आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातील ‘नीच’वृत्ती ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

च्चविद्याविभूषित मणिशंकर अय्यर यांनी स्वत:ची सांस्कृतिक इयत्ता पुन्हा दाखवून दिली. पंतप्रधान मोदी यांना अय्यर यांनी ‘नीच’ या विशेषणाने संबोधले. काँग्रेसनिष्ठा व गांधी घराण्यावरील प्रेमाने अंध झालेल्या अय्यर यांचा जिभेवरील ताबा सुटला. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाच्या उद््घाटनात मोदी यांनी नेहरूंवर टीका केली. वस्तुत: त्यात चुकीचे काहीही म्हटले नव्हते. डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने नेहमीच विरोध केला. त्यांना घटना समितीत स्थान दिले असले व मंत्रिमंडळात समावेश केला असला तरी निवडणुकीत त्यांचा पराभव होईल याकडे काँग्रेसने जाणीवपूर्वक लक्ष दिले. मंत्रिमंडळात तर हिंदू महासभेच्या नेत्यांचाही समावेश नेहरूंनी केला होता. त्या काळाची तशी गरज होती. त्यामध्ये नेहरूंचा उदारमतवाद नव्हता. मोदींनी हा इतिहास लक्षात आणून दिल्यावर अय्यर यांचे पित्त खवळले व जीभ घसरली. घटनादत्त पदावरील व्यक्तीला आपण नीच म्हणत आहोत हे भान अय्यर यांना राहिले नाही. अर्थात जीभ ताब्यात ठेवण्याचा अय्यर यांचा लौकिक नाही. तीक्ष्ण द्वेषाची गरळ ओकण्याची जन्मजात सवय अय्यर यांना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील त्यांची वक्तव्ये ही द्वेषाने बरबटलेलीच आहेत. अय्यर यांना काही जण स्पष्टवक्ते समजतात. पण ते स्पष्टवक्ते नसून द्वेषवक्ते आहेत. काँग्रेसमधील डावीकडे झुकणाऱ्या विचारसरणीचे ते प्रतिनिधित्व करतात. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षे देशाला विशिष्ट साच्यात बसवण्याची या मंडळींची धडपड मोदी सत्तेवर आल्याने उधळली व हे सैरभैर झाले. अन्य विचारसरणींचा विरोध करण्यास काहीच हरकत नाही. लोकशाहीत विरोधाला उत्तेजनच दिले पाहिजे. पण अय्यर व काँग्रेसमधील अन्य गांधी घराण्याचे भक्त हे केवळ विरोध नव्हे, तर द्वेष करतात. लोकशाहीत द्वेषाला स्थान नाही. हे संघ व भाजपला जितके लागू आहे तितकेच काँग्रेसलाही लागू आहे. अंदमानमध्ये सावरकरांचे स्मारक होऊ नये म्हणून याच अय्यर यांनी आटापिटा केला. त्यामागे एकच भावना होती. नेहरू घराण्याला आव्हान देऊ शकणाऱ्या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचे, मग ते जिवंत असो वा मृत असो, चारित्र्यहनन करायचे आणि नेहरू घराण्याचे श्रेष्ठत्व अबाधित राखायचे. 


अय्यर, दिग्विजय, चिदंबरम, कपिल सिब्बल या नेत्यांना मोदींचे सत्तारोहण अजिबात सहन झालेले नाही. मोदींबद्दल कुत्सित शेरेबाजी करण्याची अहमहमिका यांच्यामध्ये लागलेली असते. वकिली युक्तिवाद करण्यात ते तरबेज आहेत व भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. यामुळे माध्यमांमध्ये त्यांना चांगली जागा मिळते. अय्यर, सिब्बल अशा मंडळींना संघ परिवार व मोदी यांचा जितका द्वेष वाटतो, तसाच संघ परिवार व भाजपमधील काही नेत्यांना नेहरू व काँग्रेसबद्दल वाटतो. यात अजिबात शंका नाही. हा द्वेष सोशल मीडियातून हिडीस पद्धतीने व्यक्तही होतो. त्याचा गाजावाजा होतो, कठोर टीका होते. मात्र, भाजप परिवारावर टीका करताना हा परिवार सांस्कृतिकदृष्ट्या किती खालच्या स्तरावर आहे, परिवाराचा कडवेपणा हा अतिरेकी स्वरूपाचा कसा आहे याकडे नेहमी लक्ष वेधले जाते. अय्यर यांच्या विधानातून इतकेच सिद्ध होते की, भाजपच्या तुलनेत काँग्रेसमधील नेत्यांची सांस्कृतिक पातळीही फारशी वर नाही. संघ परिवार व काँग्रेस हे दोघेही अय्यरांच्याच अर्थाने सारख्याच ‘नीच’ पातळीवर आहेत. काँग्रेस वा अन्य भाजप विरोधक बऱ्याचदा संयम बाळगतात किंवा शब्द सफाईने वापरतात. याउलट संघ परिवारातील नेते नाक्यावरील टपोरींच्या भाषेत बोलतात. पण दोघांच्याही पोटात द्वेषाची मळमळ सारखीच साचलेली असते. अय्यर यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषितांच्या पोटात थोडी जास्तच असते. परस्परांचा द्वेष करण्याच्या बाबत मोदीभक्त व राहुलभक्त यांच्यात डावे-उजवे करता येत नाही. भारताचे राजकारण किती कडवट झाले आहे हे यातून दिसते. परस्परातील गुणांना मोकळेपणे दाद देत मैत्री ठेवण्याचे दिवस इतिहासजमा झाले. विरोधी पक्षातील नेत्याबद्दलच्या द्वेषाचे कडवट प्रदर्शन केले की आपल्या नेत्यावरील निष्ठा सिद्ध होते असे आता समजले जाते. अर्थात हे फक्त भारतात होत नसून जगभरच द्वेषाच्या काविळीची साथ आली आहे काय, अशी शंका येते. राजकीय नेत्यांपासून ते माध्यमांपर्यंत सर्व जण या काविळीच्या साथीला बळी पडले आहेत. अमेरिका-युरोपमधील घडामोडी व तेथील नेत्यांबद्दल लिहिले जाणारे लेख पाहिले तर विरोधी मताबद्दलचा द्वेष, हा स्थायीभाव झाल्याची अनेक उदाहरणे मिळतात. कडवट, द्वेषमूलक टीका करण्यात तेथे व इथेही उदारमतवादी स्तंभलेखक आघाडीवर असतात हे विशेष. व्यक्तिनिष्ठा, पक्षनिष्ठा, विचारनिष्ठा आंधळी झाली की उच्च शिक्षण मागे पडते आणि लपलेला हिंस्र स्वभाव उफाळून येतो. यातून शाब्दिक हिंसा होते. त्याचे खोल व्रण उठतात व समाजस्वाथ्य बिघडते. 

बातम्या आणखी आहेत...