आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोगशीलतेचे वावडे (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी मराठी संगीत नाटक कलाकारांच्या मनमानीमुळे बिघडत गेलं व गद्य रंगभूमीच्या रेट्यात या नाटक प्रकाराचा लोकाश्रय कमी झाला, अशी खंत व्यक्त केली. संगीत नाटक ही मराठी रंगभूमीची जगाला भेट आहे, पण आपले त्याकडे दुर्लक्ष आहे. या कलाप्रकारावर बोलपटांचे आक्रमण व हौशी-प्रायोगिक रंगभूमीवर नव्या दमाचे आलेले प्रतिभावंत कलाकार, त्यांचे नवे विषय यांच्यामुळे संकटे आली, असाही उद्वेग त्यांनी केला. हा नाट्य प्रकार जिवंत राहिला पाहिजे, असे त्यांचे भावनिक आवाहन होते. संगीत नाट्यक्षेत्रात आपली उभी हयात घालवणाऱ्या एखाद्या कलाकाराला आपल्या आवडत्या कलेचा आस्ते आस्ते होत चाललेला मृत्यू निश्चितच मनाला वेदना देणारा असतो.

 

पण या घटनाक्रमाकडे, प्रक्रियेकडे भावनिक दृष्टीतून न बघता त्याकडे वास्तवातून पाहणे गरजेचे आहे. यासाठी संगीत नाटकाच्या इतिहासात आपण थोडक्यात डोकावून पाहिले पाहिजे. त्यातून हा नाट्य प्रकार कसा लोकप्रिय होत गेला व त्याच्यावर अन्य आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञानाचा प्रभाव पडल्याने तो कसा अवनत होत गेला हेही पाहिले पाहिजे. इंग्रजी राजवटीत शास्त्रीय संगीत गायकांचा राजाश्रय नाहीसा झाल्याने जी सांस्कृतिक पोकळी निर्माण झाली त्यात मराठी संगीत नाटक जन्मास आलं. तो काळ तसा धामधुमीचा होता. ब्रिटिश राजवटीचा पसारा वाढत गेला. प्रशासनात हिंदी लोकांना वाव मिळाला. युरोपमधील औद्योगिकीकरण, प्रबोधनाचे वारे इकडे वाहू लागले.

 

इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नवमध्यमवर्गाला व्हिक्टोरियन संस्कृतीची भुरळ पडली व त्याने शेक्सपिअर, मोलिए अशा नाटककारांच्या कलाकृतींचे भाषांतर, रूपांतर मराठी रंगभूमीवर आणले. पण मराठी प्रेक्षक नाटकांशी जुळला तो संस्कृत नाटकांवर आधारित नव्या नाट्यकृतींमुळे. युरोपमधील संगीतक व संगीत नाटक यांच्यात तसा मोठा भेद आहे. मराठी प्रेक्षकांनी संगीतकापेक्षा संगीत नाटक स्वीकारलं तेही संस्कृत पौराणिक कथांवर आधारलेले. हे नाटक प्रेक्षकांच्या सोयीनुसार सुटसुटीत होत गेलं. जुन्या संगीत नाटकांत गायक जास्त व अभिनेते कमी होते. या गायकांची अदाकारी पाहण्यास प्रेक्षकांची गर्दी होत असे. बालगंधर्वांचा काळ हा सुवर्णयोग म्हटला पाहिजे. पण बालगंधर्वांचे वय झाले व त्यांच्यानंतर कसदार गायक संगीत नाटकाला मिळणं दुरापास्त झालं व संगीत नाटकं लयास निघाली. साठोत्तर काळात प्रायोगिक व हौशी रंगभूमीवर संगीत नाटकांच्या तुलनेत इतके विविध विषय, अभिव्यक्ती आल्या की त्यात संगीत नाटक एकदमच हवालदिल झाले. त्यात संगीत नाटकं लिहिणारा कसदार लेखक दिसेनासा झाला. त्याचबरोबर समाजाला भेडसावणारे प्रश्न, व्यक्ती-समूहाच्या प्रेरणा व औद्योगिकीकरणामुळे मानवी नातेसंबंधांवर झालेले परिणाम याला कवेत घेण्याची क्षमता मराठी संगीत नाटकाने अजिबात दाखवली नाही.

 

त्यामुळे नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन असते ही धारणा मोडीत निघाल्याने पौराणिक नाटकांचे रटाळ विषय चघळणाऱ्या संगीत नाटकाचा मृत्यू अटळच होता. एकूणात आधुनिकतेचे वावडे ठेवणारा हा नाट्यप्रकार नव्या पिढीपर्यंत पोहोचला नसल्याने त्यांची शोकांतिका होणे साहजिकच होते. शिलेदार यांनी भाषणात, प्रायोगिक-हौशी रंगभूमीने जी प्रयोगशीलता अंगीकारली त्याच्यापासून संगीत नाटक रंगभूमीने स्वत:ला चार हात दूर का ठेवले, याविषयी बोलणे गरजेचे होते. ते झाले नाही.   


हॉलीवूडमध्ये एके काळी संगीतप्रधान चित्रपटांना प्रचंड प्रमाणात प्रेक्षकवर्ग होता. पण क्राइम थ्रिलर, साहसपट, युद्धपट, वेस्टर्न मारधाडीच्या चित्रपटांची एवढी लाट आली की त्यात संगीतप्रधान चित्रपटांची निर्मिती थांबली. तेथेही आपल्यासारखी याच प्रकारची चर्चा सुरू असते. त्यात गेल्या वर्षी हॉलीवूडमध्ये ‘ला ला लँड’ नावाच्या एका संगीतप्रधान चित्रपटाने तुफान धंदा केला. यावरून  समीक्षकांचे असे मत झाले की संगीतप्रधान चित्रपटांचा मृत्यू झालेला नाही तर असे चित्रपट करणाऱ्या मंडळींची वानवा आहे. प्रेक्षकांनी संगीत नावाचा फॉर्म नाकारलेला नाही. त्यांना नव्या विषयांची भूक आहे व ते त्यांना नव्या आविष्कारात अपेक्षित आहेत. हे आव्हान मराठी संगीत नाटकाने स्वीकारण्यात हरकत नाही. आजचे मराठी नाटक हिंदी-इंग्रजी-प्रादेशिक चित्रपट, इंटरनेटवरच्या वेब सिरीज व टेलिव्हिजनवरच्या मालिका यांच्या धबडग्यात अत्यंत सावधपणे प्रवास करत आहे. त्याने आपल्या सादरीकरणात, कथावस्तूंमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. तसा लवचिकपणा मराठी संगीत नाटकांनी दाखवला तर प्रेक्षक त्याला निश्चित डोक्यावर घेतील. कोणताही कलाप्रकार परंपरांना कवेत घेत आधुनिकतेशी नाळ राखण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकही त्याच प्रक्रियेचा भाग आहेत. प्रेक्षकांसमोर कुठलाही सकस फॉर्म ठेवल्यास तो टिकतोच.

 

 

बातम्या आणखी आहेत...