Home | Editorial | Agralekh | divya marathi article on vijay mallya

मल्ल्यावरचा ‘विजय’ दूरच! (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - May 10, 2018, 02:18 AM IST

मद्यसम्राट विजय मल्ल्याबद्दल भारतीयांना कुतूहल आहे. सार्वजनिक ठिकाणी उत्तान ललनांच्या विळख्यात वावरणारा, स्वतःच्या विमान

 • divya marathi article on vijay mallya

  मद्यसम्राट विजय मल्ल्याबद्दल भारतीयांना कुतूहल आहे. सार्वजनिक ठिकाणी उत्तान ललनांच्या विळख्यात वावरणारा, स्वतःच्या विमान कंपनीच्या प्रचारासाठी हवाई सुंदरींच्या कमरेत हात घालून उभा राहिलेला, आयपीएलच्या निमित्ताने विविध सेलिब्रिटींना गोळा करून क्रिकेट मॅच पाहणारा अशी मल्ल्याची विविध रूपे भारतीयांच्या मनात ठसली आहेत.

  छानछौकीचे, अय्याशी आयुष्य जगणाऱ्या मल्ल्याच्या अनेक कथा-दंतकथा चवीने चघळल्या जातात. ही सगळी गंमतजंमत बँकेच्या पैशांवर सुरू असल्याचे लोकांना फार उशिरा समजले. ‘वन बीएचके’चे हप्ते भरताना मेटाकुटीला येणारा नोकरदार किंवा पाइपलाइनसाठी घेतलेले कर्ज झेपेनासा झालेला शेतकरी सदोदित बँकेच्या दहशतीखाली वावरत असतो.

  विजय मल्ल्या नावाचा खुशालचेंडू मात्र हजारो कोटींचे कर्ज डोक्यावर असूनही बिनधास्त राहतो, हे कशामुळे? याचा उलगडा लोकांना होईपर्यंत हा मल्ल्या तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून देशाबाहेर पसार झाला. मेहुल चोक्सी, नीरव मोदी असे वेगवेगळ्या क्षेत्रांतले ‘विजय मल्ल्या’ही बँकांना चुना लावून देशाबाहेर पळून गेले. या सर्वांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात स्वाभाविकपणे चीड आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडे विश्वासाने दिलेल्या ठेवींवर डल्ला मारणारी मंडळी एका रात्रीतून देश सोडतात.परदेशात राहून मग्रुरी दाखवतात.

  लुटलेल्या पैशांवर उंची जीवनशैली जगतात. इकडे किरकोळ रकमांच्या वसुलीसाठी सर्वसामान्यांच्या मागे तगादा लावणाऱ्या बँका मल्ल्या-मोदींसमोर मात्र सपशेल नांगी टाकतात. बँकांचे म्हणजे सर्वसामान्यांचे हजारो कोटी रुपये बुडतात तरी मल्ल्या-मोदींचे प्रस्थ वाढवणाऱ्या भ्रष्ट बँक अधिकाऱ्यांच्या गळ्याला कधी नख लागत नाही. परदेशातून काळा पैसा आणण्याचे स्वप्न तर दूरच, उलट देशातल्याच बँकांच्या तिजोऱ्या तेवढ्या मोकळ्या होत असल्याचे लोकांना पाहावे लागते.

  हे सगळे संतापजनक आहे. कर्जबुडवे मल्ल्या-मोदी यांना बेड्या ठोकून देशात कधी आणणार, त्यांनी बुडवलेले पैसे वसूल कधी होणार याची उत्तरे ना बँका देऊ शकतात ना या देशातल्या तपास यंत्रणा. सरकार करते तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना कुरतडत राहतो.

  तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची कर्जे थकवून विजय मल्ल्या मार्च २०१६ ला इंग्लंडला पळाला. तेव्हापासून काटेकोर नियमांनी चालण्याचा दावा करणाऱ्या बँकांना मल्ल्याकडून एक दमडी वसूल करता आलेली नाही. आता इंग्लंडच्या कोर्टाने मल्ल्याच्या जगभरातल्या मालमत्तांवर टाच आणण्याचा आदेश दिल्याची बातमी आली आहे. प्रथमदर्शनी ही बातमी आनंद देणारी आहे. भारतातल्या १३ बँकांनी एकत्र येऊन मल्ल्यावर ठोकलेल्या दाव्यात भारतीय कोर्टाने जो निकाल दिला, तो इंग्लंडमधल्या न्यायाधीशांनी ग्राह्य धरला. भारतीय कोर्टाचा तपास इंग्लंड कोर्टाने मान्य केल्याचा हा दुर्मिळ प्रसंग, हीच काय ती दिलासादायक बाब. बाकी इंग्लंडच्या कोर्टाने मल्ल्याच्या मालमत्तांवर टाच आणली म्हणून त्याच्याकडली वसुली लगेच होईल, ही आशा निरर्थक आहे.

  इंग्लंडचे कोर्ट कशाला? आपल्या देशातल्या आपल्याच न्यायालयाने मल्ल्याच्या आपल्याच देशातल्या मालमत्तांवर टाच आणण्याची कारवाई यापूर्वीच केली आहे. परंतु, या मालमत्तांची विक्री अद्याप होऊ शकलेली नाही. त्यातून कर्जवसुली झालेली नाही. त्यामुळे इंग्लंड, वेल्स येथील मल्ल्याच्या अब्जावधी रुपयांच्या मालमत्तांमधून काही हाती लागेल, याची वाट किती वर्षे पाहावी लागेल हे सांगणे कठीण आहे. मल्ल्याची रवानगी भारतीय तुरुंगात झाली तरच त्याच्याकडच्या कर्जवसुलीला वेग येऊ शकतो. मल्ल्याला याची पक्की जाणीव आहे; म्हणूनच मागे लागलेल्या ‘सीबीआय’ आणि भारतीय बँकांना इंग्लिश न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेत गुंतवून ठेवण्याचे त्याचे मनसुबे आहेत.

  ही प्रक्रिया जेवढी लांबेल तेवढे दिवस तो इंग्लंडमध्ये सुरक्षितपणे राहू शकतो. मल्ल्याचे हे प्रयत्न निष्फळ ठरवण्यासाठी केंद्र सरकारने आधी त्याच्या प्रत्यार्पणासाठी इंग्लंडकडे तगादा लावला पाहिजे. नरेंद्र मोदींची परराष्ट्र नीती, मुत्सद्देगिरी वगैरे या बाबतीत कामी यायला हवी. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भातही हेच अपेक्षित आहे. वास्तविक मल्ल्या-मोदी ही मंडळी हिमनगाचे टोक आहेत. देशातल्या बँकांनी जाहीर केलेला ‘एनपीए’ तब्बल ९ लाख कोटी आहे.

  मल्ल्यासारख्याच इतर कॉर्पोरेट्सनी लादलेले हे ओझे आहे. हे सगळेच थकीत कर्जदार देशाबाहेर पळालेले नाहीत. दिखाऊगिरीमुळे मल्ल्याची चर्चा जास्त होते. प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या चाळीसपेक्षा जास्त कॉर्पोरेट्सनी बँकांना खड्ड्यात घातले याकडे फार कोणी पाहत नाही. मल्ल्या मिळेल तेव्हा मिळेल, पण असे मल्ल्या जन्माला घालणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना काय शिक्षा देणार हे बँकांनी सांगितले पाहिजे. या बँकांच्या मुसक्या कशा आवळणार? याचे उत्तर पंतप्रधानांनी दिले पाहिजे.

Trending