Home | Editorial | Columns | column article about 'Nidhal' model

गावांच्या विकासाचे पथदर्शी 'निढळ' मॉडेल

यमाजी मालकर, ज्येष्ठ पत्रकार | Update - Jul 23, 2018, 06:13 AM IST

निधी आणि लोकसहभाग या कळीच्या अडचणीवर मात कशी करता येईल, या प्रश्नाचे उत्तर देणारे मॉडेल निढळ गावात उभे राहिले आहे.

 • column article about 'Nidhal' model

  गावांच्या विकासकामांना कमी पडणारा निधी आणि लोकसहभाग या कळीच्या अडचणीवर मात कशी करता येईल, या प्रश्नाचे उत्तर देणारे मॉडेल निढळ गावात उभे राहिले आहे. गावातून बाहेर गेलेल्या नोकरदार आणि व्यावसायिकांचा गावकरी म्हणून सहभाग मिळवणे हे ते मॉडेल होय. ग्रामीण विकासाला चालना देण्याची क्षमता या मॉडेलमध्ये आहे.

  आपली शहरे बकाल होत आहेत आणि गावे भकास होत आहेत, असे वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागाविषयी म्हटले जाते आणि ते खरेच आहे. हे चित्र बदलावे यासाठी तुरळक का होईना पण प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच आदर्श गाव, स्वच्छ गाव, उत्तम जलसंधारण असे अनेक पुरस्कार गेली अनेक वर्षे मिळवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निढळ गावाविषयी कुतूहल होते. पंधरा दिवसांपूर्वी त्या गावी जाण्याची संधी मिळाली आणि असेही होऊ शकते याचा एक सुखद धक्का बसला. ज्या कारणांमुळे गावे ओस पडत आहेत ती सर्व कारणे शोधून त्यावर या गावात अतिशय बारकाईने गेली तब्बल ३५ वर्षे काम चालू आहे. पण हे शिवधनुष्य उचलण्यासाठी चांगले नेतृत्व लागते. या गावाचे नेतृत्व केले आहे सरकारमध्ये अनेक विभागांत महत्त्वाची पदे सांभाळणाऱ्या चंद्रकांत दळवी यांनी. श्री. दळवी दोन महिन्यापूर्वी पुणे विभागाचे आयुक्त म्हणून निवृत्त झाले. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाला चालना देणारे आणि झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोझल पद्धतीचे जनक असलेल्या दळवी यांचे निढळ हे मूळ गाव असून ते वर्षानुवर्षे दुष्काळी गाव म्हणूनच प्रसिद्ध होते. पाच हजार लोकवस्तीचे हे गाव मुळातच अवर्षणप्रवण भागात आहे. त्यामुळे अशा भागातील गावात जे काही होते ते सर्व काही या गावातही होत होते. लहानपणी याच गावात दुष्काळाचे थेट चटके सहन केलेले दळवी हे १९८३ मध्ये सांगलीचे उपजिल्हाधिकारी झाले. आपल्या गावाचा आणि शाळेचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला म्हणून शाळेने त्यांचा सत्कार केला. आपलीच शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहे आणि गावाला पार अवकळा आली आहे हे दळवी यांच्यातील संवेदनशील माणसाला जाणवले आणि तेथूनच निढळच्या बदलाची सुरुवात झाली.


  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी आदर्श गाव संकल्पना रुजवली तेव्हा या संकल्पनेच्या आधारे अशी अनेक गावे आदर्श करण्याचे प्रयत्न झाले आणि हाताच्या बोटावर मोजता येतील अशी काही गावे उभीही राहिली. पण एकूण गावांची संख्या आणि ग्रामीण भागात उग्र होत चाललेले प्रश्न पाहता त्यांची स्थिती मोजक्या बेटांसारखी आहे. याचा अर्थ आदर्श गावाचे असे काही मॉडेल होऊ शकत नाही हेच इतक्या वर्षांत समोर आले. या पार्श्वभूमीवर निढळचा प्रयोग महत्त्वाचा वाटतो आणि ज्या ज्या गावांत नेतृत्व उभे आहे आणि इच्छाशक्ती आहे त्यांच्यासाठी तो पथदर्शी ठरावा. या प्रयोगाला आता तब्बल ३५ वर्षे झाल्यामुळे तो शाश्वत ठरू शकतो, असे म्हणता येईल. खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, त्यांचा आर्थिक विकास व्हावा आणि शहरी ग्रामीण ही दरी कमी व्हावी याची मूळ जबाबदारी सरकारची आहे. मात्र लोकसहभाग नसेल तर सरकारही काही करू शकत नाही. शिवाय सरकार आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नसल्याने गावाच्या गरजा त्या भागवू शकत नाहीत. गेल्या काही दिवसांतील एक बदल म्हणजे गावातील काही लोक, गावाबाहेर गेलेले लोक श्रीमंत झाले आणि स्थानिक स्वराज्य संस्था मात्र गरीब झाल्या. गावातील श्रीमंत आणि त्या गावातील बाहेर गेलेल्या नोकरदार, व्यावसायिकांना आपले गाव सुधारण्याची साद घातली तर? आपण सरकारी पदांवर काम करत असलो तरी एका गावाला सरकारच्या तिजोरीतून फार काही देऊ शकत नाही याची जाणीव झालेल्या दळवी यांनी नेमके हेच हेरले.


  निढळच्या शाळेची नव्याने उभारणी करण्याचा संकल्प दळवी यांनी १९८३ मध्ये केला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि विशेषत: नोकरी-व्यवसायासाठी पुण्या-मुंबईला गेलेल्या गावकऱ्यांना त्यांनी आवाज दिला. निढळ आणि कातळवाडीच्या घराघरात जाऊन त्यांचे पत्ते मिळवण्यात आले, असे ७५० जणांचे पत्ते त्यांनी मिळवले आणि त्यांना पत्रे पाठवण्यात आली. गावापासून दूर जावे लागलेले गावकरी दिवाळीला गावात येतात. त्याच वर्षी दिवाळीत गावात अशा सर्वांची सभा घेण्यात आली. तिला ४०० जण उपस्थित राहिले. निढळ नोकरवर्ग व व्यावसायिक ग्रामविकास संघटना, मुंबई अशी संस्थाच स्थापन करण्यात आली. सुरुवातीस शाळेची इमारत उभी करणे आणि शाळेत सुधारणा करणे हेच उद्दिष्ट होते. बांधकाम पूर्ण होईतो नोकरदारांनी दरवर्षी १०१ रुपये, तर गावातील प्रत्येक कुटुंबाने ५१ रुपये वर्गणी जमा करण्याचे ठरले. दळवी यांनी पुढाकार घेऊन हे संघटन केले आणि शाळेची टुमदार इमारत उभी राहिली. अर्थात, यासाठी तब्बल १० वर्षे लागली. पण त्यातून संस्थेच्या सदस्यांचा गावाकडे ओढा वाढत गेला. त्यातूनच निढळच्या पुढील प्रवासाचा पाया घातला गेला. गावाच्या विकासासाठी असलेल्या निधीची कमतरता भरून काढण्याचा आणि गावकऱ्यांचा सहभाग वाढवण्याचा एक चांगला मार्ग दळवी यांना या प्रवासात सापडला. या काळात काही नोकरदार निवृत्त होऊन गावात राहायला आले आणि ते कार्यकर्ते झाले. गावात एकतरी काम लोकवर्गणीतून चालू असले पाहिजे असे नियोजन केल्याने गेल्या ३५ वर्षांत निढळचा चेहरामोहराच बदलून गेला.


  परवाच्या भेटीत एक समृद्ध खेडे कसे असू शकते याचे दर्शन निढळच्या रूपाने झाले. अजून पुरेसा पाऊस झाला नसतानाही पाणलोट, जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामांमुळे पाण्याने भरलेल्या विहिरी आणि ओढे, गावाचा स्वच्छ परिसर, दरवर्षी झाडे लावल्यामुळे आणि चाराबंदीमुळे सर्वत्र दिसणारी झाडी, गावकऱ्यांनी लक्ष घालून करून घेतलेले उत्तम रस्ते, गावाच्या शिवारात सर्वत्र दिसणारी हिरवीगार शेती, आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत आणि पत निर्माण व्हावी यासाठी स्थापन झालेली नीलकंठेश्वर पतसंस्था (या पतसंस्थेची आता मुंबईत एक शाखा आहे.), लेखापरीक्षणात सतत 'अ' वर्ग मिळवणारी विविध कार्यकारी सेवा संस्था, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आणि या सर्वांच्या टुमदार इमारती, विश्वास बसणार नाही इतके मोठे आणि चकाचक ग्रामपंचायत कार्यालय आणि कामांत व्यग्र असलेले गावकरी. आधुनिक काळाच्या गरजा म्हणून जे जे गावात असावे असे वाटते ते सर्व काही या गावात आज पाहायला मिळते. गावाच्या मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण हटवून तेथे जॉगिंग पार्क, लॉन, पोहण्याचा तलाव ही कामे सध्या सुरू आहेत.


  ३५ वर्षे निढळमध्ये हे काम होते आहे आणि त्याला आता एक चांगले रूप आले आहे. चंद्रकांत दळवी यांनी चिकाटीने ते पुढे नेले म्हणून हा प्रवास शक्य झाला. या प्रवासात त्यांच्या या नेतृत्वगुणांसह सहा गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरल्या. त्या म्हणजे गावाबाहेर गेलेल्या गावकऱ्यांचे संघटन आणि त्याचा सतत विस्तार, दुसरे म्हणजे लोकवर्गणीच्या भावनेतून गावातील कामांत गावकऱ्यांमध्ये आलेला गावाविषयीचा आपलेपणा, तिसरे म्हणजे विकासकामांपासून दूर ठेवलेले राजकारण, चौथे म्हणजे गावात निर्माण झालेल्या आर्थिक आणि रोजगारसंधी. पाचवी गोष्ट म्हणजे सरकारी योजनांचा अभ्यास करून त्याचा गावाला मिळवून दिलेला लाभ आणि सहावी गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून ती वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांनुसार बदलत राहील हे मान्य करणे. आपल्या आयुष्यात जी संपन्नता आली आहे ती आपल्याला आपल्या गावातही पाहायला मिळाली पाहिजे असे अनेकांना आता वाटू लागले आहे. नाइलाजाने गाव सोडावे लागले, पण गावाशी नाळ जोडलेली आहे अशा लाखो नोकरदार, व्यावसायिकांना जोडण्याचे हे मॉडेल गाव बदलण्याचा मोहिमेला निश्चित बळ देईल.
  - यमाजी मालकर, ज्येष्ठ पत्रकार
  ymalkar@gmail.com

Trending