आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंटिनाचा मेसी बार्सिलोनाचा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेसीनं हे सारं यश अर्जेंटिनाला दिलेलं, पण बार्सिलोनाला त्यानं काय दिलं, यापेक्षा काय द्यायचं बाकी ठेवलं, चॅम्पियन्स क्लब लीगचं अजिंक्यपद स्पॅनिश ला लिगा साखळीतील ९ विजेतेपदे. युरोपीय फुटबॉल लीगची चार अन् याच कोमाडेल रे करंडकाची पाच अजिंक्यपदे. एकंदरीत १४ वर्षांत ३२ यशस्वी मोहिमा. त्या ओघात ओळीनं चारदा अन् एकंदरीत पाचदा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या बॉल ऑनडोर बहुमान. तसेच पाचदा युरोपियन गोल्डन शूजचा मौल्यवान पुरस्कार. ला लिगा साखळीत बार्सिलोनाकडून आजवर ३८३ गोल अन् १४९ गोलना हातभार. एल क्लासिक स्पर्धात २६ गोल व ११ गोलना हातभार. 

 

लिओ मेसी कुणाचा : जन्मदात्या अर्जेंटिनाचा की स्पेनमधील फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा? हाच सवाल अर्जेंटिनातील त्याचे हतबल, हताश अन् वैतागलेले फुटबॉलवेडे एकमेकांना विचारत होते, विचारत आहेत अन् विचारत राहतील. फसलेल्या विश्वचषक मोहिमांनंतरचा हाच जुना सवाल, आणखी एका अडखळत्या मोहिमेत आता नव्यानं छेडला जात आहे... 


त्यातूनच कहर झाला रशियात. चार-चार देशांच्या प्राथमिक गटवार साखळीतील दोन फेऱ्यांनंतर, मेसीचा अर्जंेटिना अवघ्या एक गुणासह तळाला फेकला गेला होता. साखळीतील तिसरा व शेवटचा सामना किमान तीन गोलच्या फरकानं, निदानपक्षी न् कसाबसा एक गोलानं का होईना पदरात पाडून घेतला नाही तर - तर विश्वचषकातून गच्छंती! आणि तीच लक्षणं २५ जूनपर्यंत दिसत होती. साऱ्या अर्जेंटिनाला चिंताक्रांत करत होती. 
या अपयशाचा धनी प्रामुख्यानं ठरवला जात होता लिओ मेसी. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे दावेदार मेसी व पोर्तुगालचा (अन् स्पेनमधील रियल माद्रिद क्लबचा!) क्रिस्तिआनो रोनाल्डो. पण एकीकडे रोनाल्डो, त्याच्या गटवार साखळीतील पहिल्या दोन सामन्यांत चार गोल चढवत होता. संघाच्या खात्यात चार गुणांचा भरणा करत होता अन् दुसरीकडे मेसीच्या चढाया वांझोट्या ठरत होत्या, इतकंच नव्हे, तर आइसलँडविरुद्ध पेनल्टीचा हुकमी गोल वसूल करून घेणे त्याला जमलेलं नव्हतं. ही तुलना अर्जेंटिनाला अधिकच जिव्हारी लागत होती. वैफल्याच्या भरात अर्जेंटिना जुन्या निष्कर्षावर नव्यानं जात होतं. मेसी कसचा अर्जेंटिनाचा? तो तर स्पेनमधील बार्सिलोना फुटबॉल क्लबचाच! 


या निष्कर्षासाठी मेसीच्या १४ वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्दीचा आढावा आधारभूत धरला जात होता. मेसीने त्याच्या जन्मदात्या देशाला काय दिलं? कोणते आंतरराष्ट्रीय गौरव मिळवून देण्यास मोठा हातभार लावला? दहा वर्षांपूर्वी ऑलिम्पिक सुवर्णपदक, ही त्याची भरघोस कमाई. २००८चे बीजिंग ऑलिंम्पिक, अर्थातच तेवीस वर्षांखालील फुटबॉलपटूंनाच खुलं होतं. ते गाजवलं होतं लिओ मेसीनं. गेल्या विश्वचषकात त्याला जर्मनीच्या सुवर्णानं हुलकावणी दिली. तरीही उपविजेतेपदापर्यंतची धडक मुख्यत: त्याच्याचमुळे शक्य झाली. 


मेसीनं हे सारं यश अर्जेंटिनाला दिलेलं. पण बार्सिलोनाला त्यानं काय दिलं, यापेक्षा काय द्यायचं बाकी ठेवलं, चॅम्पियन्स क्लब लीगचं अजिंक्यपद, स्पॅनिश ला लिगा साखळीतील ९ विजेतेपदे. युरोपीय फुटबॉल लीगची चार अन् याच कोमाडेल रे करंडकाची पाच अजिंक्यपदे. एकंदरीत १४ वर्षांत ३२ यशस्वी मोहिमा. त्या ओघात ओळीनं चारदा अन् एकंदरीत पाचदा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या बॉल ऑनडोर बहुमान. तसेच पाचदा युरोपियन गोल्डन शूजचा मौल्यवान पुरस्कार. ला लिगा साखळीत बार्सिलोनाकडून आजवर ३८३ गोल अन् १४९ गोलना हातभार. एल क्लासिक स्पर्धांत २६ गोल व ११ गोलना हातभार. 


मेसीनं स्वत:चं अन् बार्सिलोनाचं नाव वर्षातून १२ महिने, तप-सव्वा तप जगभर दुमदुमत ठेवलं. उगाच नाही बार्सिलोना त्याला विश्वविक्रमी मानधनात करारबद्ध करते! निव्वळ या करारातून त्याची कमाई किती असावी? दर आठवड्याला साडेतीस कोटी रुपये म्हणजेच दिवसाचे सुमारे चव्वेचाळीस लाख म्हणजेच दर तासात एक लाख ऐंशी हजार. अर्थातच मिनिटामागे तीन हजार अन् दर सेकंदाचे पन्नास रुपये! मेसीचा प्रमुख स्पर्धक असलेल्या रोनाल्डोची साप्ताहिक कमाई जवळपास पंचवीस कोटी. अर्थातच मेसीपेक्षा साडेपाच कोटींनी कमी. 
मेसी आपला अनमोल ठेवा आहे, असं बार्सिलोनाचं व्यवहारचतुर व्यवस्थापन जाणतं, मानतं. ज्या दोन पायांत त्याचे प्राण दडलेले आहेत, त्यांचा विमा केवढ्याचा उतरलेला असावा? चक्क पाऊणशे कोटी युरोंचा, चक्क सहा हजार कोटी रुपयांचा! इथं हेही नमूद केलं पाहिजे की रोनाल्डोच्या पायांचा विमा सव्वादहा कोटी युरोंचा वा सव्वाआठशे कोटी रुपयांचा. गेल्या जमान्यातील नायक डेव्हिड बेकहमच्या पायांचा विमा साडेएकोणीस कोटी डॉलर्सचा वा साडेतेराशे कोटी रुपयांचा. 


मेसीनं अर्जेंटिनाला काय दिलं, याचा हिशेब मागणाऱ्यांनी, अर्जेंटिनानं मेसीला काय दिलं, याचीही जाण ठेवावी अन् मेसीनं बार्सिलोनाला काय काय दिलं, असा छद्मी प्रश्न विचारताना, बािर्सलोनानं मेसीला काय दिलं अन् काय द्यायचं बाकी ठेवलं, हेही समजून घ्यावं. 


सुरुवातीपासून सुरुवात करूया. शाळकरी लिओच्या अद््भुत पायांतील फुटबॉलचा ठेवा हेरला कुणी? जोपासला कुणी? अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशन वा अर्जेंटिनातील सत्ताधारी शासकीय वर्गानं की अर्जेंटिनापासून दूरवरच्या युरोप खंडातील स्पेनच्या बार्सिलोनानं? 


रोझेरिओ या छोट्याशा गावात जन्मलेल्या लिओने स्थानिक स्पर्धात अल्पावधीत विलक्षण दरारा निर्माण केला. पण बालवयात त्याला सतावू लागली ग्रोथ हार्मोन्समधील कमतरता. औषधांवरचा खर्च दरमहा हजार डॉलर्स वा सत्तर हजार रुपयांच्या घरातला. वडील जोर्ज हे पोलाद कारखान्यातील कामगार. त्यांनी काढलेल्या विमा पॉलिसीतून दोन वर्षे लिओचा खर्च निभावला गेला. ज्या नेवेल ओल्ड बॉइज संघाकडून छोट्या लिओने तेव्हा ५०० गोल लगावले होते, त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं, पण आपला शब्द ते पाळू शकले नाहीत. एव्हाना बार्सिलोनासाठी बाल गुणवत्ता शोध पथकाने लिओला हेरलं होतं. त्यांनी लिओला चाचणीसाठी स्पेनला नेलं. वय वर्षे बाराच्या या चिमुकल्याच्या औषधपाण्याची संपूर्ण जबाबदारी कोणी उचलली? अर्जेंटिनानं नव्हे, तर बार्सिलोना या स्पॅनिश क्लबनेच! 


मग अशीच एक अभूतपूर्व गोष्ट घडली. परदेशातील पोरांना करारबद्ध करण्याची पद्धत युरोपमध्ये रूढ नव्हती. पण लिओच्या कौशल्यावर भाळलेल्या अव्वल संघाच्या संचालकांनी व्यवस्थापनाचे मन वळवले. लिओच्या वडिलांना तोंडी आश्वासन नको होतं, लेखी करार हवा होता. त्याक्षणी क्लबचं लेटरहेड हाताशी नव्हतं तरी संचालक चार्ली रोक्साट यांनी पेपर नॅपकीनवर सही केली! लिओ व कुटंुबीय यांची व्यवस्था स्टेडियमच्या परिसरातील फ्लॅटमध्ये केली. 


त्यानंतर टप्प्याटप्प्यानं मेसी खेळत गेला, वयोगट संघांतून कॅडेट ज्युवेनाइल्स, मग बार्सिलोना 'क' संघ. त्यानंतर 'ब' संघ. मग अव्वल संघ. ही पद्धतशीर जोपासना कुणी केली? अर्जंटिनाने नव्हे, तर स्पेनमधील बार्सिलोना क्लबनेच! 
लिओची राहण्याची, सकस आहाराची, फुटबॉल प्रशिक्षणाची, उंचावत जाणाऱ्या स्पर्धात्मक सहभागाची सारी उत्तम व्यवस्था कुणी केली? अर्जंेटिनानं नव्हे, तर बार्सिलोना या स्पॅनिश क्लबनं आणि उंचावणाऱ्या कामगिरीस साजेसं वाढतं मानधन कुणी दिलं अन् वाढत्या मानधनाचं ठोस आकर्षण कुणी दाखवलं? अर्जेंटिनानं नव्हे, तर बार्सिलोना स्पॅनिश क्लबनेच. 


सरतेशेवटी दोन महत्त्वाच्या गोष्टी. बार्सिलोनाच्या खात्यात मेसी गोलवर गोल जमा करतो. त्यात साथ कुणाची? ब्राझीलचा नेमार व उरुग्वेचा सुआरेझ या तोलामोलाच्या सहकाऱ्यांची. दोन वर्षांतील गोलची आकडेवारी बोलकी : मेसीचे गोल ५८, त्यात नेमार-सुआरेझची भर ६४. त्यानंतरच्या वर्षात मेसी ४१, नेमार व सुओरझ ९०. पण अर्जेंटिनाकडून खेळताना इतके तोलमोलाचे आक्रमक त्याला कुठे लाभतात? 


दुसरी बाब तितकीच महत्त्वाची अर्जेंटिना आज विश्वचषकाला प्रवेशपात्र ठरला तो कुणामुळे? तर, बार्सिलोनाच्या नव्हे, तर अर्जेंटिनाच्या मेसीमुळे. कॉनमेबॉल या प्राथमिक गटातून विश्वचषकाला पाच संघ प्रवेशप्राप्त होते. तेव्हा अखेरच्या सामन्यात इक्वेडोरविरुद्ध हॅट््ट्रिक कुणी केली? प्रवेशपात्रता कुणी मिळवून दिली? बार्सिलोनाच्या नव्हे, तर अर्जेंटिनाच्याच मेसीने! मेसी अर्जेंटिनाचाच. पण त्याला घडवलं बार्सिलोनानं अन् फक्त बार्सिलोनानेच! अर्जेंटिनाला त्याचा लाभ फुकटात झाला. त्याच्या देशप्रेमावर, निष्ठेवर शंका घेणं कृतघ्नपणाचंच! 

- वि. वि. करमरकर 
(ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) 

बातम्या आणखी आहेत...