Home | Editorial | Agralekh | Divya marathi article write on Shujaat Bukhari murder

निडर पत्रकार (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Jun 16, 2018, 02:00 AM IST

रमजानच्या काळात जम्मू व काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यामागे सरकारचा हेतू चांगला होता. दहशतवादी व सुरक्षा दलांमधील रो

 • Divya marathi article write on Shujaat Bukhari murder

  रमजानच्या काळात जम्मू व काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यामागे सरकारचा हेतू चांगला होता. दहशतवादी व सुरक्षा दलांमधील रोज होणाऱ्या चकमकी, निदर्शकांची आंदोलने व पाकिस्तानकडून सीमापार होणारा गोळीबार याने काश्मीर खोऱ्यातले दैनंदिन जीवन तणावपूर्ण असताना मुस्लिमांना पवित्र वाटणाऱ्या रमजान सणाच्या काळात संपूर्ण खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी ही केंद्र सरकार व राज्य सरकारची अपेक्षा चुकीची नव्हती.

  गेली चार वर्षे केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करता आली नाही. हे अपयश पुसण्यासाठी पुन्हा वाटाघाटी-चर्चा-सुसंवाद अशी दारे सरकारकडून उघडली गेली असताना गुरुवारी ‘रायझिंग काश्मीर’ या वर्तमानपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची व रमजानसाठी सुटीवर गेलेला औरंगजेब या जवानाची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. शुजात बुखारी हे काश्मीर खोऱ्यातले साहसी व निडर पत्रकार म्हणून ओळखले जात होते.

  त्याचबरोबर ते पाकिस्तानशी चर्चा करणाऱ्या ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’चा, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणाऱ्या उदारमतवादाचा एक आधारस्तंभ होता. गेल्या ६ जून रोजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काही दहशतवादी गट शस्त्रसंधी उधळण्याचा कट करत असल्याचा आरोप केला होता. हा आरोप बुखारी यांच्या हत्येमुळे खरा ठरला आहे. बुखारी यांची हत्या करून दहशतवाद्यांनी शस्त्रसंधीचा मुख्य हेतूच उडवून लावला आहे. दहशतवाद्यांना शांततेचे कोणतेच प्रयत्न नको आहेत, हे त्यातून स्पष्ट झाले आहे; पण बुखारींसारख्या पत्रकाराची हत्या करून दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये उमटणारा लोकशाहीचा आवाजही बंद करायचा आहे.

  ९० च्या दशकापासून बुखारी यांची पत्रकारिता काश्मीरच्या खोऱ्यात बहरत गेली. खोऱ्यातील प्रत्येक गाव, खेडे, शहरांचे प्रश्न, सामान्य काश्मिरी जनतेच्या जगण्याच्या व्यथा, दहशतवादी गट व लष्कर यांच्या कात्रीत सापडलेला काश्मिरी माणूस यांना केंद्रस्थानी धरून त्यांची पत्रकारिता होती. काश्मीर खोऱ्याचा अभ्यास करणारे भारतातले जे काही पत्रकार, अभ्यासक तेथे जात त्यांच्यासाठी बुखारी माहितीचा एक महत्त्वपूर्ण स्रोत होता. ‘द हिंदू’ या चेन्नईमधल्या इंग्रजी वर्तमानपत्रासाठी त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ प्रमुख वार्ताहराचे काम केले. त्या वेळी इंटरनेट, मोबाइलसारखी संपर्काची साधने नव्हती. पण भारतातील माध्यमे ज्या पद्धतीचा काश्मीर रंगवत असत त्याच्या भिन्न काश्मीर बुखारी आपल्या बातम्या, वृत्तांकनातून वाचकांपर्यंत आणत होते.

  दहशतवादाच्या छायेत पत्रकारिता करणे हे पत्रकारापुढचे खरे आव्हान असते. काश्मीर खोरे हा असा अशांत भाग आहे की जेथे भारत, पाकिस्तानचे लष्कर-राजकीय नेते, काश्मीरची जनता व दहशतवादी गट यांच्या दबावाखाली पत्रकारिता करावी लागते. हे दबाव गट खरी बातमीदारी करणाऱ्या पत्रकाराला दूषणे देत असतात. त्यात आजचा काळ असा आहे की देशातील काही मीडिया हाउसेस काश्मीर खोऱ्यात जिवाची बाजी लावून तटस्थ पत्रकारिता करणाऱ्यांना, काश्मीरच्या हिताची भूमिका निर्भीडपणे मांडणाऱ्यांवर देशद्रोही असा शिक्का मारताना दिसतात. पण बुखारी यांची पत्रकारिता इतकी सच्ची होती की दहशतवादी गट त्यांना गद्दार म्हणून संबोधत होते. त्यांच्यावर २००६मध्ये दहशतवाद्यांनी हल्लाही केला होता.

  पण अशा हल्ल्याला घाबरून त्यांनी पत्रकारिता करणे सोडून दिले नाही. उलट त्यांनी ‘द हिंदू’चा राजीनामा देऊन स्वत:चे ‘रायझिंग काश्मीर’ हे वर्तमानपत्र सुरू केले. ते पत्रकारिता करत खोऱ्यात शांततावादी, लोकशाहीवादी व उदारमतवादी समूह-गटांना एकत्र आणण्याचा सतत प्रयत्न करत होते. काश्मीर प्रश्न चर्चा-वाटाघाटी व शांततेच्या मार्गातूनच सुटू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्याचबरोबर खोऱ्यातील मुसलमान व हिंदू पंडित यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते. काश्मिरी तरुणांना पत्रकारितेकडे वळवण्यामागे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे होते. काश्मीर खोऱ्यातला हिंसाचार हा आजच्या काळात देशातल्या मीडियामधून प्रमुखपणे मांडला जातो.

  पण त्याच्या पलीकडे सामान्य काश्मिरी माणसाचे प्रश्न आहेत. राष्ट्रीय स्तरावरच्या प्रसारमाध्यमांनी समजून घ्यायला पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. काश्मिरी पत्रकार फक्त काश्मिरी हिताचेच बोलतात, हा आरोप त्यांना अमान्य होता. दहशतवादाच्या छायेत साहस व बेडरपणा दाखवत आमचे पत्रकार पत्रकारिता करत असतात, ते समजून घ्या, असे ते निक्षून सांगत. काही उजव्या विचारसरणीच्या इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी काश्मीरची जी प्रतिमा निर्माण केली आहे ती विषारी, विखारी आणि सत्याचा अपलाप करणारी आहे, अशी भूमिका ते त्या वृत्तवाहिन्यांवर थेट मांडत. अशा साहसी पत्रकाराच्या हत्येने काश्मीर खोऱ्यातील सत्याचा स्रोत निमाला आहे.

 • Divya marathi article write on Shujaat Bukhari murder

Trending