आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस : पुनरुज्जीवनाच्या वाटेवर? ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००९ च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्यानंतर काँग्रेसमधील अनेक आत्मसंतुष्ट पुढाऱ्यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला बहुमत मिळेल, अशा बढाया मारण्यास सुरुवात केली होती. पण देशातील लोकसभा मतदारसंघांवर नजर टाकल्यास काँग्रेसला हिंदी पट्ट्यापेक्षा तेव्हाचा आंध्र व महाराष्ट्रातून बळ मिळाले होते. देशातल्या शहरी भागात काँग्रेसने मुसंडी मारली होती. म्हणजे सत्तासोपानासाठी उत्तर प्रदेश, बिहार या हिंदी बेल्टची गरज लागते तेथून काँग्रेसला बळ न मिळता यूपीए-१मधील त्यांचे काही मित्रपक्ष, काही प्रादेशिक पक्ष व भाजपच्या काही जागा हिसकावून काँग्रेसने दोनशेचा आकडा गाठला होता. या दोनशेच्या आकड्यामुळे काँग्रेसमध्ये एक प्रकारचे मांद्य आले. नेत्यांचा जनतेशी असलेला संपर्क पूर्णत: तुटला. सोशल मीडिया देशभर पसरत असताना तेथे पक्षाची प्रचारयंत्रणा नव्हती. त्यात २०१०मध्ये कॉमनवेल्थ घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम, नंतरचा कोळसा घोटाळा आणि अण्णा हजारे-केजरीवाल यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन या घटना एकमेकांत हात घालून त्यांचा विस्तार इतका वाढला की त्या काँग्रेसच्या मुळावर निर्णायक घाव घालणाऱ्या ठरल्या. काँग्रेसच्या नेत्यांना जंतरमंतरवरचा फार्स व्यवस्थित हाताळता आला नाही. त्याचा परिणाम सामान्य जनतेमध्ये काँग्रेसविरोधात संतापाची लाट पसरत गेली. या लाटेवर केजरीवाल व नरेंद्र मोदी स्वार झाले. परिणामी काँग्रेसला २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत हार पत्करावी लागली. ही हार केवळ आकड्यांवर अवलंबून नव्हती तर ती पक्षावर मानसिकदृष्ट्याही खोलवर परिणाम करणारी होती. मृत्युशय्येवर जसा गलितगात्र रुग्ण अखेरच्या घटका मोजत असतो व सर्व उपचार संपलेले असतात व ‘चमत्कारा’ची अपेक्षा असते तशी या पक्षाची अवस्था झाली होती. या पक्षाचा लोकांशी असलेला संपर्क तुटलेला होताच, पण सर्वसमावेशक विकासाचे राजकारण, सेक्युलर भूमिका, नेहरूवाद, आधुनिक दृष्टी, उदारमतवाद यापासून हा पक्ष कोसो दूर होता. या पोकळीचा फायदा भाजपने घेतला. त्यांच्या मदतीला असंतुष्ट, कायम सत्तापिपासू असलेले अनेक काँग्रेसजन धावले व बघता बघता देशाच्या नकाशातून काँग्रेस हद्दपार होऊ लागली. रविवारी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या प्लेनरी सेशनमध्ये काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची भाषणे झाली. थिंक टँककडून चर्चासत्रे झाली. त्यांच्याकडून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे -२०३० व्हिजन डॉक्युमेंट- मांडण्यात आले. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये देशाला सुपर पॉवर बनवताना ४० कोटींना गरिबीतून वर आणणे, जिल्हानिहाय हजारो रोजगार उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात आर्थिक संधी निर्माण करणे, सार्वजनिक क्षेत्रांना बळ देणे, सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करणे व महिला शक्तीला मुख्य राजकारणाच्या प्रवाहात आणून त्यांचे सबलीकरण करणे असा व्यापक कार्यक्रम होता. हे व्हिजन डॉक्युमेंट अर्थातच या वर्षात होणाऱ्या काही विधानसभा निवडणुका व २०१९च्या लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाल्याचे संकेत होते. २००४मध्ये यूपीए-१ तयार झाल्यानंतर किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याची काहीशी ही पुनरावृत्ती म्हणावी लागेल. 


काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संबोधित केलेले देशव्यापी असे पक्षाचे हे पहिलेच प्लेनरी सेशन होते. समोर आत्मविश्वास हरवलेले नेते व काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांच्यात बळ व आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान राहुल गांधी यांच्यावर आहे. आपल्या भाषणात त्यांनी मोदींवर खरपूस टीका केली. काँग्रेसची तुलना पांडवांशी व भाजपची कौरवांशी केली. पण ही टीका करताना आपल्या पक्षातल्या ढुड्डाचार्यांना, असंतुष्ट नेत्यांना, सत्तेसाठी लाचारी करणाऱ्या नेत्यांना तुमची वेळ संपली आहे, असे प्रेमळ शब्दांत सांगितले. अशा इशाऱ्यांची खरे तर पूर्वीच गरज होती, पण उशिरा हा होईना हे झाले. असे इशारे सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी सुखद क्षण होते. काँग्रेसमध्ये नेता व कार्यकर्ता यांच्यात जे कमालीचे अंतर पडले आहे, त्यांच्यामध्ये भली मोठी भिंत आहे. ही भिंत पाडण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हणणे हाही एक धक्का होता. कारण काँग्रेसी संस्कृती ही नेहमी हायकमांडकडे बोट दाखवून आपले हित साधत असते. पक्षात अशांना तिकिटे मिळतात की ज्यांच्याकडे ‘पॅराशूट’मधून उतरण्याचे कसब असते आणि जे अमाप पैसा बाळगून असतात. राहुल गांधीनी सामान्य टॅलेंटेड कार्यकर्त्याला, तरुणांना काँग्रेस पुढे आणेल, अशीही घोषणा केली आहे. काँग्रेसमध्ये असे मन्वंतर घडल्यास त्याचा भारतीय राजकारणावर मोठा प्रभाव पडेलच; पण कात टाकण्यासाठी काँग्रेस आसुसलेली आहे, असे चित्र मात्र दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...