आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिंग आणणारी ‘किक’ (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला, क्रीडा यांना जीवनात स्थान किती? फक्त पोट भरलेल्यांचे रिकामटेकडे उद्योग म्हणून नाक मुरडावे की कसे? मनोरंजन हा यांचा गाभा आहेच, पण त्याहीपलीकडे कला-क्रीडा यांचे रूपांतर आता प्रचंड आर्थिक उलाढालीच्या, रोजगार निर्मिती करणाऱ्या ‘इंडस्ट्री’त झाले आहे. हा व्यवहार समजून घेतला तर मग क्रिकेट-कबड्डीच्या आपल्याकडे सुरू झालेल्या ‘लीग’ किंवा आजपासून रशियात सुरू होणारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, या ‘इव्हेंट्स’कडे निकोप मनाने पाहणे शक्य होईल. बदललेल्या क्रीडा संस्कृतीचा निखळ आनंद लुटता येईल.

 

दोन गोलपोस्टमध्ये रंगणाऱ्या नव्वद मिनिटांच्या सामन्यातले नाट्य जितके भव्य असते, त्याहीपेक्षा थरारक संघर्ष मैदानात धावणाऱ्या खेळाडूंच्या आयुष्यात असतो. टोकाची चुरस आणि मानवी शरीराच्या क्षमतांचा अत्युच्च स्तर अनुभवण्यासाठी अब्जावधींचे डोळे आसुसलेले असतात. म्हणूनच चार वर्षांतून एकदा येणारी ‘फुटबॉल विश्वचषक स्पर्धा’ जगातला सर्वात मोठा ‘इव्हेंट’ असतो. सव्वादोनशे देशांमध्ये लोकप्रिय फुटबॉलला ‘खेळांचा राजा’ हे बिरुद उगाच लाभत नाही. ब्राझीलमधल्या कुठल्या तरी झोपडपट्टीतला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेला किंवा अफगाणिस्तानात निर्वासितांच्या छावणीत जीव मुठीत धरून जगणारा चिमुकलासुद्धा फुटबॉलला ‘किक’ मारून ‘वर्ल्ड स्टार’ बनण्याचे स्वप्न पाहत असतो.

 

जीवनाने दिलेला संघर्ष, अनाथपणाची भावना, दु:ख, अश्रू, गरिबी-विषमतेचे चटके अशा कुठल्याही यातना फुटबॉलला ‘किक’ मारून झुगारल्या जात असतात. लागते काय या फुटबॉलला? टेनिस, क्रिकेट, गोल्फसारखी हजारो रुपयांची साधने नकोत की हिरव्यागार मैदानाची चैन नको. एक बॉल, त्यामागे ऊर फुटेस्तोवर धावणारे काळीज आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तुडवत गोलपोस्टचे ध्येय गाठण्याची जिगर. बस्स. एवढ्या क्षमतेवर शौचालये साफ करणाऱ्याचा मुलगा सार्वकालिक सर्वश्रेष्ठ ‘पेले’ बनतो. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, इजिप्तचा मोहंमद सलाह किंवा पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारखे खेळाडू कोट्यवधी लोकांच्या गळ्यातले ताईत बनतात ते केवळ त्यांच्या मैदानातल्या देदीप्यमान कामगिरीमुळे नव्हे. जागतिक फुटबॉलच्या पटलावर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि ते स्थान गाठल्यानंतर त्याची उंची वाढवण्यासाठी ते घेत असलेले कष्ट यामुळे ते ‘रोल मॉडेल’ ठरतात. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशियातल्या गरीब देशांमधल्या अक्षरश: कोट्यवधी मुलांना ऊर्जा, प्रेरणा देण्याचे काम फुटबॉल करत आला आहे. या सगळ्याचा परमोच्च बिंदू असतो तो विश्वचषक.  


क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. रशियात जाऊन विश्वकरंडक सामन्यांचा आनंद लुटणाऱ्या परकीय प्रेक्षकांच्या यादीत भारत पहिल्या पाच देशांत आहे. विश्वचषक स्पर्धेमुळे चाहत्यांच्या संख्येत कैक पटीने भर पडते. विश्वचषकामुळे भारतात फुटबॉल ‘इंडस्ट्री’च्या प्रगतीला चालना मिळणार असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. कबड्डीची ‘लीग’ सुरू झाल्यापासून लक्षावधी रुपयांचे करार ग्रामीण भागातल्या तरुणांकडे चालत येत आहेत. जिथे चार प्रेक्षकसुद्धा मुश्किलीने मिळायचे त्या कबड्डीचे सामने ‘लाइव्ह’ दिसत आहेत. विशिष्ट कौशल्ये, गुणवत्ता, रग, याच्या बळावर तरुणांची ‘करिअर’ घडू लागली आहेत. प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यासाठीच्या वाढत्या संधी उपलब्ध होत आहेत. क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल या सांघिक खेळाचा प्रसार सर्वदूर होऊ लागल्याने भारतातल्या लक्षावधी तरुणांना पर्याय मिळतो आहे.

 

विश्वचषकात खेळण्याइतकी नैपुण्य पातळी भारतीय फुटबॉलने अजून गाठलेली नाही. परंतु, एम. विजयन, बायचुंग भुतिया, सुनील छेत्री या फुटबॉलपटूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीने पहिल्या शंभर देशांत भारताचा समावेश झाला आहे. सतरा वर्षांच्या खालील मुलांसाठीच्या फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन भारताने गेल्यावर्षी यशस्वी करून दाखवले. त्यामुळे जागतिक फुटबॉलने एव्हाना भारताची दखल घेतली आहे. विश्वचषकात खेळणारा भारतीय फुटबॉल संघ पाहण्याचा दिवसही आता दूर नाही. तोवर इतर देशांच्या खेळाडूंची अफलातून खेळाची पर्वणी लुटता येईल. जगातल्या या अव्वल फुटबॉलपटूंची ताकद, तुफानी वेग, पदलालित्य, लय, संतुलन पाहून वैयक्तिक तंदुरुस्तीबद्दलची जागरूकता वाढीस लागली तरी भारतीयांसाठी यंदाचा विश्वचषक फलदायी ठरेल. जगातला सर्वात तरुण म्हणवणारा भारत मधुमेहाची जागतिक राजधानी बनला आहे. अकाली वयात हृदयरोग, रक्तदाबाने गाठलेल्या तरुणांची संख्या येथे लक्षणीय आहे. फुटबॉलच्या ‘किक’मधून भारतीयांच्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असेल तर देशाला त्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...