आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनअाक्राेशामागील राजकारण ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी अडचणीत आहेत हे समजून घेण्यासाठी वेगळ्या ‘हल्लाबोल’ची किंवा ‘जनआक्रोश’ची गरज नाही. अपुरे भाव, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती या प्रमुख कारणांनी शेतकरी नाडला गेलेला आहे. ‘गायीची बसून धार काढणाऱ्या’ शेतकरीपुत्रांनी दीर्घकाळ सत्तेत असताना या प्रश्नांची तड लावली नाही; उलट शेतकऱ्यांची भरलेली कासंडी लवंडून टाकण्याचेच काम त्यांच्याकडून बहुतेकदा झाले. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ या म्हणीप्रमाणे तथाकथित शेतकरी पुत्रांनीच सत्तेत असताना साखर कारखाने, दूध संघ, सहकारी सोसायट्या, बाजार समित्या, बँका आदी शक्य त्या ठिकाणी सामान्य, कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकऱ्यांना लुटण्याचे काम वर्षानुवर्षे केले. त्यामुळेच काँग्रेसच्या ‘जनआक्रोश’ला आणि ‘राष्ट्रवादी’च्या ‘हल्लाबोल’ला उदंड प्रतिसाद मिळाला नाही. अशोक चव्हाण, अजित पवार, सुनील तटकरे आदी नेत्यांना येणारे शेतकरी हिताचे उमाळे लोकांना खरे वाटत नाहीत. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासार्हता कमावण्यासाठी बरेच झगडावे लागेल. अपवाद धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे यांसारख्या तुलनेने कोरी पाटी असलेल्या मोजक्यांचा. ‘हल्लाबोल’च्या निमित्ताने सुप्रिया सुळे ज्या आक्रमकतेने थेट मुख्यमंत्र्यांना धारेवर धरत राहिल्या, ती धडाडी अजित पवारांना स्वत:च्या पक्षांतर्गत भवितव्याविषयी काळजी करायला लावणारीच होती. धनंजय मुंडेंना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे पक्षांतर्गत विरोधकांचे पीक जोमात फोफावण्याची शक्यता आणखी वाढली आहे. गेल्या पंधरवड्यापासून राहुल गांधींच्या अभिषेकाकडे डोळे लावून बसलेल्या काँग्रेसच्या ‘जनआक्रोशा’त ‘जन’ आणि ‘आक्रोश’ या दोन्हींची वानवा होती. वास्तविक दोन्ही काँग्रेस सलग पंधरा वर्षे महाराष्ट्रावर मांड ठोकून होत्या. यातली दहा वर्षे तर शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते. या कालावधीत शेतमालाला उत्पादनखर्च अधिक पन्नास टक्के नफा देण्याची शिफारस करणारा स्वामिनाथन आयोग बासनातून बाहेर येऊ शकला नाही. दोन्ही काँग्रेसच्या सत्ताकाळातच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू झाले. ज्या ‘सत्तर हजार कोटींच्या कर्जमाफी’चा दाखला शरद पवार वारंवार देतात, तेच पवार या ‘सत्तर हजार कोटीं’मधले विदर्भ-मराठवाड्यातल्या कोरडवाहू, अल्पभूधारकांना किती हजार मिळाले, याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. 


या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेने अधिक संवेदनशील असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील भासतात, पण ही संवेदनशीलता अंमलबजावणी आणि सत्ता राबवण्याच्या प्रक्रियेतून उमटताना दिसलेली नाही. जेमतेम तीन वर्षांत शेतकऱ्यांचे संपूर्ण कोटकल्याण होण्याची अपेक्षा खरे तर शेतकऱ्यांनाही नाही. परंतु, सत्तेत येण्यापूर्वी, सत्तेत आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तरी गांभीर्याने आणि तातडीने व्हावी, ही अपेक्षा अजिबातच गैरवाजवी नाही. फडणवीस सरकारबद्दलचा रोष यापेक्षा वेगळा नाही. राजू शेट्टींसारखा शेतकरी चळवळीतून आलेला मित्र भाजपने गमावला तो यामुळेच. विधिमंडळाच्या चर्चांमध्ये वकिली बाण्याने विरोधकांना गारद करणाऱ्या फडणवीसांना सहकारी मंत्री आणि प्रशासनावर वचक ठेवता आलेला नाही. परिणामी फडणवीस जे बोलतात, ते त्याच तीव्रतेने अमलात येताना दिसत नाही. शरद पवारांसारखा मुरब्बी आणि धूर्त राजकारणी समोर असताना फडणवीसांच्या या दुखऱ्या बाजूवर हल्ले अपेक्षितच अाहेत. ‘आमचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारचे कुठलेही देणे देणार नाही’, असा निकाल घेण्याचे आवाहन पवारांनी हल्लाबोल यात्रेच्या समारोपप्रसंगी केले. यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आणि चारदा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी असे अराजक माजवणारे आवाहन करावे, यामागचे राजकारण स्पष्ट आहे. अराजकीय मैत्रीच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जमेल त्या कारणाने जवळीक साधत, फडणवीस सरकारला सर्व रसद पुरवण्याची तयारी ठेवत गेली तीन वर्षे सत्तेशी जुळवून घेणाऱ्या पवारांना ‘२०१९’ खुणावू लागले आहे. महाराष्ट्राच्या सहकार, समाजकारण, बँकिंग आणि प्रशासन क्षेत्रात पवारांच्या शब्दाला अजूनही वजन आहे. सरकारविरोधातले वातावरण तापवण्यासाठी पवार त्यांची सगळी अस्त्रे यापुढे हिरीरीने बाहेर काढतील. केवळ वेगवान कार्यक्षमतेच्या आधारेच फडणवीसांना त्यावर मात करता येईल. गुजरात निवडणुकीचा निकाल आठवडाभरात लागेल. त्यात भाजपची पीछेहाट झाली तर त्याचे जोरकस पडसाद राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात उमटणार आहेत. विरोधकांचा खरा ‘हल्लाबोल’ त्यानंतरच सुरू होईल. त्यासाठीची मशागत दोन्ही काँग्रेसने सुरू केली आहे. भाजपने गुजरात गमावल्यास महाराष्ट्रातली ‘२०१९’ची लढाई भाजपसाठी आणखी कठीण होईल. आशेच्या किरणाच्या शोधात असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या मोर्चांनी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...