामी पक्षांना मतदारांनी नाकारून इम्रान खान यांच्या झोळीत आपली मते टाकली आहेत. इम्रान खान यांनी प्रचारात तालिबान संघटनांविरोधात युद्ध करण्यापेक्षा चर्चा केली जावी, या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला होता. अशी भूमिका घेण्याचे धाडस एकाही राजकीय पक्षाने दाखवले नव्हते. परिणामी, काही तालिबानी गट इम्रान खान यांच्या बाजूने गेले आहेत. हा बदल आश्चर्यकारक म्हटला पाहिजे. ही सगळी समीकरणे इम्रान खान यांनी खुबीने जुळवली आहेत. आता ते 'नया पाकिस्तान' कसा घडवतात ते पाहणे उत्सुकतेचे आहे.

Trending