प्रासंगिक : 'बहुरुपीं'चा चेहरा बदला
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा राईनपाड्यात तब्बल साडेपाचशे किलोमीटर अंतरावरून भीक मागण्यासाठी आल
-
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा राईनपाड्यात तब्बल साडेपाचशे किलोमीटर अंतरावरून भीक मागण्यासाठी आलेल्या नाथपंथी डवरी समाजाच्या पाच लोकांचा कुण्या राक्षसांनी नव्हे तर संवेदना हरवलेल्या माणसांनीच दगडांनी ठेचून खून केला. नाथपंथीय समाजातील हे लोक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील होते. राईनपाड्यापासून हे गाव साडेपाचशे किलोमीटर अंतरावर आहे. हे लोक आपल्या कुटुंबासह आलेले होते.
सध्या देशभर मुलं पळवण्याची अफवा साेशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे या भोसले परिवारातील लोकांनी आधीच जेथे त्यांनी आपली गावाबाहेर पालाची घरे उभारली होती, त्या पिंपळनेर पोलिस ठाण्यात आणि सटाणा तालुक्यातील ताहाराबाद पोलिस ठाण्यात आपल्या कुटुंबाची नोंद केली. जेणेकरून आपल्यावर कुणी मुले पळवण्याचा किंवा आपण चोर असल्याचा आरोप करू नये. एवढे सर्व करून या भिक्षुकांना राईनपाडा गावकऱ्यांच्या तावडीतून कुणी वाचवू शकले नाही. आपले संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी घेतलेल्या काळजीची कुणीच दखल घेतली नाही, याचे या पीडित कुटुंबाच्या परिवाराला अतोनात दुःख झाले. नाथपंथीय समाजाची परंपरा आहे की, ते कधी बहुरुपी बनून तर कधी काही कार्यक्रम करून भीक मागत असतात. पण राईनपाड्यात हे लोक एका बसने गेले, त्यांना कुणी दिलेली भीक तांदूळ, डाळीच्या स्वरूपात त्यांच्या पिशवीतही जमा झाली होती. मात्र, बहुरुप्याचे जीवन जगणाऱ्यांना माणूसरुपी सैतानांनी ठेचून मारले. अशीच काहीशी घटना चार वर्षांपूर्वी नागपूरला घडली होती.
तेव्हाही दोन बहुरुपींची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राईनपाडा गावातील महिलाही स्तंभित झाल्या. त्यांच्या गावातील लोक असे कसे करू शकतात? ज्यांनी या निष्पाप लोकांना मारले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसह सानुग्रह अनुदान, आर्थिक मदत, वारसाला नाेकरी आणि अन्य मागण्यांसाठी या समाजातील पुढारी आणि पीडितांच्या कुटुंबातील सदस्यांनी मागणी लावून धरली. शासन ती पूर्णही करणार आहे, असे प्रशासनाने जाहीर केले पाहिजे. पण एवढ्याने हा प्रश्न सुटणार आहे का? तर अजिबात नाही. कारण चार वर्षांपूर्वी जशी घटना नागपुरात घडली, त्यापेक्षा भयानक घटना धुळे जिल्ह्यात घडलीच ना? कोण खात्री देणार, असे प्रसंग नाथपंथीय समाजावर येणार नाहीत याची. कदाचित नसेल नाथपंथीय, तर अन्य कुणा भटक्यांचा बळी जाईल. त्यामुळे शासनाने या घटनेतून धडा घेतला पाहिजे. या समाजाच्या अनेक पिढ्यांनी भीक मागितली, आता ती थांबली पाहिजे. यांच्या पुढच्या पिढीला सक्तीचे शिक्षण आणि यापुढे बहुरुपी नाही तर एकरुपी जीवन जगण्याचे सामर्थ्य त्यांना मिळवून दिले पाहिजे.
राईनपाड्यातील घटनेनंतर एक मुद्दा समोर आला तो म्हणजे नाथपंथीय समाज जो मोठ्या प्रमाणात सोलापूर आणि कर्नाटक भागात आहे, त्यांची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. त्यांना भीक मागण्याची परंपरा सोडून मुख्य प्रवाहात यायची किती इच्छा आहे, हे जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर त्यांच्या सामाजिक विकासाची योजना आखली गेली पाहिजे. कारण कोणतीही घटना ही धडा शिकवण्यासाठीच घडते, असे म्हटले जाते. राईनपाड्यातील घटनेने या समाजाला आणि शासनाला चांगलीच अद्दल घडली असावी. घटना घडल्यानंतर शासनाने तत्काळ मदत जाहीर करायला हवी होती. पण त्यासाठीही २८ तास उलटून जाऊ द्यावे लागले. उशिरा का होईना मदत जाहीर झाली. पण, या समाजातील जाणकारांनी जो प्रस्ताव दिला त्यातील मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी तत्काळ समिती नेमली पाहिजे. बहुरुपी बनून भीक मागणे ही या समाजाची परंपरा असली तरी या घटनेमुळे हे लोक आता जगण्यासाठी कोणताही मुखवटा घालणार नाहीत, हे या पीडित कुटुंबातील लोकांचे म्हणणे एेकल्यावर कळते. समजा घातलाच तर ती माणसं राहतात त्या गावातच ते जातील. म्हणून सरकारने या बहुरुपी नाथपंथीयांची व्यथा समजून घेत, त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी पाचशे किलोमीटर दूर जाण्याची वेळ येणार नाही, हे पाहिले पाहिजे. समाजात दहशत माजवणारे जे-जे नेटकरी (अफवा पसरवणारे) समाजकंटक आहेत, त्यांचाही वेळेत बंदोबस्त झाला पाहिजे. अन्यथा सोशल मीडिया हा संवादाचे कमी आणि संपवण्याचेच काम अधिक करेल, कारण राईनपाड्याची घटना ही अफवांमधूनच घडली आहे. अन्यथा सामान्य माणूस एवढा क्रूर कधीच नव्हता.
- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव