Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article

अरब जगतातले नवे वारे (अग्रलेख)

दिव्‍य मराठी | Update - Apr 07, 2018, 02:00 AM IST

२००२ मध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली अरब लीग शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या माध्यमातून सौदी अ

  • divya marathi editorial article

    २००२ मध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली अरब लीग शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या माध्यमातून सौदी अरेबियाने अरब लीगच्या वतीने एक शांतता प्रस्ताव इस्रायलपुढे ठेवला होता. या प्रस्तावात १९६७च्या युद्धात इस्रायलने जेवढा काही भाग (गोलन खिंडीसह) बळकावला आहे तेथून त्यांनी आपले सैन्य माघारी बोलावण्याची तरतूद ठेवली होती व भविष्यात असा संघर्ष पुन्हा उफाळू नये, अरब लीग इस्रायलशी शांतता करार करण्यास तयार असल्याची अट होती. अर्थात, या प्रस्तावावर ठोस असे काहीच घडले नाही, पण अरब जगतात वहाबी व सलाफी चळवळीमुळे कट्टर समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाला इस्रायलसोबत बिघडलेले संबंध दुरुस्त करण्याची अपरिहार्यता वाटू लागली आहे, याचा हा एक संकेत होता. असा दुसरा संकेत या आठवड्यात सौदीकडून मिळाला. अमेरिकेतील एक प्रतिष्ठित नियतकालिक ‘द अटलांटिक’ला दिलेल्या मुलाखतीत सौदी अरेबियाचे नवे राजे मोहंमद बिन सलमान यांनी इस्रायल व पॅलेस्टाइन या दोन देशांना स्वत:ची ‘भूमी’ असल्याचा हक्क आहे, पण या दोघांत कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल यासाठी करार होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. राजे सलमान यांनी मुलाखत दिली त्याच्या दोन दिवस अगोदर इस्रायलच्या सैन्याने १७ पॅलेस्टाइन निदर्शकांना गोळीबारात ठार मारले होते व त्यानंतर पॅलेस्टाइनमध्ये इस्रायलविरोधात मोठा जनक्षोभ उफाळून आला. तो हा आठवडाभर सुरूच आहे. पण हे राजकीय वास्तव बाजूला सारत राजे सलमान इस्रायलच्या जवळ पोहोचले आहेत. आज प्रत्यक्षात इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात पूर्वी जेवढी कटुता होती तेवढीच आहे व ती कमी होईल असे काही दृष्टिक्षेपात दिसत नाही. पण इस्रायलचे अरब जगतातील जे काही कट्टर शत्रू आहेत ते इस्रायलसोबत आपली कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे चित्र दिसू लागले आहे. असे प्रयत्न अर्थात दोन्हीकडून होत आहेत. पण अशा सावध हालचाली का होत आहेत याची कारणे इराणच्या वाढत्या अणुसज्जता कार्यक्रमात आणि त्यांची सिरियाच्या प्रश्नावर रशियाबरोबर जी मैत्री बळकट होत आहे त्यामध्ये आढळतात.


    सौदीने व इस्रायलने इराणला नेहमीच शत्रू म्हणून मानले आहे. सौदी-इराणमधील तेढ ही शिया-सुन्नी श्रद्धांमधील विसंवादातून, तर इस्रायलची इराणशी तेढ ही गेल्या तीस वर्षांत आर्थिक व लष्करी शह-काटशहाच्या मार्गामुळे चिघळत आली आहे. इराणने इस्रायलसारखी अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे आणि हा देश स्वत:ला अण्वस्त्रसज्ज केव्हाही घोषित करू शकतो. इराणचे अरब जगतापेक्षा युरोपीय देशांशी, आशियातील चीन-भारत-पाकिस्तानशी आर्थिक आघाड्यांवर उत्तम संबंध आहेत. या देशाची भौगोलिक विविधता व तेथील गुंतवणूक अनेक देशांना आकर्षित करत असल्याने त्यांची अर्थव्यवस्था विस्तारत आहे. दुसरीकडे सौदी हा तेलाच्या बळावर झालेला श्रीमंत देश असला तरी या देशाची अर्थव्यवस्था अनेक क्षेत्रांमध्ये अविकसित अशी आहे. गेल्या पाचएक वर्षांत आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कोसळल्याने सौदीने आपल्या अर्थव्यवस्थेचा रोख तेलाकडून अन्य क्षेत्रांकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांचे युद्धपातळीवर आर्थिक धोरणे राबवण्याचेही काम सुरू आहे. सध्याचे राजे सलमान यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर काही आधुनिक निर्णय घेतले. आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात धाडले. महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने इस्लामी कट्टरतावाद्यांकडे दुर्लक्ष करून पावले उचलली. शिवाय सौदीत कोट्यवधी डॉलर गुंतवणुकीचे औद्योगिक प्रकल्प, खाद्य उद्योग, आयटी पार्क, वाहतूक प्रकल्प हाती घेतले. यातून त्यांची अर्थव्यवस्था विकसित होणार आहे. त्यासाठी अरब जगतात शांततेचे वातावरण सौदीच्या फायद्याचे आहे. या हेतूतून त्यांनी इस्रायलला बरे वाटेल अशा पद्धतीने पावले उचलली आहेत. राजे सलमान यांनी इस्रायलसोबत आर्थिक करार करण्याकडेही आपला कल असल्याचे स्पष्ट केले आहे. एकुणात अरब जगतात नवी राजकीय समीकरणे उभी करून इराणला शह बसेल अशी सौदीची व्यूहरचना आहे. अशा व्यूहरचनेत अमेरिका साथीला असल्याने सौदीचे पारडे जड होऊ शकते. राजे सलमान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत ते ट्रम्प यांच्याशी गुंतवणूक करार करण्यासाठी. अमेरिकेची अब्जावधी डॉलरची गुंतवणूक ही आजच्या घडीला सौदीसाठी गरजेची आहे. या गुंतवणुकीतून इराणच्या अर्थव्यवस्थेला टक्कर देता येईल, शिवाय आपले धार्मिक उद्देशही पुरे होतील असे सौदीला वाटत आहे. पण या सगळ्या घडामोडीत इस्रायल कोणती पावले उचलेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरते. टाळी दोन हातांनी वाजते.

Trending