आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रमाचा भोपळा फोडाच ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो - Divya Marathi
सांकेतिक फोटो

सरकारी नोकरी असेल तर ‘सोन्याहून पिवळे’ या समजाला बहुधा कोणाचाच आक्षेप नसेल. सरकारी नोकरीत एकदा चिकटले की निवृत्तीपर्यंत बघायला नको. ‘ज्ञानपीठ’कार भालचंद्र नेमाडेंच्या ‘हिंदू’मधल्या खंडेरावाला त्याचा ‘पाटबंधारे साहेब’ सांगतो - ‘पूर्णतः सुरक्षित नोकरीच घ्यावी. उदाहरणार्थ, कोणती? सरकारी व्यवस्थेत. त्यातही पायाभूत घटक म्हटले की कशाचीच भीती नसते...सहकार खातं, पाटबंधारे खातं किंवा पोलिस खातं, न्याय खातं? उत्तम…कारण की समाजाचा पाया कधीच कोसळत नाही.” यावर खंडेरावाची प्रतिक्रिया असते, ‘साले, समाजाच्या पायात राहून, तोच पोखरत चैनीत राहता येतं.  पुन्हा स्वतः नामनिराळं राहून.” सरकारी नोकरदारांकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन खंडेरावापेक्षा फार वेगळा नाही. सरकारी नोकरीत गेल्यावर संबंधिताची, त्याच्या परिवाराची आर्थिक उन्नती किती वायुवेगाने होते याची उदाहरणे आसपास दिसत असतात. सरकारी नोकरी प्रगती आणि सुरक्षिततेचे प्रतीक बनले आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण अधिक आहे. शेती परवडत नाही. भूमिहीनांची संख्या मोठी आहे. पारंपरिक शिक्षण रोजगार देईना. अंगी कौशल्य नाही, असलेच तर भांडवल नाही. अशा बेरोजगार फौजांना स्पर्धा परीक्षा आकर्षित करतात. म्हणूनच ‘एमपीएससी-यूपीएससी’साठी झगडणारे लाखाच्या पटीत वाढत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या शिकवण्या चालकांची आक्रमकताही याला कारणीभूत आहे. स्पर्धा परीक्षेतल्या काही यशस्वी मंडळींना ते जग जिंकून आल्याच्या थाटात तरुणाईपुढे उभे केले जाते. ही मंडळी त्यांचा खऱ्या-खोट्या संघर्षाच्या कहाण्या मीठ-मिरची लावून रंगवतात. त्यावर भाळलेली तरुणाई एकलव्याच्या बाण्याने स्पर्धा परीक्षांमागे धावू लागते. घरची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही शहरात अर्धपोटी राहून दिवसरात्र अभ्यास करते. वर्षामागून वर्षे जातात. तीन लाखांतल्या सत्तर जणांनाही संधी मिळत नाही. तारुण्य सरून गाडी प्रौढपणाच्या उंबरठ्यावर येते. पुढचा मार्ग दिसत नाही आणि मागे फिरता येत नाही. तोवर याच स्वप्नाने भारलेली हजारोंची नवी फौज दरवर्षी याच प्रवाहात सामील होते. 


कारण नोकऱ्या नेमक्या आहेत किती, परीक्षांचे वेळापत्रक, रिक्त जागा भरणार का, कधी-केव्हा या सगळ्याबद्दल कमालीची अनभिज्ञता असते. शिकवणीवाल्यांना धंद्यात रस असतो. स्पर्धा परीक्षेनंतर काय? याचे वास्तव चित्रण तरुणाईपुढे स्पष्टच होत नाही. याच संभ्रमित वातावरणाला त्रासलेल्या हजारो तरुणांनी राज्यात नुकतेच मोर्चे काढले. राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्याची प्रमुख मागणी या तरुणांकडून आली यावरूनच त्यांची अगतिकता ध्यानात यावी. राज्याची आर्थिक स्थिती काय? अर्थसंकल्पातला किती मोठा टक्का कर्मचाऱ्यांच्या वेतन-पेन्शनवर खर्च होतो? रिक्त आणि नव्या पदनिर्मितीबद्दल धोरण काय? या सगळ्याचा अंदाज या अभ्यासू तरुणाईला नाही असे कसे म्हणणार? केंद्र सरकार तर पाच वर्षांपेक्षा जास्त काळ रिक्त असलेली पदे रद्द करण्याच्या विचारात आहे. असे झाले तर सुमारे चार लाख केंद्रीय नोकऱ्या कमी होतील. राज्य सरकारही याच विचाराप्रत आल्यास नवल वाटू नये. डिजिटल क्रांतीमुळे अनेक पारंपरिक पदे कुचकामी ठरत आहेत. उदारीकरण, जागतिकीकरणाने सरकारी व्यवस्थेतले खासगीकरण अटळ ठरवले आहे. सरकारी नोकऱ्या दिवसेंदिवस घटणार हे उघड आहे. त्यामुळे पदे वाढवण्याची मागणी कालसुसंगत नाही, शिवाय समाजहिताचीही नाही. उलट आहे त्याच सर्व सरकारी पदांची संख्या, त्यांची कार्यक्षमता आणि उपयुक्तता याचे काटेकोर मूल्यमापन अत्यावश्यक बनले आहे. लोकसेवा आयोगाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे, प्रतीक्षा यादी लावावी, डमी रॅकेट प्रकरणाची चौकशी व्हावी या मागण्या मात्र प्राधान्याने मार्गी लावण्याच्या आहेत. लोकसेवा आयोगाला निकालसुद्धा वेळेत लावता आलेला नाही. सरकारने ही तांत्रिक नामुष्की टाळली पाहिजे. तरुणाईने मात्र स्पर्धा परीक्षा हेच आयुष्याचे सार्थक हा भ्रमाचा भोपळा फोडला पाहिजे. आपापली आर्थिक-बौद्धिक कुवत आणि आवड लक्षात घेऊन इतर पर्यायांवरही तितकीच ताकद लावली पाहिजे. नव्या जगातल्या नव्या करिअर संधी दाखवून देण्याची जबाबदारी पालक, शाळा-महाविद्यालयांची आहे. बव्हंशी ग्रामीण तरुण या मार्गदर्शनापासून वंचित आहेत. हा मुद्दा शिक्षण खात्याने विचारात घ्यावा. राजकीय पक्षांच्या नादाला न लागण्याचे भान आंदोलकांनी यावेळेप्रमाणेच पुढेही जपावे. अशा आंदोलनानंतर निराशा दाटण्याची भीती असते. त्यातून आत्महत्येचा कलंक आंदोलनाला लागणार नाही अशी प्रगल्भता तरुणाईकडून अपेक्षित आहे. आंदोलनाचा पुढचा टप्पा एकमेकांना पर्यायी वाटा दाखवण्याचा असावा. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अन् आशा, किनारा तुला पामराला’ असे केवळ स्पर्धा परीक्षांपुरते न म्हणता त्याही पल्याड पाहिल्यास यश गवसल्याखेरीज राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...