Home | Editorial | Agralekh | divya marathi article on maharashtra

साठीतल्या देशा...(अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - May 01, 2018, 03:42 AM IST

महाराष्ट्र राज्य मोठ्या आवर्तनातून जात आहे. देशातले सर्वात पुढारलेले, अनेक राजकीय-सामाजिक विचारांचा वारसा लाभलेले, मोठी

 • divya marathi article on maharashtra

  महाराष्ट्र राज्य मोठ्या आवर्तनातून जात आहे. देशातले सर्वात पुढारलेले, अनेक राजकीय-सामाजिक विचारांचा वारसा लाभलेले, मोठी सांस्कृतिक व वैचारिक पार्श्वभूमी लाभलेले, निसर्गाने समृद्ध असलेले हे राज्य समाधानी वाटत नाही. देशातील सर्वाधिक शहरांची संख्या या राज्यात आहे, शहरे बकाल असली तरी शहरांना जागतिकीकरण, उदारीकरण व ग्राहकवादाचा चेहरा मिळालेला आहे. लोकांच्या खाण्या-पिण्या-कपड्यांच्या सवयी निश्चितच बदललेल्या दिसतात. इंटरनेट व मोबाइलमुळे तर ग्रामीण व शहरी असा भेद अस्पष्ट होत चालला आहे.

  स्वस्त ते महागडी स्तरातील सर्व कंपन्यांची वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. महाराष्ट्राचा मराठी माणूस नोकरीसाठी परप्रांताची वाट धरत नाही, मात्र अधिक पैसे कमवायला युरोप-अमेरिकेत-ऑस्ट्रेलियात जातो. हे राज्य देशाचे उद्योगकेंद्रही आहे. तरीही गेल्या काही वर्षांत बेरोजगारीच्या प्रश्नावरून हे राज्य आतून धुमसताना दिसते.

  प्रादेशिक असमतोल हे त्यामागचे प्रमुख कारण आहेच; पण वाढत्या लोकसंख्येला रोजगार मिळणारी व्यवस्था आपण दुर्दैवाने निर्माण करू शकलेलो नाही. शेती विकास व उद्योग विकास यांच्यात समन्वय साधणारे रोडमॅप आपण तयार करू शकलेलो नाही. आपली खेडी शहरांशी दळणवळण क्रांतीमुळे जोडली गेली आहेत; पण शहरांचा जो विकास साधला त्या प्रकारचा विकास खेडी व छोटी नगरे साधू शकलेली नाहीत.

  शेतीसाठी पूरक अर्थकारण कोणताच राजकीय पक्ष मांडत नसल्याने साहजिकच बेरोजगारांच्या झुंडी अस्मितेच्या राजकारणाच्या बळी पडताना दिसत आहेत. गेली दोन वर्षे या राज्याने लाखोंचे मोर्चे पाहिले. कधी नव्हे तो एवढा मोठ्या प्रमाणातला बहुजन समाजातल्या वंचितांचा आक्रोश पाहायला मिळाला. शेती किफायतशीर न राहिल्याचे, शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे प्रश्न या निमित्ताने पुन्हा राजकीय पटलावर आले.

  सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, नोकरशाहीने या विषयावर गुळमुळीत उत्तरे दिली. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागच्या मूळ कारणांपर्यंत जाण्याचे धार्ष्ट्य एकाही राजकीय पक्षाने दाखवलेले नाही. हा राजकीय बोटचेपेपणा किंवा शेतीप्रश्नांना थेट न भिडण्याची भूमिका भविष्यात राज्याचे वातावरण अधिक अस्थिर व उग्र करण्याची भीती आहे. कदाचित शहरी विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष उभा राहू शकतो.


  एक काळ असा होता की, महाराष्ट्र राज्य लोककल्याणाच्या दिशेने झपाटून प्रगती साधत होते. राज्यात आर्थिक विचार होता. तो मांडणारी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी होती. त्यामुळे विकासाच्या प्रश्नावर राजकीय भेद असले तरी त्यातून मार्ग निघत होते. आता मार्गच शोधायचा नाही अशी भूमिका दिसते. जैतापूर, नाणार प्रकल्पांबाबत वेगळे काय दिसते? कोणताही पक्ष अशा विकास प्रकल्पांची साधकबाधक चर्चा करताना, जनतेचे प्रबोधन करताना दिसत नाही.हा अापमतलबीपणा झाला. लोकशाहीद्रोह झाला. या राज्याची देशात व जगात ओळख औद्योगिक राज्य अशी आहे. या राज्यात उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत व त्यातून बाहेर पडलेले हजारो शिक्षित आहेत. अशा कल्पक, धाडसी आणि उपक्रमशील मुलांच्या भवितव्याचा विचार कुणी करायचा? दुसरीकडे लोककल्याणासाठी राजकीय पक्षच नव्हे तर नोकरशाहीही झटताना दिसत नाही. खासगीकरणाची लाट असल्याने नोकरशाही लोककल्याणाप्रति असलेली आपली जबाबदारी नाकारताना दिसते. त्यामुळे आर्थिक धोरणे रेटताना कॉर्पोरेट कंपन्यांचा दबाव दिसतो. महाराष्ट्र झपाट्याने भांडवलशाहीकडे जाताना दिसत आहे. त्याला लोककल्याणाची जोड असणे गरजेचे आहे.


  राजकारणाचा व्यापक उद्देश हा समाजकारणच असतो. त्याच्याकडे समाजाने नफरतीच्या-मत्सराच्या भावनेने पाहिल्यास नुकसान अर्थात समाजाचे होते. आज राज्यात विविध सामाजिक मंच कार्यरत आहेत; पण त्यांचा राजकारणावर, राजकीय नेत्यांवर दबाव नाही. सामाजिक गटांचा दबाव हा लोकशाहीत अपेक्षित असतो. तो दबावगट नसल्याने राजकारण्यांचे, नफेखोर उद्योगांचे फावले आहे. त्यातच गुंडगिरी एक व्यवसाय म्हणून आकार घेत आहे. गेल्या २० वर्षांत राज्यात औद्योगिकीकरणाचा वेग वाढला, अब्जावधी डॉलर्सची परकीय गुंतवणूक येत गेली; पण त्याच वेळी ज्यांची गुजराण जमिनीच्या तुकड्यावर होते ते लाखो आदिवासी, अल्पभूधारक यांच्या हक्कांचे लढे सहजपणे दुर्लक्षित केले गेले. हा समाज आपल्या विकासप्रक्रियेत नाहीच असे वर्तन एक समाज म्हणून आपल्याकडून झाले आहे. हे राज्य वयाच्या साठीच्या दिशेने जात आहे. मानवी नजरेतून पाहिल्यास तरुणपण बरे गेले; पण म्हातारपण अधिक चांगले जावे या दृष्टीने आतापासूनच इलाजाची गरज आहे. महाराष्ट्रदिनी सर्व वाचकांना शुभेच्छा..

Trending