Home | Editorial | Agralekh | divya marathi editorial article

लढाईआधीची जमवाजमव (अग्रलेख )

दिव्‍य मराठी | Update - Apr 14, 2018, 02:00 AM IST

२०१९ जवळ येत चालले आहे, तशा राजकीय पक्षांच्या हालचाली स्वाभाविकपणे वाढल्या आहेत. राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप, शि

  • divya marathi editorial article

    २०१९ जवळ येत चालले आहे, तशा राजकीय पक्षांच्या हालचाली स्वाभाविकपणे वाढल्या आहेत. राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि विरोधातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षांची स्वत:ची निश्चित मतपेढी आहे. प्रत्येकाचे स्वत:चे प्रभावक्षेत्र आहे. परंतु, १९९५ पासूनच्या एकाही निवडणुकीत काेणत्याही एका पक्षावर जनतेने संपूर्ण विश्वास दाखवलेला नाही. परिणामी युती-आघाडी ही सत्तासंपादनाची पूर्वअट बनली आहे. वैचारिकता, नीतिमत्ता वगैरेच्या फार फंदात न पडता त्यातल्या त्यात सोईच्या पक्षांना सोबतीला घेऊन सत्ता काबीज करण्याचा पायंडा आता रूढ झाला आहे. ‘संपूर्ण राज्य स्वबळावर’ हे स्वप्न बाळगून निवडणुकांची तयारी करण्याचा विचारसुद्धा सन २०१४ पर्यंत सर्वांनी बाजूला ठेवला. २०१९ मध्ये हाच पवित्रा कायम राखण्याचे धाडस या चार पक्षांकडून दाखवले जाण्याची चिन्हे सध्या तरी कमी दिसतात. आता सर्वांचे लक्ष्य आहे ते सर्वाधिक आमदार निवडून आणत क्रमांक एकचा पक्ष बनण्याचे. ज्यांचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातही त्यांचेच वर्चस्व असा सरळ व्यवहार यामागे आहे. लक्ष्य निश्चित झाल्यानंतर त्याचा पाठलाग आता सुरू आहे. गेल्या वर्षीच्या दोन्ही काँग्रेसनी एकत्र येत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष यात्रा काढली. भाजपने वर्धापनदिनाचे निमित्त साधून मोठी गर्दी जमवली. ‘राष्ट्रवादी’ एकट्याने ‘हल्लाबोल’ करते आहे. विदर्भ, खान्देश, मराठवाड्यात हल्लाबोल करून झाल्यानंतर ‘राष्ट्रवादी’ स्वत:च्या बालेकिल्ल्यात, पश्चिम महाराष्ट्रात आली. बालेकिल्ल्यातल्या आंदोलनाचा समारोप गुरुवारी पुण्यात झाला. सत्ताधाऱ्यांवर टीका हा हल्लाबोल सभांचा वरपांगी कार्यक्रम होता. मुख्य हेतू होता तो मरगळलेला फौजफाटा पुन्हा जागवण्याचा, एकत्र करण्याचा. तोंडावर आलेल्या निवडणुकांमधल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी ‘हल्लाबोल’च्या माध्यमातून झाली. इच्छुक उमेदवारांनी सभांमधून शक्तिप्रदर्शन केले. ‘राष्ट्रवादी’अंतर्गत नेतृत्वाची चुरस रंगल्याचेही दिसले. धनंजय मुंडेंनी यात अल्पावधीत आघाडी घेतली आहे. मुंडेंनी मुख्यमंत्र्यांपासून मोदींपर्यंत सर्वांना अंगावर घेतले. ‘माझ्या बहिणीने चिक्कीत पैसे खाल्ले,’ येथपर्यंत ते गेले. गोपीनाथ मुंडे ज्या आक्रमकतेने विरोधकांवर तुटून पडत त्याची आठवण धनंजय यांनी करून दिली. परिणामी ‘राष्ट्रवादी’त अजित पवारांनंतर मुंडे लोकप्रिय होत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख पक्षातल्या प्रस्थापितांच्या डोळ्यावर आला तर नवल वाटायला नको.


    हल्लाबोल सभांना मिळालेला प्रतिसाद ‘राष्ट्रवादी’चा हुरूप वाढवणाऱा ठरला. मात्र, ही गर्दी केवळ करमणुकीसाठीच होती की काय, अशी शंका नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणूक निकालांनी निर्माण केली. सहापैकी चार नगरपालिका भाजपच्या पारड्यात गेल्या. चार ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष जिंकले. एकूण ११५ पैकी ७९ नगरसेवक सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे निवडून आले. संपूर्ण राज्याचा अंदाज या निकालांवरून बांधणे चुकीचे असले तरी यावरून कल समजतो. कारण या सहाही नगरपालिका कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाडा अशा निरनिराळ्या भागांतल्या आहेत. निकालांचा ढोबळ अर्थ असा की गमावलेली विश्वासार्हता आणि जनमानसातले स्थान यात ‘राष्ट्रवादी’ला अजून सुधारणा करता आलेली नाही. भाजप-शिवसेनेच्या कारभारावर लोक समाधानी नसले तरी त्यांना घरी पाठवण्याइतका संताप अजून उत्पन्न झालेला नसावा किंवा ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’कडे लायक पर्याय म्हणून पाहण्याची मतदारांची मानसिकता अजून नाही. सत्ताधाऱ्यांनी या निकालांमुळे हुरळून न जाता अवलोकनाची संधी म्हणून याकडे पाहावे. लोकाभिमुख होण्यासाठी, लोकांसाठी सत्ता राबवण्यासाठी मतदार विश्वास टाकायला अजून तयार आहेत. तो सार्थ ठरवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना झटावे लागेल. ‘हल्लाबोल’च्या निमित्ताने राज्य पिंजून काढताना ‘राष्ट्रवादी’ने मतदारसंघनिहाय आढावा घेतला. उद्या काँग्रेससोबत जागावाटपाची वेळ आली तर मतदारसंघांची अदलाबदल, जागांची संख्या या वाटाघाटींच्या गृहपाठात ‘राष्ट्रवादी’ आघाडीवर असेल. संख्याबळाच्या खेळात अव्वल राहण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ राबते आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे थेट आवाहनच सुप्रिया सुळेंनी केले. वास्तविक उपमुख्यमंत्रिपदी राहिलेला माणूस आजवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकलेला नाही, हा इतिहास आहे. परंतु, प्रयत्नांची कसर ‘राष्ट्रवादी’ने सोडलेली नाही. त्या तुलनेत काँग्रेस भलतीच निवांत आहे. लढाईआधीच्या जमवाजमवीत सत्ताधारी आणि ‘राष्ट्रवादी’ पुढे चालल्याची जाग काँग्रेसला यायला हवी. हा आळस काँग्रेसला गोत्यात आणू शकतो.

Trending