आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया कोणी भरकटवला?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठलेही व्हिडिओ, वेबलिंक्स, मॉर्फ इमेजेस, फेक फिगर्स वापरून हवा तो परिणाम साधणे हा व्हॉट्सअॅपचा केंद्रबिंदू झाला आहे. 'मारा', 'कापा', 'चौरंगा करा', 'चिरडून टाका' हे परवलीचे शब्द बनले आणि नेत्यांची प्रक्षोभक भाषणे, बेताल वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. 


व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे काही दिवसांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. यानंतर सरकारी यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरू केले. ४ जुलैला व्हॉट्सअॅपनेदेखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा वापर करताना खोटे व्हिडिओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे याचे राजकारण्यांना काहीच वाटले नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रूपांतरित झाला आणि सामान्य माणूसदेखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. त्यामुळेच धुळ्याच्या घटनेला अनेक पैलू आहेत. याला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे. 


व्हॉट्सअॅप हा सोशल मीडिया भारतात २०१० मध्ये, सप्टेंबर २००६मध्ये फेसबुक तर ऑक्टोबर २०१० मध्ये इन्स्टाग्राम आले. २०१२ मध्ये ट्विटरचे केवळ पन्नासेक लाख भारतीय युजर होते ते २०१४ मध्ये दीड कोटी झाले. या सर्वांची सुरुवातीची दोनेक वर्षे स्थिरावण्यात गेली. ही अॅप्स मनमोहनसिंग सरकारच्या कारकीर्दीत रीतसर परवानगीने दाखल झाली. वास्तवात या अॅपचा काय आणि कसा उपयोग केला जाऊ शकतो हे तत्कालीन सरकारच्या ध्यानी आले नसावे वा त्यांनी याच्या खोलात जाऊन तसे प्रयत्नही केले नाहीत. 


भ्रष्टाचार, दहशतवाद, अनागोंदीच्या अतोनात आरोपांमुळे २०१४ ची निवडणूक काँग्रेसला जड जाणार हे नक्की होते. भाजपकडून वातावरणनिर्मिती होईपर्यंत लालकृष्ण आडवाणी यांचे नाव पुढे होते. परंतु २०१३च्या मध्यास जसजसे नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे येऊ लागले तसतसे प्रचार आणि आरोपांचे चित्र बदलू लागले. हा तोच काळ होता जेव्हा सोशल मीडियाच्या सर्व माध्यमातून सोनिया गांधी, मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्या मॉर्फ केलेल्या प्रतिमा वापरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची चिखलफेक करण्यात येत होती. सामान्य माणूस यात गंमत आणि विनोद म्हणून सामील होत गेला. महात्मा गांधींच्या नृत्य करतानाच्या छबीच्या गैरवापराच्या पोस्टपासून ते गांधी घराणे हे आधी पक्के मुसलमान होते, पंडित नेहरू किती अय्याश होते अशा कंड्या पिकवल्या जात होत्या आणि गुजरात हेच विकासाचे कसे सुपर मॉडेल आहे, यांचे अतिरंजित वर्णन करणाऱ्या पोस्ट पेरल्या जाऊ लागल्या. (विशेष बाब म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातच्या गोडवा गाणाऱ्या पोस्ट जाणवेल अशा वेगाने बंद झाल्या) मागील सरकारने किती वाट्टोळे केले हे सांगताना खोट्यानाट्या आकडेवाऱ्या दिल्या जाऊ लागल्या. हे काँग्रेसच्या लक्षात आल्यावर तेव्हाचे माहिती प्रसारणमंत्री कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियावर देखरेख ठेवून त्यावर निर्बंध लावले जातील, असे सांगताच भाजपने केलेला देशव्यापी आक्रोश कुणी विसरले नसेल. मात्र सत्तेवर येताच आपल्या विरोधात सोशल मीडियावर आवाज उठायला सुरुवात झाल्यावर मोदी यांनीही तेच धोरण अवलंबण्याचा प्रयत्न केला होता हे नोंद घेण्याजोगे आहे. दरम्यान, आपसातला राजकीय विखार इतका वाढला की त्यातून सामाजिक एकतेची वीण कधी उसवू लागली हे लोकांच्या लक्षातही आले नाही. 


कुठलेही व्हिडिओ, वेबलिंक्स, मॉर्फ इमेजेस, फेक फिगर्स वापरून हवा तो परिणाम साधणे हा व्हॉट्सअॅपचा केंद्रबिंदू झाला आहे. 'मारा', 'कापा', 'चौरंगा करा', 'चिरडून टाका' हे परवलीचे शब्द बनले आणि नेत्यांची प्रक्षोभक भाषणे, बेताल वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. मनामनात हिंसा असलेल्या गर्दीचे यामुळे उग्र जमावात रूपांतर होत गेले तर कधी एकट्याने हिंसक कारवाया होऊ लागल्या. गर्दीच्या मानसिकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे या गर्दीचा स्वतःचा एक मेंदू. गर्दीच्या डोक्यात जे किडे वळवळत असतात त्यानुसार ती गर्दी वागत असते. कधी गोमांस बाळगल्याच्या तर कधी गोहत्या केल्याच्या संशयावरून गर्दीने एकट्या-दुकट्या माणसाला ठार मारायला सुरुवात केली. कधी चोरीचा आळ, छेडखानी, धार्मिक विडंबना, भावना दुखावणे, अपहरण वा अपहरणाची भीती अशी कोणतीही कारणे एखाद्या निरपराध नि:शस्त्र माणसाला ठेचून मारण्यासाठी गर्दीला पुरेशी ठरू लागली. एका आकडेवारीनुसार वर्षभरात देशभरात जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या १३ घटना घडल्या असून, त्यात २७ जणांची हत्या झाली आहे. यात सोशल मीडियातून पसरवल्या गेलेल्या फेक व्हिडिओ, फोटो आणि माहितीचा मोठा हात होता. 


सोशल मीडियाचा हा अतिरेकी आग्रह कुणाच्या फायद्यासाठी केला जातोय हे कुणीही ओळखू शकते. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येनंतर अत्यंत विकृत भाषेत त्यांच्याबद्दल गरळ ओकले गेले होते. हे लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या काही लोकांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात हे माध्यमांनी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी यावर मौन धारण केलं. मध्यंतरी एका मुस्लिमाशी विवाह केलेल्या लखनऊमधील हिंदू महिलेच्या पासपोर्टवरून नुकताच गदारोळ झाला. या दांपत्याचे म्हणणे होते की, पासपोर्ट कार्यालयात धार्मिक कारणामुळे शेरेबाजी झाली. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे त्यांनी न्याय मागितला. स्वराज यांनी त्या स्त्रीस मदत करताच ज्यांच्या डोक्यात 'लव्ह जिहाद'चा किडा वळवळत होता त्यांनी स्वराज यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत विखार ओकला. इंद्रा वाजपेयी या ट्विटर हँडलवरून एका व्यक्तीनं, "लाज बाळगा मॅडम. हा तुमच्या मुस्लिम किडनीचा परिणाम आहे का?' असे ट्विट केले. काही दिवसांपूर्वी स्वराज यांच्यावर किडनीरोपणाची शस्त्रक्रिया झाली त्याचा नीच संदर्भ या व्यक्तीने वापरला. या ट्रोलपैकी बहुतांश ट्रोलर्स भाजपचे समर्थक आहेत, स्वराज यांना ते फॉलोही करतात. स्वराज या १७ ते २३ जून परदेश यात्रेवर होत्या. परतल्यावर त्यांनी ट्विट करत युजर्सना प्रश्न उपस्थित विचारला की, 'अशा प्रकारे ट्रोल करणे योग्य आहे का?' तर वाईट गोष्ट अशी होती की सोशल मीडियावर तब्बल ४३ टक्के लोकांनी ट्रोलिंगला बरोबर ठरवले होते. 


सोशल मीडियातून जे पेरले तेच आता उगवत आहे. पराकोटीचा द्वेष, हिंसा यांनी आता सामान्य लोकांनाही ग्रासले आहे, वाईट बाब अशी की जे सुशिक्षित आहेत, माध्यमप्रवण आहेत तेच लोक असे खोटे व्हिडिओ, फोटो वापरून लोकांना हिंसक बनवत आहेत. ज्यांना सोशल मीडिया कसा वापरायचा हेच माहिती नसतं, ते लोक हे काम करू शकणार नाहीत. म्हणूनच हे काम सुनियोजितही असू शकते. धुळ्यातील घटनेस कारणीभूत ठरलेला व्हायरल झालेला मूळ व्हिडिओ पाकिस्तानातील एका एनजीओने लोकजागृतीसाठी बनवला होता, त्यातला अर्धाच भाग कापून त्यावर एडिटिंग करून आपल्या भागाचे उल्लेख त्यात जोडत लोकांत संभ्रम निर्माण केला गेला. लोक त्याला बळी पडत गेले. मागे पाकिस्तानात मारहाण झालेल्या चोरांचा व्हिडिओ वापरून उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथे सप्टेंबर २०१३ मध्ये हिंदू-मुस्लिम दंगल घडवून आणली होती. यानंतर संपूर्ण राज्यात धार्मिक ध्रुवीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की पुढील निवडणुकांत त्याचे प्रतिबिंब उमटले. नंतर तिथेही तपासाचे नाटक पार पडले. पण जे नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले. लोकांची मने दुभंगली गेली. आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. धुळ्यातील हत्याकांडाचाही तपास पूर्ण केला जाईल. पण चांगल्या हेतूंसाठी निर्मिलेल्या सोशल मीडियाला आपल्या स्वार्थासाठी विकृत पद्धतीने भरकटवणाऱ्या लोकांपर्यंत आपल्या तपास यंत्रणा कधी पोहोचू शकतील का, हा खरा यक्षप्रश्न आहे! 

 

- समीर गायकवाड, सामाजिक- सांस्कृतिक विश्लेषक 
sameerbapu@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...