प्रासंगिक : होऊ / प्रासंगिक : होऊ द्या, दूध का दूध...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले गेले आहे. संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हा प्रश्न मांडला जात होता. सुरुवातीच्या काळात त्याचे स्वरूप मर्यादित असल्यागत चित्र होते, पण जसा काळ २०१९ च्या दिशेने सरकू लागला, तसा दुधाच्या दराचा प्रश्नही ऐरणीवर येऊ लागला. इतका की, त्याने आता राज्यव्यापी स्वरूप धारण केले. गेल्या वर्षात शेतकरी संपावर जाण्याचे आंदोलन गाजले. अाठवडाभराच्या अांदाेलनात शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला. दुधाचे टँकर ओतून दिले. राज्यातील प्रमुख मार्गांसह राष्ट्रीय वा राज्य महामार्गावर दुधाचा पूर अाेसंडला. त्या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले वा या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांना काय मिळाले झाले हा संशोधनाचा विषय ठरावा; पण त्या आठवडाभरात शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले. ते पाहून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संघटना वा त्यांचे मुखंड यांचा अपवाद वगळता समाजाच्या सर्वच स्तरांवर हळहळ व्यक्त केली गेली. दूध दरवाढ आंदोलनाच्या अनुषंगाने तसेच काहीसे चित्र निर्माण होऊ पाहते आहे. शासनाने दुधाचे दर वाढवून देतानाच अन्य राज्यांप्रमाणे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, ही स्वाभिमानी संघटनेची मूळ मागणी आहे. त्याचा पाठपुरावा संघटना पातळीवरून केला जात असला तरी खासदार शेट्टी एकेकाळी केंद्रातील सत्ताधारी भाजपचेच एक घटक असतानाही या प्रश्नाला चालना देऊ शकले नाहीत हेही कटू असले तरी सत्य आहे. किंबहुना, त्यामुळेच स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीचे राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले असले तरी त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

जयप्रकाश पवार

Jul 17,2018 08:29:00 AM IST

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाेबतच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम करण्याचीही एक चाल असल्याचे नाकारता येत नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दूध दरवाढीच्या प्रश्नामुळे चांगलाच गोंधळ झाला. मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करीत या प्रश्नावर जलदगतीने तोडगा काढण्याची शाश्वती सभागृहाला देणे भाग पडले. सत्ताधारी भाजप कोंडीत सापडतो आहे म्हटल्यावर विरोधक संधीचे सोने करण्याचे सोडणार नाहीतच, पण शिवसेनेनेही त्याचा लाभ उठवत दुधाच्या पुरात हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केला. एक मात्र वास्तव आहे की, शेतकरी संपाला अर्थात आंदोलनाला ज्या रीतीने राज्य वा देशपातळीवर शेतकऱ्यांचा सक्रिय अन् सबळ पाठिंबा मिळू शकला होता, तेवढा या आंदोलनाला किमान दुसऱ्या दिवसापर्यंत मिळालेला नव्हता.

मुंबईचा दूधपुरवठा खंडित करायचा म्हणजेच मुंबईकरांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे सुमारे ९० लाख लिटर दूध रोज पुरवले जाते तो पुरवठा बंद पाडायचा निर्धार संघटनेने केला. मुंबईची कोंडी करणे आता फारसे साेपे राहिलेले नाही. शेजारचा गुजरात मुंबईच्या मदतीला सदैव तयार आहेच. शिवाय महाराष्ट्राच्या हद्दीत सध्या कार्यरत असलेल्या टेस्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून दूधधारा मुंबईत कशी पोहोचेल याची तरतूद करण्याच्या हालचालींना वेग मिळू शकतो. हेही पुरेसे ठरत नाही म्हटल्यावर अहमदाबादेतून मुंबईत थेट रेल्वेनेच दुधाचा पूर आणायचा अशीही एक युक्ती अमलात येऊ शकते. खरे काय अन् खोटे काय हे केंद्रातील अन् राज्यातील सत्ताधाऱ्यांनाच माहीत. महाराष्ट्र किसान सभेने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय किसान महासभेनेही दूध दरवाढीचे आंदोलन शेतकऱ्यांशी संबंधित असल्यामुळे दुरून डोंगर साजरे न करता पाठिंबा देण्याची भूमिका घेतली खरी; पण त्यांच्या राजकारणात पडायचे नाही. दूध सांडायचे नाही, फेकायचे नाही हे करण्यापेक्षा दूध ग्राहकाला घालायचेच नाही. त्यामुळे आंदोलनाच्या आधीच दुधाचे संकलन थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे या महासंघाच्या नेत्यांना वाटते.

शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनांचीच ही तऱ्हा असेल तर दूध दरवाढीच्या आंदोलनाचे भवितव्य काय असेल, याचा ताळेबंद आता मांडण्याची घाई करणे चुकीचे ठरेल. तथापि, दिव्य मराठीने नाशिक आवृत्तीच्या वर्धापन दिनाच्या औचित्यावर प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये दुधाशी संबंधित एक प्रक्रिया उद्योग हा एक मुद्दा घेतला होता. दुधापासून चीज, आइस्क्रीम, बटर आदींसारखी उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ शकतात ही बाब समोर आली होती. या बदलत्या जमान्यात या उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सप्रमाण दाखवून दिले होते. खा. शेट्टी यांनी दूध दरवाढीच्या मुद्द्यावर आंदोलन करतानाच दुधावरील प्रक्रिया उद्योगाबाबतच्या पर्यायाची चाचपणी केली तर दूध रस्त्यावर फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक

X
COMMENT