आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक चित्रपटगृहावर बुलडोझर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जयमती' तशी काल्पनिक होती, पण स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अनेक घटनांशी त्यातले प्रसंग समांतर जाणारे होते. 'जयमती'ची पूर्ण फिल्म आज उपलब्ध नाही, पण ७० च्या दशकात चित्रपट उद्योगावरचा लघुपटाचे भूपेन हजारिकांनी जे संशोधन केलं, तेव्हा त्यातली निम्मी फिल्मच त्यांच्याही हाती लागली होती. 


नागाव हा आसाम राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा. तो महत्त्वाचा अशासाठी कारण बहुचर्चित काझीरंगा नॅशनल पार्क याच जिल्ह्यात आहे. या जिल्ह्याची स्थापना ब्रिटिश काळातली, १८३३ सालची. दोन हजारांहून अधिक निरपराध नागरिकांची नृशंस हत्या झाली ते नेल्ली हे ठिकाण याच जिल्ह्यातलं. आजही १८ लाख लोकसंख्या असलेला हा जिल्हा. प्रशासकीय सोयीसाठी १९८९ मध्ये या जिल्ह्याचं पहिलं विभाजन झालं आणि मोरीगाव जिल्हा अस्तित्वात आला. २०१५ मध्ये या जिल्ह्याचं पुन्हा एकदा विभाजन झालं आणि होजाई जिल्हा अस्तित्वात आला. 


नेल्ली हत्याकांडाने जसा हा जिल्हा आंतरराष्ट्रीय नकाशावर आला तसाच तो २००६ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्टमध्ये भरलेल्या 'बॉलीवूड अँड बियाँड टुडे' या चित्रपट महोत्सवानंही पुन्हा एकदा जागतिक नकाशावर आला. अर्थात तो येण्याला निमित्त झालं ते तिथे प्रदर्शित झालेला 'जयमती' हा सिनेमा. भारतीय सिनेमाला राजकीय चित्रपटांचं नवं दालन मिळालं ते 'जयमती'नं. रूपकुंवर ज्योतीप्रसाद अग्रवाल हे त्या असमिया चित्रपटाचे निर्माते. 'जयमती' ही तशी ८३ वर्षांपूर्वी १९३५ मध्ये तयार झालेली फिल्म. 


गमतीचा भाग असा की जर्मनीतल्या ज्या यूएफए स्टुडिओत 'जयमती' २००६ मध्ये प्रदर्शित करण्यात आली त्याच स्टुडिओत तब्बल सहा महिने राहून ज्योतीप्रसाद अग्रवालांनी त्या काळी चित्रपटनिर्मितीचं प्रशिक्षण घेतलं होतं. 'जयमती'चं चित्रण प्रत्यक्षात झालं होतं ते गुवाहाटीपासून ३४० किलोमीटर अंतरावरच्या भोलागुडी नामक चाय बागानमध्ये. तिथल्या वेअरहाउसमध्ये त्यासाठी स्टुिडओ उभारण्यात आला होता. चित्रपट निर्मितीपूर्वी त्यासाठीची फिल्म जतन करणं हे सोपं काम नव्हतं. त्यासाठी वातानुकूलित यंत्रणा हवी होती. अग्रवालांनी कोलकात्याहून बर्फाच्या मोठमोठ्या लाद्या मागवल्या, त्या ब्रह्मपुत्रेमार्गे बोटीने गुवाहाटीला नेल्या आणि तिथून त्या साडेतीनशे किलोमीटर अंतरावरच्या भोलागुडीत नेऊन त्या फिल्मचं जतन केलं. 


राजकीय चित्रपटांचं युग ऋत्विक घटक यांच्यापासून सुरू झालं असं सहसा मानलं जातं परंतु 'जयमती' हा त्याही आधीचा राजकीय चित्रपट होता. ज्योतीप्रसादांच्या चित्रपटावर फारसं संशोधन झालेलं नाही, परंतु १९३० मध्ये तत्कालीन ब्रिटिश सत्तेविरोधात जे उठाव झाले, ज्यात महात्मा गांधींनी छेडलेला मिठाचा सत्याग्रह होता, त्याच काळात तशाच एका उठावावरचा चित्रपट होता 'जयमती'. 'जयमती' तशी काल्पनिक होती, पण स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अनेक घटनांशी त्यातले प्रसंग समांतर जाणारे होते. 'जयमती'ची पूर्ण फिल्म आज उपलब्ध नाही, पण ७० च्या दशकात चित्रपट उद्योगावरच्या लघुपटाचे भूपेन हजारीकांनी जे संशोधन केलं, तेव्हा त्यातली निम्मी फिल्मच त्यांच्याही हाती लागली होती. 


'जयमती' हा पहिला स्त्रीप्रधान भूमिकेचा चित्रपट. त्यातली 'जयमती'ची भूमिका केली होती पानिदिहिंग गावच्या आद्यू हान्डेक (Aideu Handique) नावाच्या मुलीनं. आद्यू तेव्हा होती अवघी १६ वर्षांची. पाण्यावर तरंगणारं घर दाखवतो असं सांगून एका तरुणानं तिला जहाजात बसवलं आणि थेट शहरात आणून ज्योतीप्रसादांच्या समोरच आणून उभं केलं. अहोम जातीतल्या राजकन्येच्या वेषात तिला सजवण्यात आलं.. तिनं चालायचं कसं, बोलायचं कसं, दुःखी व सुखी दिसायचं कसं याचं प्रशिक्षण तिला देण्यात आलं आणि पाहता पाहता चित्रपट तयारही झाला. चित्रपट संपवून आद्यू गावी परत गेली, पण चित्रपटात नवऱ्याला एकेरी संबोधनानं हाक मारणाऱ्या आद्यूवर आणि तिच्या कुटुंबावर गावानं चक्क बहिष्कारच घातला. काही महिन्यांनंतर गावकऱ्यांची माफी मागून प्रकरण मिटवलं गेलं. आद्यूशी लग्न करायला कुणी तयार होईना, अखेरीस सारं आयुष्य कुमारीकावस्थेत राहण्याची वेळ तिच्यावर आली. 'जयमती'नं आद्यूला प्रसिद्धी तर दिली पण पुढचे चित्रपट काही तिला मिळू शकले नाहीत. 


रूपकुंवर ज्योतीप्रसाद अग्रवाल यांनी 'जयमती'ला मिळालेल्या यशानंतर १९३८ मध्ये जयश्री नावाचं चित्रपटगृह बांधलं. त्यासाठी लागणारी जमीन त्यांनी त्यांच्या एका नातेवाइकाकडूनच शंभर वर्षांच्या लीजवर घेतली. जयश्री हे त्यांच्या कन्येचं नाव. 'जयमती'नंतर अग्रवालांनी दुसरा सिनेमा केला 'इंद्र मालती' नावाचा. तो प्रदर्शित झाला जयश्रीमध्ये. १९८५ मध्ये असमिया चित्रपट उद्योगाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला तेव्हा सरकारनं आद्यूची आठवण काढली आणि तिला तिच्या चित्रपटाची एक चित्रफित आणि एक हजार रुपयांचं मासिक पेन्शन देऊ केली. २००२ मध्ये आद्यू गेली, पण तेव्हा तर तिची आठवणही चित्रपट रसिकांना वा अासाम सरकारला झाली नाही. 


जयश्री चित्रपटगृहाची मालकी आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते चित्रपटगृह पडून तिथे एक मॉल उभा करायचा घाट घातला आणि लोकांना एकदम अग्रवालांची तसेच रूपमतीची आठवण झाली. चित्रपट निर्माता पार्थजीत बारुआ, लघुकथा लेखक शिवानंद काकती, डॉ. आकाशतारा हजारिका, मुकुट भूयान, पुनिराम सैकिया आदि मंडळी एकत्र आली आणि त्यांनी सरकारला गाऱ्हाणे घातले ते ती इमारत वाचवण्यासाठी. सरकारने ती इमारत ताब्यात घ्यावी. त्या चित्रपटगृहाला ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित करावे, तिथे जयमती-इंद्रमालती यांच्याशी संबंधित संग्रहालय करावे, अग्रवालांच्या आठवणी तिथे संग्रहित कराव्यात अशी मागणीही त्यांनी स्थानिक आमदाराकडे आणि त्यामार्फत सरकारकडे केली आहे. 


रहमान आणि संतोष.. 
संगीताचं आणि बॉलीवूडचं वेड साऱ्या पूर्वोत्तर भारतावरच स्वार झालेलं आहे याचे वेगळे पुरावे देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. संतोष गंधर्व हा एक सिक्कीमचा तरुण. सिनेसंगीतानं पुरता झपाटलेला. गुवाहाटीच्या रस्त्यारस्त्यावर संतोष गाणी म्हणत फिरत असे. असाच एकदा फिरत असताना त्याचा आवाज सिक्कीमच्या एका उद्योजकानं ऐकला. त्यानं तो ध्वनिमुद्रित केला आणि सोशल मीडियावर प्रसारित केला. संतोषचं नशीबच असं बलवत्तर की तो आवाज प्रीतम चक्रवर्ती नावाच्या एका संगीतकारानं ऐकला आणि त्यावर ट्विट करत संतोषला भेटायची इच्छा व्यक्त केली. प्रीतमचं ते ट्विटही लोकांनी शेअर केलं आणि अख्ख्या पूर्वोत्तर भारतात ते वाऱ्यासारखं पोचलं. पवन चामलिंग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री. त्यांनीही ते ट्विट पाहिलं आणि कार्यकर्त्यांना कामाला लावलं. संतोषचा शोध सुरू झाला, तो सापडलाही. अखेरीस एका संगीतकाराच्या मध्यस्थीनं आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माणसाच्या मदतीनं संतोष मुंबईला रवाना झाला. त्याचं संगीताचं, गायनाचं वेड आता तो मुंबईत पुरं करण्याच्या प्रयत्नात राहणार आहे. 


सिक्कीमचा पर्यटन आणि व्यापारदूत म्हणून गेलं वर्षभर कार्यरत असलेला संगीतकार पद्मभूषण ए. आर. रेहमान आता सिक्कीम सरकारचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पुढलं वर्षभर काम पाहणार आहे. सृष्टिसौंदर्यानं नटलेल्या सिक्कीममध्ये देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतच असतात. इथल्या संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आणि फळांवर तर ते उड्याच मारत असतात, परंतु ते आणखी मोठ्या संख्येत यावेत, राज्याच्या पर्यटन उत्पन्नाला अधिक चालना मिळावी या उद्देशानं सिक्कीम राज्य सरकारनं आता रेहमान यांची नियुक्ती सिक्कीमचेच दूत म्हणून केली आहे. सिक्कीमच्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा! 

- सुधीर जोगळेकर (ज्येष्ठ पत्रकार) 
sumajo51@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...