आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसुरी आसाराम (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाराम बापू या धार्मिक थोतांडाला मरेपर्यंत गजाआड राहावे लागणार आहे. धर्माची झूल पांघरून अल्पवयीन मुली-स्त्रियांचे शोषण केलेल्या या भाेंदूबाबाला आणखी कठोर शिक्षा झाली असती तरी कोणत्याही सुसंस्कृत माणसाला आनंदच झाला असता. आसारामच्या मुलावरही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. आसारामचे आश्रम स्त्रीशोषणाची केंद्रे बनली होती, असे असूनही त्याचा प्रभाव चार राज्यांमध्ये होता. सन २०१३ पासून आसाराम तुरुंगात गेल्यावरही त्याच्या भक्तांची संख्या कमी झाली नाही.

 

मनाच्या दुर्बलतेचे आणि अंध धर्मश्रद्धेचे हे लक्षण, दुसरे काय? दैवी अंश असल्याने आपला ‘बाबा’ कधी अत्याचार करणार नाही किंवा तो जे काही करतो तो ‘दैवी प्रसाद’ मानला पाहिजे, इतकी वेडगळ श्रद्धा आसारामसारख्या तथाकथित गुरूंबद्दल त्यांच्या भक्तांमध्ये आहे. ‘बुवा तेथे बाया,’ या दंभगिरीवर सुधारकांनी सातत्याने प्रहार करूनही निरनिराळ्या राज्यांत, निरनिराळ्या काळात असे ‘आसाराम’ सुखेनैव नांदत आले आहेत. राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांची संस्थाने फोफावली.

 

धर्मावरच्या विश्वासातून बुवा-बाबांच्या मागे जमणाऱ्या लाखोंच्या भाबड्या गर्दीचा उपयोग हक्काची मतपेढी म्हणून केला जातो. मतांच्या बदल्यात बुवा-बाबांच्या आश्रमांना स्वायत्त ‘नेशन स्टेट’चाच दर्जा बहाल होतो. संबंधित बुवा-बाबा या आश्रमाचा अनभिषिक्त सम्राट बनतो. या आश्रमात येणारे श्रद्धाळू त्याचे दास होतात. शारीरिक, लैंगिक, आर्थिक शोषणाच्या कित्येक किंकाळ्या धर्माच्या वरवंट्याखाली अशा आश्रमांमधून चिरडल्या जातात. वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांचा व्यापार, आर्थिक हेराफेरीसारखे गुन्हे धर्माच्या पडद्याआड राजरोस चालतात. एखाद्या बाबा रामरहीम किंवा आसाराममुळे या धर्मढोंगाच्या हिमनगाचे टोक उघडे पडते. त्यामुळेच या बुवा-बाबांच्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी पुढे आलेल्या मुली-स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबीयांचे करावे तितके कौतुक कमी आहे. यासाठी प्रचंड धारिष्ट्य लागते.

 

धर्माच्या ठेकेदारांविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे विस्तवाशी खेळ. आसाराम आणि त्याच्या मुलाविरुद्धची सुनावणी सुरू असतानाच नऊ साक्षीदारांवर प्राणघातक हल्ले झाले, यातले तिघे प्राणास मुकले. धर्मश्रद्धेची दहशत यावरून लक्षात यावी. कायद्याच्या कचाट्यात न आलेले ‘आसाराम’ अजूनही आसपास असणार; अशांच्या कच्छपी न लागण्याचा धडा यातून समाजाने घ्यायला हवा. धर्माचरणाच्या वाटेवर आर्थिक-लैंगिक अपेक्षांचे काटे असू शकत नाहीत. पोकळ, भाबडी श्रद्धा अंतिमतः धर्म बुडवणारी ठरते याची पक्की खूणगाठ बांधली पाहिजे. बुवाबाजीचे स्तोम वाढवणाऱ्या राजकारण्यांपासूनही सावध राहायला हवे. 


लैंगिक गुन्हे सर्वाधिक वेदनादायी आणि भावनिकदृष्ट्या खचवणारे असतात. मात्र असे गुन्हे करणाऱ्या आसाराम आणि त्याच्या मुलासाठी प्रार्थना करणारे भक्त जमतात, ही खरी चिंतेची बाब आहे. या गर्दीत महिलांची संख्या मोठी असते हे आणखी एक कोडे आहे. भक्तांची संख्या बघून राजकीय पक्ष अजूनही आसारामचे अप्रत्यक्ष सहानुभूतीदार राहतात, हे लक्षणीय आहे. धर्म आणि श्रद्धेबद्दलची ही विचित्र मानसिकता आसारामच्या तुरुंगवासाने संपुष्टात येणार नाही. माणूस टोळ्या करुन रानावनातून भटकत होता तेव्हापासून प्रतिस्पर्ध्याच्या नामुष्कीचा एक निकष हा त्याच्या स्त्रिया पळवणे, त्यांच्यावर अत्याचार करणे हाच राहिला आहे. ‘पशू ते माणूस’ हे स्थित्यंतर घडल्यानंतरही काही माणसांमधल्या पाशवी, रानटी प्रवृत्ती शिल्लक आहेत. भावनांवर नियंत्रण, व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर, सहनशिलता, संयम वगैरे सुसंस्कृतपणा हे धर्माचे मुलभूत सार आहे. आसारामसारखी माणसे कोणत्याच धर्माची असू शकत नाहीत. हे भोंदू प्रचलित धर्माचा उपयोग निव्वळ गर्दी जमवण्यासाठी करतात. शेवटी कोणत्याही धर्माचे स्वरुप आसुरी आहे की दैवी, हे त्या धर्माचे आचरण करणारे ठरवत असतात. आसारामचा धर्म ‘आसुरी’ होता यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

 

आसारामचे प्रभावक्षेत्र असलेली राज्ये प्रामुख्याने भाजपशासीत आहेत. यातल्या मध्य प्रदेश, राजस्थानातल्या विधानसभा निवडणुका तर तोंडावर आल्या आहेत. लगोलग केंद्रातली निवडणूक आहे. ‘आसाराम बलात्कारी नसून सनातनी हिंदू धर्माचा संरक्षक आहे’, असे समर्थन आसाराम दोषी सिद्ध झाल्यानंतरही त्याच्या भक्तांकडून केले जाऊ लागले आहे.

 

नजिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आसाराम भक्तांनी खेळलेली ही चाल आहे. हिंदू मतांचा दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारने याला बळी पडण्याचे कारण नाही. मतांच्या राजकारणापायी आसाराम भक्तांचे फिजूल लांगुलचालन करण्याच्या फंदात सत्ताधाऱ्यांनी पडू नये. आसारामची शिक्षा सर्वोच्च न्यायालयातही टिकेल याची पुरती खबरदारी तपास यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे. धर्माच्या बळावर चालणारी भोंदुगिरी, दहशत, अत्याचार या देशात खपवून घेतले जाणार नाहीत, या मताशी सर्व राजकीय पक्षांनी आणि धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या नागरिकांनीही ठाम राहण्याची ही वेळ आहे.

 

बातम्या आणखी आहेत...