Home | Editorial | Agralekh | divya marathi article on kim - trump visit

किम-ट्रम्प भेटीचे औत्सुक्य ( अग्रलेख )

दिव्य मराठी | Update - Jun 04, 2018, 03:04 AM IST

अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये १२ जून रोजी भेट घे

 • divya marathi article on kim - trump visit

  अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये १२ जून रोजी भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी अचानक किम जोंग उन यांची भेट घेण्यास नकार दिल्याने जगभर खळबळ उडाली होती. उत्तर कोरियाने चर्चेला येण्याअगोदर स्वत:कडील अण्वस्त्रे नष्ट करावीत, मग चर्चेस यावे, असा ट्रम्प यांचा आग्रह होता. असा आग्रहच मुळात धरणे हे मूर्खपणाचे होते व आंतरराष्ट्रीय राजकारणाशी ते शिष्टसंमत नव्हते.

  जेव्हा एखादा देश स्वत:हून चर्चेस पुढे येतो, तेव्हा त्या देशापुढे अटी ठेवण्याने चर्चेत खोडा बसतोच; पण संशयाचे वातावरणही तयार होते. त्यात ट्रम्प यांचा आविर्भाव आपण जगाचे महासत्ताधीश आहोत व अमेरिकाच जगाला तारू शकते असा असल्याने परिस्थिती बिकट झाली होती. त्यांच्या वर्तनाने उलट अमेरिकाच अडचणीत आली होती. महामुश्किलीने उ. कोरिया स्वत:चा अणुकार्यक्रम बंद करण्यासाठी निघाला असताना ट्रम्प यांनी सिंगापूरमधील शिखर परिषद रद्द करून उ. कोरियाचे पारडे जड करण्यास मदत केली, असेही मानले जाऊ लागले.

  वास्तविक इराणकडे कोणताही अणुबॉम्ब नसताना (उ. कोरियाकडे अण्वस्त्र वाहून नेणारी क्षेपणास्त्रे आहेत, त्याच्या चाचण्याही झाल्या आहेत व त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहे असे अमेरिकेचे म्हणणे आहे) ट्रम्प यांनी इराणसोबतचा अणुकरार एकतर्फी मोडीत काढून पश्चिम आशियातले वातावरण तापवले होते. हा करार मोडीत काढताना इराणशी चर्चा करावी, त्यांची भूमिका समजावून घ्यावी, याचा विचारही ट्रम्प यांनी केला नव्हता. सौदी-इराणमधील वितुष्टामध्ये सौदीची बाजू घेण्यासाठी ट्रम्प यांनी इराणसोबतचा महत्प्रयासाने झालेला अणुकरार मोडणे व त्यांच्यावर आर्थिक निर्बंध घालणे हे सगळे अनाकलनीय होते.

  अमेरिकेच्या युद्धखोर स्वभावाचा जगाला अनुभव नवा नाही. पण इतिहासात अमेरिकेने जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतल्याच्याही अनेक घटना आहेत. ट्रम्प उ. कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम चर्चा-सुसंवाद या माध्यमातून बंद करू शकतात की नाही, ते शांतता प्रस्थापित करण्याची संधी स्वीकारतात की नाही, द. कोरिया-उ. कोरियातले शत्रुत्व कमी करतात की नाही, हा खरा प्रश्न आहे. दोनएक महिन्यांपूर्वी जेव्हा उत्तर कोरियाशी अमेरिकेने राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू केल्या तेव्हाच ट्रम्प यांना कदाचित शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळेल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. स्वभावाने आक्रस्ताळा, बेमुर्वतखोर, कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारा एका महासत्तेचा अध्यक्ष शांततेचा प्रयत्न करतोय हे चमत्कारिकच होते.


  या घडीला उ. कोरियाने स्वत:ची अण्वस्त्रे नष्ट करणे व त्यांचा अणुकार्यक्रम बंद करणे हे जपान व दक्षिण कोरियाच्या हिताचे आहे. हे दोन्ही देश अमेरिकेचे पारंपरिक मित्र आहेत. उत्तर कोरियाच्या कोणत्याही आगळिकीला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने त्यांचे सैन्य जपान व दक्षिण कोरियात अनेक वर्षे तैनात ठेवले आहे. त्यामुळे या दोन्ही देशांना अमेरिका-उत्तर कोरियादरम्यानची चर्चा यशस्वी व्हावी असे वाटत आहे.

  या प्रदेशातील वातावरण शांत राहणे हे या दोन देशांच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. उत्तर कोरिया आपल्या लष्करावर जसा वारेमाप खर्च करते तसा खर्च हे देश करू शकत नाहीत. त्यांच्या दृष्टीने अमेरिका तारणहार आहे. उत्तर कोरियाने त्यांची लांब पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे जपान व द. कोरियाच्या दिशेने रोखलेली आहेत. तसेच उ. कोरियाने आपल्या सीमाही सज्ज ठेवल्याने वातावरण तणावाचे आहे. हे तणावाचे वातावरण निवळण्यासाठी, उ. कोरियाची लष्करी सज्जता शिथिल करण्यासाठी अमेरिकेने आपली शिष्टाई कामी लावावी ही इच्छा जपान व द. कोरियाची आहे. अमेरिकेत असा एक थिंक टँक आहे की ज्याच्या मते उ. कोरिया स्वत:च्याच अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेशी सहजपणे चर्चेला तयार झाल्याने अमेरिकेचे त्यात नुकसान नाही.

  पूर्वीच्या ओबामा सरकारला इराणसोबत अणुकरार करण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत घ्यावी लागली होती. इराणला नमवण्यासाठी ओबामा सरकारने मोठे आर्थिक निर्बंध घालून इराणची अर्थव्यवस्था खिळखिळी केली होती. त्यामुळे इराण अमेरिकेशी अणुकरार करण्यास तयार झाला होता. उ. कोरियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेपुढे अनेक पर्याय आहेत. पण या प्रसंगी उ. कोरिया नेमकी काय भूमिका घेते याची जगाला उत्सुकता आहे. तसे एक पत्र किम जोंग उन यांनी ट्रम्प यांना उद्देशून लिहिले आहे. या पत्रातला मजकूर ट्रम्प यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. मात्र ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरून या पत्रात शांतता प्रस्थापित होईल, अशी उ. कोरियाची इच्छा असल्याचे भाव उमटले.

Trending