आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : 'ट्राेल' कर्त्यांचा अधर्म!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हाॅट्सअॅप, गुगल प्लस अादींचे अनेकांना कधीकाळी वावडे असायचे. परंतु हल्ली साेशल मीडिया हा कळत-नकळत प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला अाहे, हे तितकेच खरे. लाइक, शेअरिंग, ट्राेलिंगशिवाय कुण्या नेटकऱ्याचा दिवस उगवला अाणि मावळला असे शक्यच नाही. परंतु, साेशल मीडियावर चर्चेत अालेला एखादा विषय सर्वंकष समजून न घेता त्यास जातीय किंवा धार्मिक वादाचा रंग दिला जाताे, हे कितपत याेग्य ठरते? अलीकडच्या काळात त्याचे प्रस्थ सातत्याने वाढत असून त्यातून सामाजिक तेढ, दुरावा वाढण्यास अधिक खतपाणी मिळत अाहे, हे दुर्लक्षिता येत नाही. 

पासपाेर्टच्या अनुषंगाने तन्वी सेठ, तिचे पती अनस सिद्दिकी अाणि पासपाेर्ट अधिकारी विकास मिश्र यांच्यात जी काही शाब्दिक खडाजंगी उडाली, ती ट्विटरवर बरीच चर्चेत अाली. त्यापाठाेपाठ त्यास धार्मिक वादाचा मुलामा चढवण्यात अाला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना 'ट्राेल' करण्यापर्यंत अनेकांनी मजल गाठली. काही राजकीय पक्ष, दूरचित्रवाहिन्या, समाज माध्यमांत सक्रिय असणाऱ्यांनी अशी काही वातावरणनिर्मिती केली; जणू हिंदू-मुस्लिम ही एकच या देशातील सर्वात माेठी समस्या अाहे. भलेही मग मुद्दा हिंदू हिताचा असेल किंवा मुस्लिमांच्या अनुनयाचा; सारे प्रकरण तेथेच जाऊन पाेहाेचते जेथे या दाेन समाजात कटुता वाढवण्यासाठी पाेषक पार्श्वभूमी तयार केली जाऊ शकते. या पासपाेर्ट प्रकरणाला इतका भडकपणा दिला गेला की, त्याची परिणती भावनांच्या 'सुनामी'मध्ये झाली. 


परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात शिस्त अाणि कार्यक्षमता वाढीसाठी सुषमा स्वराज यांनी बरेच प्रयत्न केले, हे सर्वज्ञात अाहेच. मात्र त्यांच्या मदतीमुळे हिंदू असूनही मुस्लिम तरुणाशी विवाह केलेल्या तरुणीला पासपाेर्ट मिळाला ही बाब अनेकांना खटकली. त्यानंतर उठलेले टीकेचे माेहाेळ सुषमा स्वराज यांच्या किडनी प्रत्याराेपणापर्यंत अतिशय हीन अाणि असभ्यपणे खेचत नेण्यात अाले. काेणत्याही सभ्य, सुसंस्कृत व्यक्तीला यासंदर्भातील 'ट्राेल' वाचणे किंवा एेकणेदेखील पसंत पडणार नाहीत. म्हणूनच तर या 'ट्राेल' करणाऱ्यांचा धर्म तरी काेणता, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मुळातच 'धारयते इति धर्म:' अशी ढाेबळ व्याख्या किंबहुना संकल्पना सांगितली जाते. परंतु, अशा व्यक्तींसाठी धर्म म्हणजे सदाचरणाचे पालन करीत ईश्वरी तत्त्वात लीन हाेण्याचे साधन निश्चितच ठरत नाही, उलटपक्षी सामाजिक वितुष्ट फैलावणाऱ्या व्यापारातील ते एक सहायक घटक असल्याचे यानिमित्ताने दिसून अाले. या 'ट्राेल'मध्ये न स्वत:च्या मर्यादेचे भान अाहे, तसेच व्यक्ती अथवा महिलेच्या प्रतिष्ठेचे. एक मात्र खरे की, या देशात लाेकशाही तत्त्वांचे, कायद्याचे राज्य अाहे; काेणी राजकीय नेता किंवा काेणत्या एका धर्माचे शासन येथे नाही हे तमाम युवकांना समजावून सांगण्यात अापली व्यवस्था अयशस्वी ठरली असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधाेरेखित केले. 


गेल्या काही दिवसांपासून 'ट्राेलिंग'ची जणू माेहीम सुरू अाहे. 'ट्राेलिंग' करण्यासाेबतच 'रँकिंग' घटवण्याचेही उपद्व्याप हाेत अाहेत. त्यास सुषमा स्वराज या अपवाद ठरल्या नाहीत. 'ट्विटर'वर चिखलफेक हाेत राहिली तरी त्यांनी अतिशय संयम पाळत त्या साऱ्या 'ट्विट'ना 'लाइक' करण्याचा मुत्सद्दीपणा दाखवला, ही बाब इतरांसाठी प्रेरक तितकीच अनुकरणीय ठरावी. कारण, स्वराज यांनी 'ट्राेल्स'ला लाइक करीत ट्राेल करणाऱ्यांना उघडे तर पाडलेच, त्याशिवाय ट्राेल्सचा छळ त्यांनी चव्हाट्यावर अाणला. सामाजिक द्वेषाचे विष पसरवू पाहणाऱ्यांना त्यांचे चेहरे अारशात दाखवून देत या संघर्षात सुषमा स्वराज यांनी बाजी मारली असे म्हटले तर असंयुक्तिक ठरणार नाही. विभागीय पासपाेर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्र यांची बदली अाणि अल्पसंख्याकांची भलामण या बाबींचा काही संबंध नाही. त्यांची बदली झाली नसती तरी सुषमा स्वराज यांचा या प्रकरणाशी थेट काय संबंध हाेता? एका विभागीय कार्यालयातील लहान-सहान बाबींची दखल स्वराज यांनी घ्यावी, ही अपेक्षाच मुळात चुकीची नाही का? 'ट्राेल' करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे काम, त्याचे स्वरूप, उत्तरदायित्व समजून घेण्याचे भान प्रत्येकाला असायलाच हवे, तसेच स्वत:मध्ये अगाेदर डाेकावून पाहण्याची तसदी घ्यायला हवी; ही अपेक्षा चुकीची नसावी. 'ट्राेलिंग'च्या माध्यमातून सामान्य घटनांना धार्मिक मुलामा देण्याने फायदा तर काेणाचाच हाेणार नाही; परंतु नुकसान साऱ्या देशाचे, मानवी समाजाचे हाेणार अाहे. जर भारतात प्रदीर्घ काळपर्यंत अबाधितपणे लाेकशाही शासन व्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर सामाजिक साैहार्द अाणि सलाेखा जपणाऱ्यांना प्राेत्साहन देण्याची गरज अाहे. त्यात काेणी अडचणी निर्माण करीत असेल तर धार्मिक अाणि कायद्याच्या व्यवस्थेतील तरतुदींमध्ये प्रसंगी सुधारणा केल्या पाहिजेत. 

- श्रीपाद सबनीस 

बातम्या आणखी आहेत...