आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत का नावडे भिडेंना?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिडेंच्या हिंसक विचारांना हिंसक कृतीने (चोपणे वगैरे) उत्तर देणं चूकच होईल, पण महाराष्ट्रात द्वेष आणि हिंसक वातावरण खदखदतंय, त्यातून एक दिवस स्फोट होईल याची ही लिटमस टेस्ट म्हणता येईल. असा स्फोट होऊ नये, कुणी कुणाला चोपू नये, तलवारी चालवू नयेत, अशीच सामान्य माणसांची इच्छा आहे, पण लक्षात कोण घेतो? 


कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा 'मनू' श्रेष्ठ होता, असं वादग्रस्त विधान पुण्यात केलं. हे विधान केवळ वादग्रस्तच नाही, तर संतांचा घोर अवमान करणारं आहे. त्याही पुढे जाऊन म्हणता येईल की, हा वारकरी संप्रदाय आणि संत विचारांवर मोठा हल्ला आहे. 


संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची दिंडी पुण्यात मुक्कामी असताना पुण्यात भिडेंनी संतांना तुच्छ लेखलं. पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्यांना दुखावलं. भिडेंच्या या वक्तव्याविरोधात राज्यात संतापाची भावना आहे. संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांना सल्ला दिलाय. भिडेंनी तलवारी हातात घेत धारकरी होऊन हिंसकपणा दाखवण्यापेक्षा टाळ हातात घेऊन वारकरी व्हावं. तरच त्यांना ज्ञानोबा-तुकोबाराय कळतील. धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव धारण करून बरळणाऱ्या भिडे यांची भीड ठेवण्याइतके आम्ही वारकरी नामर्द नाही, असा इशारा देत देहूकरांनी "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथा हाणू काठी" या अभंगाची आठवण करून दिली. 
महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या संतांच्या विचारांवर भिडेंनी हल्ला का चढवला? भिडेंकडे हे धाडस कुठून आलं? त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे? या प्रश्नांचा माग काढला तर लक्षात येईल की, भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाने त्यांना सांगली, सातारा, कोल्हापुरात कार्य करायला पाठवलं. बहुजन तरुण मुलांना ते छत्रपती शिवराय, शंभूराजे यांचा इतिहास सांगत मनुवादी बनवतात. मनूने लिहिलेली मनुस्मृती हा भेदभावाचं तत्त्वज्ञान मांडणारा ग्रंथ. त्या ग्रंथातलं विकृत तत्त्वज्ञान लोकांना सांगून समाजावर ब्राह्मण्यवाद लादणं हे काम भिडे करतात. ब्राह्मण्यवाद म्हणजे एका वर्चस्ववादी विचारांची भलामण. वर्चस्ववादी आणि इतरांना तुच्छ लेखणारी टाकाऊ, कालबाह्य पोथी निषेधार्ह म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहस्रबुद्धे नावाच्या थोर ब्राह्मणाच्या हस्ते कोकणात मनुस्मृतीची होळी केली होती. बाबासाहेबांनी जी पोथी जाळली तिची तारीफ आता भिडे करत आहेत. मनूने गावोगाव जाऊन लोकांचं संघटन केलं. मनुस्मृतीची अंमलबजावणी सुरू केली. त्या आधारे हजारो वर्षे देश चालवला, याचा भिडेंना गर्व आहे. या गर्वाचे गीत गात त्यांनी मनूपुढे ज्ञानोबा-तुकोबाराय कमीच, असं सांगत टाळांऐवजी तलवारीची महती गायली. 


वारकऱ्यांना पर्याय म्हणून धारकरी पंथ भिडेंनी का तयार केला आहे? यामागे संघ परिवाराची हुशारीने केलेली चाल आहे. संघ परिवार त्यांना खटकणाऱ्या, नावडणाऱ्या प्रत्येक प्रतीकं, तत्त्वज्ञान, पंथ यांना पर्यायी तत्त्वज्ञान तयार करतो. पर्यायी तत्त्वज्ञान मांडायचं आणि नावडणारा पंथ, तत्त्वज्ञान मारून टाकायचं असं हे कारस्थान आहे. संघाला समता हे मूल्य मान्य नाही, मग संघाने त्याला पर्याय दिला समरसता या विचाराने. संघाला संविधान मान्य नाही, त्याला पर्याय दिला मनुस्मृतीचा. संघाला आदिवासी जनजातीचं 'आदिवासी' असणं मान्य नाही, त्यांनी आदिवासी हे वनवासी आहेत असं म्हणायला सुरुवात करून, ते आदिवासींच्या गळी उतरवलं. जंगल मालक आदिवासींना वनवासी म्हणजे वनातले परके दीनवाणे बनवलं. 


संघाला रयतेचा राजा, कुळवाडी भूषण, लोककल्याण राजा ही छत्रपती शिवरायांची बिरुदं खटकतात. मग संघाने शिवराय हे गोब्राह्मण प्रतिपालक होते, असं म्हणणं रेटलं. शंभूराजे हे महापंडित, कवी, रणनीतिकार, जगप्रसिद्ध योद्धे, सात भाषा बोलणारे बहुभाषाज्ञानी, तत्त्वज्ञ राजा होते हे लपवून ठेवत संघाने त्यांना धर्मवीर म्हणून मांडलं. त्यांची महती, चरित्र संकुचित केलं. असा हा प्रतीकं, विचार, तत्त्वज्ञानाशी खेळत स्वतःचा वर्चस्ववाद लादण्याची संघाची विचारसरणी उराशी बाळगून भिडे कार्य करतात. सायकल चालवणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, छोट्या खोलीत राहणे, उच्चशिक्षित आहे असा गवगवा करणे, गांधींना मानत नसताना गांधी टोपी घालणे, साधे राहणे हे भिडेंचे दाखवायचे दात आहेत. त्यांचा त्याग लोकांना भुलवतो जरूर, पण त्यांचे खायचे दात हिंस्र आहेत. त्या हिंस्रतेतून ते संतांचा, वारकऱ्यांचा द्वेष करत आहेत. वारकरी संप्रदायाला पर्याय म्हणून धारकरी संप्रदाय म्हणूनच ते पुढे रेटत आहेत. 


संत, वारकरी संप्रदायाचं भिडे आणि संघ परिवाराला का वावडं आहे? संतांनी 'भेदाभेद भ्रम अमंगळ' हे तत्त्वज्ञान मांडलं. समाजाला संयम, अहिंसा शिकवली. अवघे प्राणिमात्र समसमान हे तत्त्वज्ञान बिंबवलं. 'हे विश्वचि माझे घर' हे सांगितलं. स्त्री-पुरुष अवघे सारखे हे अभंगांतून मांडलं. एकूण समन्वयाची, संवादाची, सहअस्तित्वाची, सहकाराची जीवनशैली म्हणजे वारकरी संप्रदाय. पण समन्वय, संवाद, सहअस्तित्व, सहकार संघाला-भिडेंना मान्य नाही. त्यांना वर्चस्ववाद, द्वेषाचं आकर्षण जास्त आहे. म्हणून संघाला कधी अहिंसक जैन धर्म सांगणाऱ्या महावीरांचं आकर्षण वाटलं नाही. प्रज्ञा, शील, करुणा सांगणाऱ्या गौतम बुद्धांविषयी प्रेम वाटलं नाही. देशातल्या भक्ती संप्रदायाचा महासमन्वय घडवून आणणाऱ्या, दिंडी-कीर्तन परंपरा सुरू करणाऱ्या संत नामदेवांचं कौतुक वाटलं नाही. शौर्य, भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय घडवून शीख धर्म सांगणाऱ्या गुरुनानक, गुरू गोविंदसिंगांविषयी ममता वाटली नाही. जातिभेद गाडून स्त्री-पुरुष समता, दलितोद्धार करणाऱ्या लिंगायत धर्म संस्थापक बसवण्णा यांच्याविषयी जिव्हाळा वाटला नाही. लाखो जर्मन नागरिकांची कत्तल करणारा हिटलर, कुऱ्हाड हातात घेतलेला क्षत्रियांचा नायनाट करणारा परशुराम यांना मात्र संघ गर्वानं मिरवतो. वारकरी संप्रदाय भक्ती, शक्ती आणि ज्ञान या तत्त्वांवर उभा आहे. समतेचं तत्त्वज्ञान सांगतो. पंढरीच्या वाळवंटात विठूची लेकरं आध्यात्मिक समता अनुभवतात, हे भिडे आणि संघाला खटकतं. त्यांना टाळ कुटणं हा नेभळटपणा वाटतो. म्हणून लोकांनी हातात टाळाऐवजी तलवारी घ्याव्यात, असा भिडेंचा आग्रह आहे. या तलवारी मनूचं राज्य आणण्यासाठी वापरायच्या, मनुस्मृतीविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद करण्यासाठी सपासप चालवायच्या, असे भिडेंचे मनसुबे आहेत. भिडे यांच्या पायावर पंतप्रधान माथा टेकवतात. मुख्यमंत्री त्यांना हात जोडतात, त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. खरं तर भिडे युरोप-अमेरिका, चीन, जपान या देशात जन्मते आणि असे वक्तव्य करते तर त्यांना मानसिक आजारी म्हणून मानसोपचार तज्ज्ञांकडे दवाखान्यात, नंतर मनोरुग्ण रुग्णालयात भरती केलं गेलं असतं. कारण वंशवादाचा, वर्चस्वाचा पुरस्कार करणं हा आजार आहे, गुन्हा आहे. मनुस्मृतीचं समर्थन आताच्या काळात फक्त वेडगळ लोकच करू शकतात. पण भिडेंना केंद्र, राज्य आणि रा. स्व. संघाचं संरक्षक कवच आहे. त्यामुळे ते बरळत आहेत. आंबा प्रकरणात स्त्री-पुरुष भेद केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, चौकशी सुरू अाहे. मिरज दंगलीतले ते आरोपी आहेत. अशा व्यक्तीने संतांचा अपमान केलाय म्हणून नवा वाद ओढवलाय. 


तुकोबारायांना देहूत धर्ममार्तंडांनी छळलं. गंबाजी-दंभाजी, मंबाजी त्या कारस्थानात पुढे होते. ज्ञानोबा माउलींना चांडाळ ठरवणारे धर्ममार्तंडच होते. संतांचा हा छळ लोक विसरलेले नाहीत. आता भिडे वारकरी संप्रदायाला तुच्छ लेखून महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचत आहेत, पुन्हा छळत आहेत. त्यामुळे भिडे आधुनिक मंबाजी आहेत, असं म्हणत औरंगाबादच्या मराठा क्रांती मोर्चाने भिडेंना चोप देण्याची भाषा केली आहे. जातीयवादी, वर्चस्ववादी मनूची तुलना भिडे संतांशी करतात आणि मनू श्रेष्ठ आणि संत कमी असा विकृत विचार तरुणांना सांगतात हे खपवून घेणार नाही, असा या संघटनेनं मनुस्मृतीचं दहन करत जाहीर इशारा दिलाय. 

- राजा कांदळकर (राजकीय विश्लेषक) 
Rajak2008@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...