आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणुकीतील कलगीतुरा (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेच्या पालघर मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याची संभावना अशोभनीय म्हणूनच करावी लागेल. पालघरमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना आणि भाजप एकमेकांवर तुटून पडत आहेत त्यावरून मित्रपक्ष म्हणवणाऱ्या उभय पक्षांमधली अंतर्गत धुसफूस किती टोकाला गेली आहे त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत   नाही. निवडणूक आखाड्यातली करमणूक म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले तरी दोन सत्ताधारी पक्षांमधील ही रुंदावणारी दरी महाराष्ट्रासाठी भूषणावह खचितच नाही. पालघर आणि भंडारा - गोंदिया अशा दोन लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भंडारा-गोंदियामध्ये भाजपचे नाना पटोले यांनी पक्षांतर्गत नाराजीतून दिलेल्या राजीनाम्यामुळे, तर पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे जागा रिक्त झाली.


या दोन्ही जागा भाजपच्या असून त्या कायम राखणे ही या पक्षाची जबाबदारी आहे. शिवाय, दरम्यानच्या काळात देशात अन्यत्र झालेल्या पोटनिवडणुकांतील पराभवामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ आता २७४ वर आले. म्हणजेच लोकसभेतील बहुमताच्या जादुई आकड्यापेक्षा ते अवघ्या दोनने अधिक आहे. साहजिकच या जागा गमावल्यास भाजपचे स्पष्ट बहुमत धोक्यात येऊ शकते. अर्थात, एनडीएची एकत्रित सदस्य संख्या त्यापेक्षा खूप अधिक असल्याने लगेचच मोदी सरकार धोक्यात येणार नसले तरी स्वबळावरच्या स्पष्ट बहुमतापासून पक्ष दुरावू शकतो. त्यामुळे अन्य कुणाहीपेक्षा ही निवडणूक भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेची ठरते. हे ओळखूनच दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. भंडारा - गोंदियात शिवसेनेचे कोणतेही प्रभावक्षेत्र नसल्याने या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना आहे. पालघरमध्ये तशी स्थिती नाही. येथे शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. शिवाय, बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस यांचीही आपापली प्रभावक्षेत्रे आहेत. त्यातच भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास हाच शिवसेनेचा उमेदवार बनल्याने भाजपला काँग्रेसमधून आयत्यावेळी आयात केलेले माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी देणे भाग पडले. शिवाय, पालघर मतदारसंघ मुंबईला अगदी खेटून असल्याने माध्यमांमध्ये तेथील घडामोडींची जोरदार चर्चा होते. परिणामी पालघरची पोटनिवडणूक ‘न भूतो न भविष्यति’ अशी बनली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील टोकदार प्रचाराला आणि त्यातून घसरलेल्या पातळीला ही पार्श्वभूमी कारणीभूत आहे.

 

प्रचार संपायच्या एक दिवस अगोदर उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या संवादाची ध्वनिफीत जारी केली. त्यामध्ये मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यास मागेपुढे पाहू नका, असे सांगत आहेत. कुणी दादागिरी करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यास सांगताना कुणी कितीही मोठा दादा असेल तरी त्यापेक्षा अधिक दादागिरी मी करू शकतो, असे वाक्य मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आहे. त्यावरून लगेच राजकीय वातावरण तापले नसते तरच नवल होते. अपेक्षेनुसार प्रथम शिवसेनेने आणि पाठोपाठ काँग्रेससह अन्य विरोधकांनी भाजप निवडणुकीत गैरमार्गाचा वापर करत असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. भाजपच्या गोटातूनही त्यावर तातडीने आक्षेप घेतला गेला. या ध्वनिफितीत छेडछाड करण्यात आली असून सोयीची तेवढी वाक्ये ‘एडिट’ करून ती प्रसारित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर ‘आपण सत्तापक्ष आहोत, सत्तेचा कधीही दुरूपयोग करणार नाही,’ हे आपले वाक्य त्यातून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचे सांगत, उलट आपणच त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी कितीही सारवासारव केली तरी अशी भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही हे निश्चित. दुसरीकडे  त्यावर आक्षेप घेणाऱ्या शिवसेनेची भाषाही कमी विखारी नाही. निवडणुका येत-जात असतात, पण अशा पद्धतीच्या वर्तवणुकीतून परस्परांतली दरी अधिकाधिक रुंदावत जाते. मतभेदाचे रूपांतर मनभेदात होते. सध्या हे दोन्ही पक्ष नेमके त्याच वळणावर असून राज्यातील राज्यकारभासाठी ते मारक आहे. त्यातून या पक्षांचे किती नुकसान होईल त्यापेक्षा महाराष्ट्राच्या राज्यकारभारावर त्याचे होणारे संभाव्य दुष्परिणाम अधिक चिंताजनक असतील. पोटनिवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी त्याचा हा अन्वयार्थ अधिक क्लेशदायी आहे.

बातम्या आणखी आहेत...