Home | Editorial | Columns | Column article Ramon Magsaysay Award, Dr. Bharat Vatwani, sonam wangchuk

समाजकार्याचा वैश्विक गौरव

सचिन काटे | Update - Jul 28, 2018, 07:44 AM IST

यंदाचे रॅमन मॅगेसेसे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. पुरस्कारांच्या सहा जणांच्या यादीत दोन भारतीयांचा समावेश आहे.

 • Column article Ramon Magsaysay Award, Dr. Bharat Vatwani, sonam wangchuk

  यंदाचे रॅमन मॅगेसेसे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. पुरस्कारांच्या सहा जणांच्या यादीत दोन भारतीयांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भारत वटवानी व लडाखमधील प्रख्यात अभियंते सोनम वांगचुक यांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने या दोघांच्या कार्याचा तसेच देशाचा वैश्विक पातळीवर गौरव होत आहे.


  समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीतील महत्त्वाचा घटक आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, रोजगार मिळावा हा हक्क मानण्यात आला आहे. याशिवाय समाजाच्या अनेक गरजा आणि प्राथमिकता आहेत. विकसनशील समाजात सेवा आणि कल्याणकारी योजना सर्व स्तरांतून राबवल्या गेल्या तर राष्ट्र उभारणीचे कार्य सगळ्यांच्या हातभाराने कमी वेळेत होऊ शकते. प्रत्येक धार्मिक शिकवणीत दया, करुणा, गरजूंना मदत करण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. ज्या समाजात आपण राहतो जेथे आपली जडणघडण होते तेथे सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवून समाजाचे ऋण फेडले पाहिजे, अशी सकारात्मक भावना समाजसेवेच्या मुळाशी रुजलेली पाहायला मिळते. अनेक जण स्वत: संस्थात्मक पातळीवर तसेच धार्मिक आणि मोठमोठ्या सोशल ऑर्गनायझेशनसोबत जोडून अशा कार्यात हातभार लावत असतात. एका ध्येयाने वेडे होऊन सामाजिक कार्यात स्वत:ला तनमनधनाने झोकून देणारे लोक इतिहास निर्माण करतात. समाजासाठी ते प्रेरणास्रोत ठरतात. त्यांना असे मोठे पुरस्कार मिळाले तर त्यांच्या कार्याचा तसेच त्या निमित्ताने त्या देशाचा गौरव होत असतो.
  रॅमन मॅगेसेसे हे असेच मानाचे पुरस्कार आहेत. त्यांना आशिया खंडाचे नोबेल असे म्हटले जाते. मनिला येथील 'द रॅमन मॅगेसेसे अवॉर्ड फाउंडेशन' या संस्थेच्या वतीने हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगेसेसे यांच्या नावाने १९५७ पासून ते देण्यात येतात. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या जगातील अनेकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या वर्षी या यादीत आणखी दोघांची भर पडली आहे. ३१ ऑगस्ट रोजी मनिला येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.


  मुंबई येथील डॉ. भारत वटवानी व त्यांच्या पत्नी हे दोघे मानसिकदृष्ट्या आजारी आणि गरीब लोकांना मदत करण्याचे काम अनेक वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. रस्त्यावर भटकणारे अनेक मनोरुग्ण लोक आपण पाहतो. डॉ. दांपत्याने अशा लोकांवर उपचार तर केलेच, पण त्यासोबत त्यांना आश्रय देण्याचे काम केले. १९८८ मध्ये त्यांनी श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनची स्थापना केली. कर्जत येथे केंद्र उभारले. तेथे अशा उपचार झालेल्या मनोरुग्णांना राहण्याची सोय केली. या माध्यमातून त्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या हजारो मनोरुग्णांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा सकारात्मक प्रयत्न केला. त्यांच्या कार्याचा या निमित्ताने गौरव झाला आहे


  तर सोनम वांगचुक हे लडाखमधील एक अभियंता आणि मोठे शिक्षण सुधारक आहेत. थ्री इडियट्स या चित्रपटात अामिर खान यांनी फुंगसूक वांगडू हे पात्र रंगवले होते. ते सोनम यांच्यावर आधारित होते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची, त्यांच्या कार्याची जगाला ओळख झाली होती. त्यांना लडाखच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख मानण्यात येते. स्वयंपाक, प्रकाश किंवा उष्म्यासाठी ते कोणतेही जीवाश्म इंधन वापरत नाहीत. त्यांना २०१६ चा रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइज हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे. जागतिक स्तरावर आत्तापर्यंत मोजक्या व्यक्तींना मिळालेला आहे. अभियंता झाल्यावर त्यांनी विद्यार्थी चळवळीसाठी 'स्टुडंट एज्युकेशन कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख' ही संस्था स्थापन केली. तेथे तत्पूर्वी ९५ टक्के मुले नापास होत होती. चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण पद्धतीत अभिनव बदल घडवला. परिणामी तेथील मुलांनी चांगली प्रगती केली. शेकडो शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम असो किंवा मग पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आइसक्यूब तयार करण्याचे काम असो, त्यांनी अशा कामात पुढाकार घेत लडाखमध्ये केलेल्या अगणित कामाचा आदर्श निर्माण केला. या कामाकडे देशच नव्हे तर जगाचे लक्ष वेधले गेले. समाजहिताचे अगणित प्रयोग करण्यासाठी त्यांचे कार्य आजही सुरू आहे. या दोघांच्या कार्याचे मॅगसेसे अवॉर्डने दखल घेतली. त्यांचा हा गौरव समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्यांसाठीही नक्कीच मार्गदर्शक आहे, असेच डॉ. वटवानी आणि वांगचुक आणखी तयार झाले तर राष्ट्र उभारणीसाठी ती मोठी उपलब्धी असेल.
  - सचिन काटे, कार्यकारी संपादक, अकोला

Trending