आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्यांची ‘नवी पाटी’ (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजूनही विशेषतः ग्रामीण भागातल्या मोठ्या वर्गाची धडपड शासकीय नोकरदार होण्याची असते. सरकारी खात्यात चिकटले की बदलीची घाई सुरू होते. बक्कळ वरकमाईची संधी, विशिष्ट कार्यालय, हव्या त्या गावात-शहरात नोकरी यासाठीचा अट्टहास ‘आखूडशिंगी, बहुगुणी, दुधाळ गाय’ दारात बांधण्यासारखी असते.

 

अर्थात जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या बाबतीतला मुद्दा वेगळा आहे. कारण या नोकरीत बक्कळ वरकमाईचा मुद्दा येत नाही. विद्यादानाचे कार्य लाभाचे नसते. यांच्यासाठी सर्वात जटिल मुद्दा असतो तो ‘श्री व सौ शिक्षक’ या जोडप्याला शक्यतो एकाच शाळेत, नाही तर एकाच पंचक्रोशीत, तेही नाही तर किमान एका जिल्ह्यात नोकरीला ठेवण्याचा. वधू-वर दोघेही शिक्षकी पेशातले असा पायंडाच पडला असल्याने शिक्षक जोडप्यांची संख्या लक्षणीय आहे.

 

 नोकरीच्या ठिकाणांमुळे यांची ताटातूट होते. दुसरी अडचण असते ती राहत्या गावातली शेतीभाती, घर, फावल्या वेळातले राजकारण, झालेच तर सावकारी, इतर उद्योग-व्यवसाय वगैरे सगळे टाकून दुर्गम भागातल्या लांबच्या शाळेत रुजू व्हावे लागण्याची. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आयुष्यात तणाव निर्माण करणारे हे दोन मुख्य मुद्दे आहेत. यातून मार्ग काढत मनासारखी बदली करून घेणे हा फार मोठा कार्यक्रम ग्रामीण भागात सुरू असतो. यासाठी स्वतंत्र दलाल यंत्रणा काम करते. आमदार साहेबांशी ओळख, शिक्षण खात्यात वशिला, रिक्त जागांचा शोध, जिल्हा परिषद अध्यक्षांची चिठ्ठी, मंत्री-खासदाराची शिफारस, अनेकांचे हात ओले करण्यासाठी रग्गड तरतूद...अशा भानगडी एका बदलीसाठी कराव्या लागतात. बदली करण्याच्या अधिकाराचा वापर अधिकारी आणि राजकारणी स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी सर्रास करतात.

 

 लोकांना उपकृत करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी बदलीचे हत्यार वापरले जाते. बदली करण्याची किंवा न करण्याची टांगती तलवार डोक्यावर ठेवून शिक्षकांना वापरून घेण्याचीही कला अधिकारी वर्ग आणि राजकारण्यांना अवगत असतेच. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न वादग्रस्त बनला होता. वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती किंवा बदल्यांसंदर्भातला निर्णय ग्रामविकास खाते घेत असते. मात्र, या परंपरेला छेद देत फक्त शिक्षकांसाठीचा वेगळा निर्णय गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात घेतला. शिक्षक संघटनांनी याविरोधात रान उठवले. शासन निर्णयाविरोधात विविध उच्च न्यायालय खंडपीठांकडे २४ याचिका दाखल झाल्या. शिक्षक-विद्यार्थ्यांनी मिळून आंदोलने केली. बदलीबद्दल शिक्षकांमध्ये असणारी तीव्रता यावरून लक्षात यावी. 
 
 
वास्तविक आंदोलने केली म्हणून शिक्षकांची भूमिका न्याय्य ठरत नव्हती, हे आवर्जून सांगितले पाहिजे. कारण बदली हा नोकरीतला अविभाज्य घटक आहे. नोकरी स्वीकारतानाच बदलीची शक्यता गृहीत धरलेली असते. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे विशिष्ट ठिकाणच्या नोकरीचा आग्रह धरता येत नाही. जागा मोजक्या आणि इच्छुकांची संख्या यांचेही गुणोत्तर व्यस्त असते. दुर्गम भागातल्या शाळांमध्ये काम करणे हाही कर्तव्याचा भाग असतो.

 

म्हणूनच राज्य सरकारच्या गेल्यावर्षीच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला. यानंतर बदल्यांचा प्रलंबित मुद्दा आता मार्गी लागला पाहिजे. जिल्हा परिषद शाळांतल्या साडेतीन लाख शिक्षकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. ऑनलाइन शिक्षक बदल्यांचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे अभिनंदनास पात्र आहेत. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यावर आता त्यांनी लक्ष द्यावे. मानवी हस्तक्षेप टाळून बदली प्रक्रिया पारदर्शक करण्याची न्यायालयाची सूचना ‘ऑनलाइन’मुळे अमलात येईल, लाचखोरी संपेल, अशी आशा बाळगता येईल.

 

अर्थात या शासनाची ‘ऑनलाइन’ कामगिरी चिंताजनक आहे. शेतकरी कर्जमाफीच्या वेळचा ऑनलाइन गोंधळ ताजा आहे. शिक्षक बदल्यांमध्ये या गोंधळाची पुनरावृत्ती झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर खरी चर्चा व्हायला हवी ती सन्माननीय अपवाद वगळता जिल्हा परिषद शाळांमध्ये रसातळाला चाललेल्या शैक्षणिक गुणवत्तेची. शिक्षक एकाच ठिकाणी किती वर्षे राहिला यापेक्षाही किती गुणवान विद्यार्थी त्याच्या हाताखालून तयार झाले हा खरे तर सार्वजनिक चर्चेचा विषय व्हावा. दुर्गम भागातही जायचे नाही आणि सुगम भागातही टंगळमंगळ करत राहायचे, अशा शिक्षकांना वठणीवर आणण्याबद्दल शिक्षक संघटना कधी तोंड उघडत नाहीत. शिक्षकांचा सामान्य दर्जा हा राष्ट्रीय चिंतेचा विषय बनतो आहे. विद्यार्थी घडवणारे शिक्षक दुर्मिळ होत असल्याचा मुद्दा बदल्यांपेक्षा गंभीर आहे. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षक संघटना यापुढचा वेळ सत्कारणी लावतील का?

बातम्या आणखी आहेत...