Home | Editorial | Agralekh | Divya marathi article on Iran's Agreement

इराण कराराचे ताण (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - May 12, 2018, 02:00 AM IST

महासत्तेचे छोटे-मोठे निर्णय हे त्या महासत्तेपुरते मर्यादित राहत नाहीत. त्याचा परिणाम जगावर होतो. प्रत्येक देश आपल्या क्ष

 • Divya marathi article on Iran's Agreement

  महासत्तेचे छोटे-मोठे निर्णय हे त्या महासत्तेपुरते मर्यादित राहत नाहीत. त्याचा परिणाम जगावर होतो. प्रत्येक देश आपल्या क्षमतेनुसार हे परिणाम सहन करत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या अणुकरारातून अमेरिकेला बाहेर काढले. एका झटक्यात त्यांनी हा निर्णय घेतला. आधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणबरोबर करार केला होता.

  त्यानुसार शांततेसाठी अणु कार्यक्रम आखण्यास इराणला मुभा मिळाली होती, मात्र अण्वस्त्र बनवण्यावर निर्बंध होते. भारताने ज्याप्रमाणे अमेरिकेशी करार केला तसाच काहीसा हा प्रकार होता. या करारामुळे इराणवरील आर्थिक निर्बंध उठले. जागतिक व्यापार व अन्य व्यवहारात मोकळेपणे सहभागी होण्याची संधी इराणला मिळाली. आखाती देशातील वातावरण बदलण्यासही त्यामुळे मदत होत होती.

  ओबामा हे नेहमीच उदारमतवादी राहिले आहेत. युद्धखोर राष्ट्र ही अमेरिकेची प्रतिमा बदलण्याची धडपड ते करत होते. धाकदपटशा दाखवण्यापेक्षा चर्चा व देवाणघेवाण यातून मार्ग काढावा, असा त्यांचा प्रयत्न असे. आखाती देशातील अमेरिकेचा सहभाग त्यांनी बराच कमी केला. अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेण्यास प्राधान्य दिले. त्याचे काही वाईट परिणामही झाले. अमेरिकेचा हस्तक्षेप कमी होताच या भागात पुन्हा अतिरेकी शक्तींनी डोके वर काढले. तेथे स्थिर राजवट निर्माण होऊ शकली नाही. तरीही सारासार विचार करता ओबामांचा मार्ग योग्य होता.पण ट्रम्प यांची बातच वेगळी आहे.

  असुरक्षिततेच्या भावनेतून ते अाततायी निर्णय घेतात. सर्व जग आपल्या विरोधात आहे आणि जगातील बुद्धिवंत आपला पराभव करण्यास टपलेले आहेत, अशी त्यांची भावना आहे. ट्रम्प यांचा अमेरिकेतील तथाकथित बुद्धिमंत व डावी आघाडी सातत्याने पाणउतारा करत असते. ट्रम्प कसे चुकतात हे दाखवण्याची अहमहमिका काही वृत्तपत्रांत लागलेली असते. जी वृत्तपत्रे यात नाहीत ती सरकारधार्जिणी आहेत, अशी टीका भारताप्रमाणे तेथेही होते. मात्र, तरीही ट्रम्प यांची लोकप्रियता कायम आहे.

  याचे कारण ज्या असुरक्षिततेच्या भावनेने ट्रम्प यांना घेरलेले आहे, तीच भावना अमेरिकेतील बहुसंख्य नागरिकांची आहे. आपला स्वार्थ साधला जात असेल तर जगाच्या उठाठेवी कराव्यात, असे अमेरिकी नागरिकांना वाटते. त्याचबरोबर इस्लामी राष्ट्रांबद्दल भयाची भावनाही आहे. ट्रम्प यांचा निर्णय हा सामूहिक भावनेचा परिपाक आहे.

  मात्र, त्याचे परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत. परराष्ट्र धोरण ही नेहमीच तारेवरील कसरत असते. भारतासारख्या देशासाठी ती विशेष कसरत असते. परराष्ट्र राजकारणात शक्ती महत्त्वाची ठरते. राष्ट्र शक्तिवान नसेल तर त्याची फरपट होते. भारत याला अपवाद नाही. कारण मध्यमवर्गीय बाजारपेठ यापलीकडे जगाला देण्यासारखे भारताकडे काही नाही. आपली धोरणेही अशी आहेत की मोठी गुंतवणूक करण्यास कोणी पुढे येत नाही.

  कम्युनिस्ट तत्त्वांना झुगारून चीनने परकीय गुंतवणुकीचा जसा फायदा करून घेतला ते भारताला जमले नाही. लष्करीदृष्ट्याही आपण कमकुवत आहोत. जागतिक घडामोडींवर भलाबुरा प्रभाव टाकण्याची आपली क्षमता नाही. हे वास्तव लक्षात घेऊन इराण-अमेरिकेच्या झगड्याकडे पाहिले पाहिजे. अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे इराणलाही आता आक्रमक होणे भाग पडणार आहे. आर्थिक निर्बंधांचा जाच कमी करण्यासाठी तेलाचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. आज आपण इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल घेतो. ती गरज सौदी वा अन्य राष्ट्रे पूर्ण करणार नाहीत. किंबहुना इराणहून होणारी तेलाची आयात दुप्पट करण्याचा करार आपण मागील वर्षी केला आहे. इराणला आपल्याला सोडून देता येणार नाही.

  तेथील चाबहार बंदर आपण विकसित करत आहोत. या बंदरातून रेल्वे मार्गाने अफगाणिस्तानात पोहोचण्याची योजना आहे. पाकिस्तानला बाजूला सारून अफगाणिस्तानशी संपर्क ठेवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. त्याचबरोबर इराणपासून रशियापर्यंत रस्ता बांधण्यातही आपला सहभाग आहे. या सर्व योजना अडचणीत सापडू शकतात. इराणबरोबरच्या करारातून अमेरिका बाहेर पडली असली तरी फ्रान्स, जर्मनी व अन्य राष्ट्रे अद्याप करारात आहेत. चीन व रशियाही इराणच्या बाजूचे आहेत. या गटात भारत सहभागी होऊ शकतो, पण अमेरिकेला दुखावणे सध्या भारताला झेपणारे नाही. कारण ही राष्ट्रे स्वत: सामर्थ्यवान असल्याने अमेरिकेशी वेगळ्या पद्धतीने व्यवहार ठेवू शकतात. भारताकडे ते सामर्थ्य नाही, फक्त भाषेचा व तत्त्वांचा फुलोरा आहे. त्याला आंतरराष्ट्रीय व्यवहारात टाळ्या मिळवण्यापलकडे किंमत नसते.यामुळे करार इराण-अमेरिकेतील असला तरी तो मोडल्याचा ताण भारतासारख्या गरीब देशाला भोगावा लागणार आहे.

Trending